युद्ध नौकेवरील क्षेपणास्त्र आणि तोफांचे विशेषज्ञ म्हणून ओळखले जाणारे व्हाइस अॅडमिरल अजितकुमार पी. यांनी नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाची जबाबदारी स्वीकारली आहे. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पश्चिमी मुख्यालय हा महत्त्वाचा तळ. देशाच्या आर्थिक राजधानीसह पश्चिम किनाऱ्याची सुरक्षेची जबाबदारी या तळावर आहे. नौदलातील ३८ वर्षीय सेवेत अनेक विभागांची धुरा सांभाळण्याचा अनुभव अजितकुमार यांच्याकडे आहे.
कझाकूटम सैनिकी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते १९८१ मध्ये नौदलात दाखल झाले. क्षेपणास्त्र आणि तोफ विशेषज्ञ म्हणून त्यांनी देशासह विदेशातही काम केले आहे. आघाडीवर कार्यरत राहणाऱ्या दोन विदेशी युद्धनौकांसह सहा युद्धनौकांचे त्यांनी आधिपत्य केले.
त्यात क्षेपणास्त्रधारी कोरवेट, आयएनएस कुलिश, आयएनएस तलवार, आयएमएस मुंबई, आयएनएस म्हैसूर यांचा समावेश आहे. कार्यरत असताना त्यांनी उच्च शिक्षणक्रम पूर्ण केले. अमेरिकेतील न्यूपोर्टच्या प्रतिष्ठित नेवल वॉर महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. सुरुवातीच्या काळात अजितकुमार यांनी नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयात विशेषज्ञ म्हणून काही वर्षे काम पाहिले. कार्यवाही विभागाचे ते प्रमुख होते. नौदलाच्या पूर्व विभागातही त्यांनी महत्त्वाच्या पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
तोफ आणि क्षेपणास्त्र प्रशिक्षण देणाऱ्या आयएनएस द्रोणाचार्य स्कूलचे प्रमुख, संरक्षण मंत्रालयात मनुष्यबळ विकास विभागात साहाय्यक आणि दक्षिणी मुख्यालयाचे प्रमुख या पदांची धुरा सांभाळली.
व्हाइस अॅडमिरल म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांची एझिमाला येथील भारतीय नौदल प्रबोधिनीत कमांडंटपदी नेमणूक झाली. अजितकुमार यांना नौदलातील वेगवेगळ्या विभागासह ‘इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’मधील कामाचा अनुभव आहे. आयडीएसमध्ये त्यांनी उपप्रमुख (कार्यवाही), उपप्रमुख (धोरण, नियोजन आणि विकास) पदावर काम केले. नौदलातील कामगिरीबद्दल त्यांना २००६ मध्ये विशिष्ट सेवा पदक आणि २०१४ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा लाभ नौदलाच्या या महत्त्वाच्या तळाला होणार आहे.