भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात एक घटना अशी घडली, की प्रत्येक प्रांताचे स्वत:चे, मातीतले संगीत असतानाही, भारतीय पातळीवर सर्वदूर मान्यता पावलेले संगीतही रसिकप्रिय झाले. आजच्यासारखी वेगवान माध्यमे नसतानाही हे घडून आले. त्यामुळे काश्मीर ते महाराष्ट्रापर्यंत हिंदुस्थानी संगीताची परंपरा अखंडितपणे चालू राहिली. संतूरवादक भजन सोपोरी हे याच परंपरेचे पाईक. मागील महिन्यात संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचे निधन झाल्यानंतर याच वाद्यवादनाच्या क्षेत्रातील सर्वाना हा दुसरा धक्का बसला आहे. संतूर या काश्मीरच्या खोऱ्यातील लोकवाद्याला मैफिलीत स्थान मिळवून देण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, त्या बिनीच्या कलावंतांमध्ये भजन सोपोरी यांचा समावेश करायला हवा. सुफियाना घराण्याचे कलावंत म्हणून त्यांची ओळख. गेल्या सहा पिढय़ा संतूर हेच वाद्य वाजवण्याची त्यांच्या कुटुंबाची परंपरा. वयाच्या दहाव्या वर्षी अलाहाबाद येथे कार्यक्रम सादर करून वाहवा मिळवणाऱ्या सोपोरी यांनी नंतरच्या काळात पाश्चात्त्य संगीताचाही विशेष अभ्यास केला. वॉशिंग्टन विद्यापीठात रीतसर शिक्षण घेतलेले सोपोरी यांचे संतूर वादनाचे शिक्षण त्यांचे वडील आणि आजोबांकडून झाले. याच विद्यापीठात नंतर ते अध्यापक म्हणूनही काम करत राहिले. हे लोकवाद्य जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अधिक मोलाचे. बेल्जियम, इजिप्त, इंग्लंड, जग्मी, नॉर्वे, सीरिया आणि अमेरिका या देशांत भजन सोपोरी हे नाव संगीताच्या क्षेत्रात चांगलेच परिचित झाले. जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यातील सांगीतिक दुवा असलेल्या सोपोरी यांनी वाद्यवादनाची खास शैली प्रस्थापित केली होती. सतार या वाद्यावरही त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते आणि ते वाद्यही त्यांनी मुद्दाम आत्मसात केले होते. तरीही संतूरवादक म्हणूनच ते परिचित राहिले. हिंदी, काश्मिरी, डोगरी, सिंधी, उर्दू, पर्शियन, अरेबिक अशा अनेक भाषांमधील सहा हजारहून अधिक गीतांना त्यांनी संगीत दिले. त्याशिवाय गजल हाही त्यांचा आवडता संगीतप्रकार. अनेक नामवंत गजलकारांच्या गजलांना त्यांनी स्वरबद्ध केले आणि ते संगीतही लोकप्रिय ठरले. पद्मश्री हा राष्ट्रीय सन्मान, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांसारख्या अनेक पारितोषकांचे मानकरी राहिलेल्या भजन सोपोरी यांचे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध करून टपाल खात्यानेही त्यांचा विशेष सन्मान केला. प्रसिद्धीच्या झोतात राहून कलावंत म्हणून मिरवण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. घरात पिढीजात आलेले संगीत हाच ध्यास राहिल्याने, त्यातच रमणे त्यांनी अधिक पसंत केले. भारताबाहेर जाऊन संतूर या वाद्याची ओळख करून देत, ते लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे खर्च केली. त्यामुळे एक उत्तम कलावंत म्हणून त्यांना मान तर मिळालाच, परंतु त्याहीपलीकडे त्यातून जो आनंद घेता आला, तो त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरला. भजन सोपोरी यांची संतूर वादनाची परंपरा त्यांचे चिरंजीव अभय हे चालवत आहेत. आज देशातील युवा संतूर वादक म्हणून त्यांनी लौकिकही प्राप्त केला आहे. आयुष्यातील अखेरची वर्षे शारीरिक व्याधींशी झगडत असतानाही भजन सोपोरी यांचा ध्यास मात्र संगीताचाच राहिला. त्यांच्या निधनाने, भारतीय संगीतातील एक जाणता कलावंत हरपला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा