सर्वसामान्यांना आवडणारी, परवडणारी फॅशन आणि अभिजनांची रुची असलेली चैनीची फॅशन ही दोन स्वतंत्र विश्वे आहेत. यांना एकत्र आणण्याची कविकल्पना वगैरे करत न बसता आपल्या कलात्मक बुद्धीच्या जोरावर जनसामान्यांच्या फॅशन संस्कृतीला अभिजनांच्या कोंदणात चपखल बसवणारा किमयागार होता व्हर्जिल अब्लोह. नुकतीच चाळिशी ओलांडलेला जगप्रसिद्ध डिझायनर आणि ‘लुई व्हुताँ’ या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचा सर्जनशील कलादिग्दर्शक! या व्हर्जिल अब्लोहची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
यशाच्या शिखरावर असणाऱ्या व्हर्जिलसारख्या असामान्य कल्पकता, बुद्धिमत्ता लाभलेल्या तरुणाचे जाणे सगळ्यांनाच चटका लावणारे ठरले. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांपैकी तो नव्हता, मात्र गर्भश्रीमंताच्या विश्वात शिरून त्याने आपली फॅशन, आपली डिझाइन्स रुढ केली हे त्याचे वैशिष्ट्य. यामुळेच तो जितका कृष्णवर्णीयांचा होता, तितकाच तो अन्यवर्णीय तारांकितांमध्येही लोकप्रिय ठरला. ‘ऑफ व्हाईट’ हा त्याने जन्माला घातलेला फॅशन ब्रॅण्ड. रस्त्यावरची फॅशन ही या ब्रॅण्डची मूळ प्रेरणा होती. काळे आणि पांढरे यांच्यामधला फॅशनचा अवकाश या ब्रॅण्डच्या माध्यमातून शोधण्याचा आपला प्रयत्न होता, असे त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. आपण ज्या संस्कृतीत जन्माला आलो, वाढलो त्यातून मिळालेली वैचारिक आणि सांस्कृतिक मूल्ये त्याने मनापासून जपली, किंबहुना त्याच मूल्यांच्या आधारावर त्याने डिझाइन्समध्ये नवनवे प्रयोग केले. रस्त्यावरची फॅशन लोकिप्रय करणाºया ब्रॅण्डचा उद्गाता ते ‘लुई व्हुताँ’सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅशन ब्रॅण्डचा पहिला आफ्रिकन-अमेरिकन कलादिग्दर्शक आणि या ब्रॅण्डसाठी निवडल्या गेलेल्या फारच कमी कृष्णवर्णीय फॅशन डिझायनर्सपैकी एक… हा त्याच्या चढत्या कारकिर्दीचा आलेख अनेक कृष्णवर्णीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला.
दोन भिन्न संस्कृती आणि वैचारिक -आर्थिक स्तरातील लोकांना डिझाइन्स किंवा फॅशनच्या माध्यमातून जोडण्याची कल्पना त्याला कशी सुचली, हा अनेकांना पडलेला प्रश्न. आफ्रिकेत स्थायिक झालेल्या कृष्णवर्णीय अमेरिकन दाम्पत्याच्या घरी जन्माला आलेल्या व्हर्जिलची पहिली प्रेरणा होती ती त्याची आई. त्याची आई शिवणकाम करायची, हे तंत्र तिने व्हर्जिलला शिकवले. कपड्यांचे वेड हे तिथपासून सुरू झाले, पुढे नव्वदच्या दशकातील तरुणांना हिप हॉप, स्केटिंगबोर्ड अशा ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या, त्याचा प्रभाव ऐन तारुण्यात व्हर्जिलच्या मनावरही पडला होता. ‘या सगळ्या जडणघडणीचा अर्क माझ्या कलेत उतरला,’ असे तो म्हणत असे. डिझायनर होण्यासाठी तुम्हाला डिझायनरच असले पाहिजे हे गरजेचे नाही, हे त्याचे म्हणणे. हा आत्मविश्वास त्याने प्रत्यक्ष उभारलेल्या कामातून इतर तरुणांमध्येही निर्माण केला.