आकाशात हेलिकॉप्टर फिरते आहे, त्याला खाली कॅमेरा लावलेला आहे अन् चित्रीकरण सुरू आहे, तर त्यातील चित्रण कितपत स्थिर असू शकेल, असा प्रश्न कुणालाही विचारला तरी तारतम्याने आपण हेच उत्तर देऊ की, कॅमेरा हेलिकॉप्टरच्या हालचालींनी थरथरत असेल त्यामुळे ते चित्रण कधीच चांगले येणार नाही, कारण ते थरथरणाऱ्या हातांनी केलेल्या चित्रणासारखे असेल, पण या समस्येवर उत्तर शोधून कॅमेऱ्याला बसणारे हादरे कमी करून तो हेलिकॉप्टरच्या तळाशी लावलेला असतानाही चांगले चित्रण करू शकेल अशी व्यवस्था एका भारतीय तंत्रज्ञाने केली आहे. त्यामुळे हवाई चित्रणात मोठी क्रांती घडून आली. या तंत्रज्ञाचे नाव आहे विकास साठय़े. ते जन्माने पुणेकर असले तरी ते नंतर मुंबईत (मुलुंड) होते. व्यवसायाने अभियंता असलेल्या विकास यांना अलीकडेच वैज्ञानिक व तंत्रज्ञानविषयक असलेला २०१८ चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. बिव्हरली हिल्स येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुठल्याही हवाई वाहनातून थेट खाली कॅमेरा रोखून चित्रण करता येईल अशी शॉटओव्हर के १ कॅमेरा सिस्टीम तयार करणाऱ्या चमूत त्यांचा समावेश होता. ही यंत्रणा म्हणजे सहा अक्ष असलेला हवाई कॅमेरा स्थिर ठेवू शकणारा स्टँड आहे. साठय़े यांनी न्यूझीलंडमधील क्वीन्सटाऊन येथे शॉटओव्हर कॅमेरा सिस्टीम्स या कंपनीत २००९ मध्ये काम सुरू केले. तेथेच त्यांनी या स्टँडच्या निर्मितीची कल्पना प्रत्यक्षात आणली होती. ही सगळी व्यवस्था शोधण्यामागे निसर्गाची प्रेरणा होती. क्वीन्सलँडमधले निसर्गसौंदर्य अप्रतिम. ते कॅमेऱ्यात टिपायचे तर हवाई चित्रण चांगल्या पद्धतीने करता आले पाहिजे. या कल्पनेतून त्यांना ही तंत्रसुविधा निर्माण करण्याची गरज भासली. अनेक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटात या भागातील दृश्यांसाठी आग्रही असतात. साठय़े यांचा जन्म १९६७ मध्ये पुण्यात झाला. पुण्याच्या व्हीआयटी संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स विषयात बीई पदवी घेतली. १९९९ मध्ये त्यांनी टाटा हनीवेल कंपनीत काम केले. तेथून ते न्यूझीलंडला गेले व शॉटओव्हर कॅमेरा सिस्टीमवर काम केले. त्यांच्या कॅमेऱ्याने अनेक हॉलीवूडपटांतील चित्रणाला नवा साज चढवला आहे. कंपनीने तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अॅकॅडमी ऑस्कर्ससाठी पाठवला होता. त्यात अपेक्षेप्रमाणे यश आले साठय़े यांच्या या यशाने आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान क्षेत्रात मराठी मोहोर उमटली आहे.