अरब पत्रकार आणि त्यातही युद्धभूमीवर जाऊन वार्ताकन करणारी महिला अरब पत्रकार ही दुर्मिळातील दुर्मीळ बाब. कदाचित असे वर्गीकरण शिरीन अबू अक्ले यांना कधीही पटले नसावे. पण त्याविषयी निष्कारण आक्रमक युक्तिवादात न रमता शिरीन अबू अक्ले गेली २५ वर्षे अल जझीरा वृत्तवाहिनीसाठी इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यातील रक्ताळलेल्या चकमकींचे, पॅलेस्टाइनच्या वस्त्यांमध्ये इस्रायली लष्कर आणि पोलिसांकडून नित्यनेमाने टाकल्या जाणाऱ्या छाप्यांचे वार्ताकन करीत राहिल्या. हा टापू एखाद्या युद्धभूमीपेक्षा वेगळा नाही. या दोघा शेजाऱ्यांमधील दावे-प्रतिदावे डझनावारी शांतता परिषदा भरवूनही सुरूच आहेत. पश्चिम किनारपट्टी आणि गाझा किनारपट्टीवर – पॅलेस्टिनींच्या दावा सांगितलेल्या भूभागांवर वस्त्या उभारण्याचे इस्रायलने थांबवलेले नाही. या रेटय़ाला लष्करी किंवा पोलिसी बळाने प्रतिकार करण्याची क्षमता नसल्यामुळे, इस्रायली सैनिकांवर व नागरिकांवर दहशतवादी हल्ले करण्याचा तितकाच चुकीचा मार्ग निवडण्याची अघोषित परवानगी पॅलेस्टिनी प्रशासनाने हमास आदी संघटनांना दिली. त्यामुळे या दोन्ही समूहांमध्ये दीर्घकाळ शांतता नांदते आहे असे चित्र कित्येक दशकांत दिसलेले नाही. सबब, जगातील अत्यंत अस्थिर, अस्वस्थ आणि धोकादायक टापूंपैकी हा एक. या टापूमध्ये पॅलेस्टिनी मूळ असूनही पत्रकारितेचा पेशा निवडणे हे तर आणखी जोखमीचे. पण जॉर्डन विद्यापीठातून मुद्रित पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर आणि छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या केल्यानंतर १९९७ मध्ये शिरीन अल जझीरा वाहिनीत रुजू झाल्या आणि तेथेच रमल्या. अल जझीराच्या सुरुवातीच्या प्रत्यक्षस्थळ (फील्ड) पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्याकडे पाहूनच अनेक पॅलेस्टिनी अरब मुली पत्रकारितेकडे वळल्या. पूर्व जेरुसलेममध्ये त्यांचा मुक्काम असे. बहुतेकदा इस्रायलच्या छापेसत्रांचे – जे बहुतेकदा पॅलेस्टिनी ताब्यातील गाझा पट्टी आणि पश्चिम किनारपट्टीमध्येच होतात – वार्ताकन शिरीन करायच्या. परवाही पश्चिम किनारपट्टीवरील जेनिन शहरातील एका वस्तीत त्या गेल्या होत्या, त्या वेळी एका गोळीने त्यांचा वेध घेतला आणि त्या रुग्णालयात गतप्राण झाल्या. ठळकपणे ‘प्रेस’ दिसेल असे जाकीट आणि शिरस्त्राण त्यांनी परिधान केले होते. पॅलेस्टाइनच्या आरोग्य खात्याने त्यांना गोळी लागल्याची आणि नंतर त्या दगावल्याची बातमी प्रसृत केली, त्या वेळी ‘पॅलेस्टिनी हल्लेखोरांच्या गोळय़ांना त्या बळी पडल्या,’ असे इस्रायली पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांनी जाहीर करून टाकले. थोडय़ाच वेळाने इस्रायली संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी ‘गोळी नक्की कोणाच्या बंदुकीतून सुटली हे स्पष्ट झाले नाही’ अशी सारवासारव केली. अल जझीराचा आणखी एक जखमी झालेला पत्रकार, तसेच तेथील वाहिनीच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, इस्रायली छापे सुरू असताना शिरीन त्या भागात होत्या. त्या वेळी पॅलेस्टिनींकडून गोळीबार होत नव्हता. पॅलेस्टिनी बंडखोर उपस्थित होते ते ठिकाण तेथून आणखी दूर होते. इस्रायलने स्नायपर बंदुकीच्या साह्याने शिरीन यांचा वेध घेतला असे पॅलेस्टिनी सरकार आणि अल जझीराचे म्हणणे. शिरीन अबू अक्ले या अरब जगतातील सर्वात सुपरिचित पत्रकार होत्या. ‘शांत स्वभाव, हसतमुख चेहरा, पॅलेस्टिनी विषयाची सखोल जाण होती आणि अविचल आत्मविश्वास’ असे शिरीन यांच्या गुणांचे वर्णन पश्चिम आशियात कार्यरत असलेल्या ‘बीबीसी’च्या जुन्याजाणत्या पत्रकार लिझ डुसेट यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा