पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा २०१५मध्ये जर्मनीमधील हॅनोव्हर येथील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये ‘मेक इन इंडिया’ योजनेचे अनावरण केले होते तेव्हाच ते भारताचे जर्मनीतील राजदूत विजय गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे चीनचे राजदूतपद सोपविले गेले. चीनचे राजदूतपद म्हणजे परराष्ट्र सचिवपदासाठीची ‘सर्वोच्च पात्रता’ म्हणायला हरकत नाही. कारण मागील सहा परराष्ट्र सचिवांपैकी चौघे चीनमध्ये राजदूत होते. त्यामुळे गोखले यांनी ही ‘अलिखित’ पात्रता पूर्ण केली होती. पण या पात्रतेपलीकडील आणखी एक तुरा त्यांच्या शिरपेचात आहे. तो म्हणजे चीनची भळभळती जखम असलेल्या तैवानमध्येही राजदूत म्हणून काम केलेले आहे. चीन आणि तैवानमध्ये राजदूत झालेले ते आजपर्यंतचे एकमेव परराष्ट्र अधिकारी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते मूळचे पुण्याचे. संस्कृतवर त्यांची जबरदस्त पकड. मँडरिन (चिनी) भाषाही ते अस्खलितपणे बोलतात. चीनसह पूर्व आशियामधील घडामोडींचा सखोल अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व असा त्यांचा लौकिक. या त्यांच्या साऱ्या कौशल्यांचे दर्शन घडले ते डोकलाम पेचप्रसंगादरम्यान. भारताचे सिक्किम आणि भूतान यांच्यामधील भौगोलिकदृष्टय़ा आणि व्यूहतंत्रात्मकदृष्टय़ा अतीव महत्त्वाचे असलेल्या डोकलाममध्ये चीनने सैन्य घुसविले होते. भूतान हा लष्करी सहकार्याचा साथीदार. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी करारान्वये आपल्यावर. पण भारताने क्षणाचाही वेळ न दवडता आपले लष्कर चिनी सैन्यासमोर नेऊन उभे केले. चीनला भारताचा हा प्रतिसाद अनपेक्षित होता. त्याच धक्क्यातून न सावरता आल्याने भारताला धमक्या देण्यापर्यंतची मजल चीनने गाठली. पण भारत ठाम राहिला. त्या पेचप्रसंगात गोखले हे बीजिंगबरोबरील पडद्यामागील वाटाघाटीत महत्त्वाचा कणा होते. दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि बीजिंगमध्ये गोखले या त्रिकुटाने जवळपास सन्मानजनक माघार घेण्याइतपत चीनचे ‘गर्वहरण’ केले. डोकलाम हाताळल्यानंतर लगेचच गोखले दिल्लीत परतले ते आर्थिक संबंधांची बांधणी करण्यासाठी. आणि आता ते परराष्ट्र सचिव होत आहेत.

अतिशय मृदुभाषी, प्रसिद्धीच्या झोतात फारसे न येणारे, आपले काम शांतपणे करीत राहणारे विजय गोखले; जेव्हा निर्णयाची वेळ येते त्या वेळी एकदम कठोर होतात. आजपर्यंतचा त्यांचा प्रवास पारंपरिक परराष्ट्र अधिकाऱ्यासारखा आहे. नियमांना पक्के, लक्ष्मणरेषा पाळणारे असे त्यांचे मूलभूत व्यक्तिमत्त्व. बदलत्या परराष्ट्र धोरणावर छाप पाडणाऱ्या एस. जयशंकर यांच्यासारख्या निष्णात मुत्सद्दय़ाची जागा ते घेत आहेत. वेगवेगळ्या बहुद्देशीय गटांमध्ये (जी-२०, ब्रिक्स आदी) स्वत:चे स्थान निर्माण करतानाच अमेरिकेचा मैत्रीचा हात खुलेआम स्वीकारण्याची भारतीय परराष्ट्र धोरणाची बदलती दिशा आता दिसू लागली आहे. गोखले यांना तीच रेघ पुढे न्यावी लागेल..

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay gokhale