कंपवातासह मेंदूशी संबंधित अनेक आजारांवर आजही पुरेसे उपचार नाहीत. त्यात जास्त संशोधनाची अधिक गरज आहे. शरीराच्या इतर भागांपेक्षा मेंदूचे संशोधन जेवढे करावे तेवढे कमीच; कारण तो सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. मेंदूवरील संशोधन हे दीर्घकाळ चालणारे, सहनशीलतेची परीक्षा पाहणारे असते, पण आता त्यात सादृश्यीकरणाचाही आधार संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतला जातो. मूळ कर्नाटकचे असलेले अमेरिकी वैज्ञानिक विक्रम गदगकर यांनी मेंदूविषयक संशोधनात महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत, त्यांना अलीकडेच पीटर अ‍ॅण्ड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार जाहीर  झाला आहे. मेंदूविज्ञानात वेगळे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना द ग्रबर फाऊंडेशनकडून दिला जाणारा हा पुरस्कार २५ हजार डॉलर्सचा आहे.

विक्रम गदगकर हे कॉर्नेल विद्यापीठातील जेसी गोल्डबर्ग प्रयोगशाळेत संशोधन करीत आहेत. ते खरे तर पुंजभौतिकीचे विद्यार्थी; पण त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून मेंदूविज्ञानात डॉक्टरेट केली. त्या वेळी मेंदूतील जैविक मंडलांची (सर्किट) जोडणी व मानव/ प्राण्यांच्या वर्तनाचा त्याच्याशी असलेला संबंध त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी साँगबर्डसारखे पक्षी एखादे कौशल्य शिकताना नेमकी कोणती पद्धत वापरतात याचा अभ्यास केला. त्यातून सिद्ध झाले की, संगीतातील लयकारी पक्ष्यांनाही कळते.. साँगबर्डला जर लय नसलेले गाणे ऐकवलेत तर त्याला तो प्रतिसाद देत नाही कारण त्याच्या मेंदूतील बेसल गँगलिया- डोपामाइन न्यूरॉनचे काम थांबते व जर गाण्यात लयकारी असेल तर हे न्यूरॉन उद्दीपित होऊन साँगबर्ड त्याला प्रतिसाद देतो. त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांसह बंगळुरु विद्यापीठातून पदवी घेतली. तेथीलच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून एमएस  केले. नंतर अमेरिकेला जाऊन त्यांनी कॉर्नेल विद्यापीठात जे. सी. सीमस डेव्हिस यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्राची पदवी घेतली. मात्र त्यांना मेंदूविज्ञानाचे जग खुणावत होते. त्यामुळे जेसी गोल्डबर्ग यांच्याबरोबर त्यांनी काम सुरू केले.

मेंदू संशोधन प्रयोगशाळेच्या उभारणीतही त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.  ‘चुकत-चुकत शिकण्यात मेंदूतील डोपॅमाइन न्यूरॉनची भूमिका महत्त्वाची असते,’ हे त्यांच्या संशोधनातून दिसून आले आहे. भौतिकशास्त्राचा विद्यार्थीही जीवशास्त्रात चांगले संशोधन करू शकतो याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षणाचे महत्त्व त्यातून अधोरेखित होते.

Story img Loader