बुद्धिबळासारख्या गंभीर (आणि वरकरणी रूक्ष भासणाऱ्या) खेळात फारच थोडी व्यक्तिमत्त्वे लोभस आणि लोकप्रिय निपजतात. भारताचा विश्वनाथन आनंद हा एक ठसठशीत अपवाद. त्याच्याखालोखाल लोकप्रिय बुद्धिबळपटू म्हणून निर्विवादपणे व्लादिमीर क्रॅमनिकचे नाव घ्यावे लागेल. रशियाच्या या ४३ वर्षीय माजी जगज्जेत्याने परवा नेदरलँडमध्ये काहीशा अनपेक्षितपणे पारंपरिक बुद्धिबळातून निवृत्ती जाहीर केली. आनंद या वर्षी वयाची पन्नाशी ओलांडेल. तरीही त्याची जिंकण्याची भूक आणि अत्युच्च पातळीवर खेळत राहण्यासाठी आवश्यक ऊर्जा शाबूत आहे. क्रॅमनिकला या दोन्ही निकषांवर आपण कमी पडत असल्याची जाणीव झाली. ती अनाठायी नसल्याचे टाटा स्टील स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवरून दिसून आले.

या स्पर्धेत तो संयुक्तपणे शेवटचा आला. या खराब कामगिरीमुळे क्रॅमनिक गेल्या कित्येक वर्षांमध्ये प्रथमच १५व्या क्रमांकावर घसरला. असे काही झाल्यास निवृत्ती जाहीर करण्याचा विचार त्याच्या मनात  दोन महिन्यांपूर्वीच आलेला होता. नव्वदच्या दशकात गॅरी कास्पारॉव आणि अनातोली कारपॉव या दोघांचा बुद्धिबळ विश्वात दबदबा असताना, त्यांना आव्हान देणारे काही तरुण उदयाला आले. ते होते विश्वनाथन आनंद, वासिली इव्हानचुक, बोरिस गेलफँड आणि व्लादिमीर क्रॅमनिक. १९९२मध्ये १७ वर्षांच्या क्रॅमनिकचा समावेश रशियाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड संघात करण्यात आला, त्या वेळी तो केवळ एक फिडे मास्टर होता. ग्रॅण्डमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टरही नसलेल्या क्रॅमनिकच्या समावेशाविषयी तत्कालीन जगज्जेता कास्पारॉव आग्रही होता. क्रॅमनिकने त्या स्पर्धेत ९ पैकी ८.५ गुण मिळवत साऱ्यांना थक्क केले. नंतरच्या काळात क्रॅमनिकची कामगिरी बहरत गेली. १९९५मध्ये कास्पारॉवने जगज्जेतेपदाच्या लढतीत आनंदला हरवले, त्या वेळी क्रॅमनिक कास्पारॉवचा सहायक होता. मग २०००मध्ये त्याने साक्षात कास्पारॉवला हरवले आणि तो जगज्जेता बनला. लंडनमधील त्या लढतीत क्रॅमनिकने ८.५-६.५ अशी बाजी मारली आणि एकही डाव गमावला नाही. हा एक चमत्कार होता कारण कास्पारॉव त्या वेळी आणि नंतरही काही वर्षे जगातला अव्वल क्रमांकावरील बुद्धिबळपटू होता. क्रॅमनिक २००८पर्यंत, म्हणजे आनंदने त्याला हरवेपर्यंत जगज्जेता राहिला. त्याची खेळाची जाण विलक्षण होती. पारंपरिकप्रमाणेच जलद आणि अतिजलद प्रकारातही तो सहजपणे खेळायचा. विश्वनाथन आनंदशी काही वर्षांपूर्वी त्याची दोस्ती झाली आणि ती आजही टिकून आहे. आनंदइतकीच जगभरच्या बुद्धिबळ चाहत्यांना त्याची उणीव निवृत्तीनंतरही जाणवत राहील.

Story img Loader