एकही ‘ऑस्कर’ पुरस्कार नाही, तरीही हॉलीवूड अभिनेते राय लिओटा ‘लीजंड’ ठरले.. ‘दंतकथा’ या शब्दार्थानुसार ते नसतीलही लीजंड, पण ‘अतुलनीय’ या लक्ष्यार्थानं त्यांचा उल्लेख अनेकांनी लीजंड असाच केला- त्यांना आदरांजली वाहताना. अवघ्या ६७ व्या वर्षी, डोमिनिकन रिपब्लिक या देशात झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती गुरुवारी जाहीर करण्यात आली. तेव्हा रॉबर्ट डि’नीरोसारख्या अभिनेत्यासमोर ‘गुडफेलाज’ या चित्रपटात लिओटा यांनी वठवलेल्या तोडीस तोड भूमिकेची आठवण निघालीच, पण आणखीही एक आठवण आवर्जून निघाली ती म्हणजे त्यांनी एका व्हिडीओ गेममधील पात्राला दिलेल्या आवाजाची!
या आवाजामुळेच तर लिओटा ओळखले जात होते. करारी आवाजाचे अभिनेते सर्वत्र असतातच आणि खलनायकी भूमिकांमध्ये ते शोभतातच. पण लिओटा आणखी वेगळे. त्यांचा आवाज करारी असला तरी अभिनयाचा पोत मात्र अगदी तलम. त्यामुळेच, ‘‘मला गँगस्टरच व्हायचं होतं.. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या महत्त्वाकांक्षेपेक्षाही माझी महत्त्वाकांक्षा गँगस्टर म्हणवण्याचीच होती’’ हे वाक्य त्यांच्या तोंडून ऐकताना ‘गुडफेलाज’मधला हा खलनायक जणू भावना व्यक्त करतो आहे, अंतरीचे गूज सांगतो आहे, असेसुद्धा वाटे! खलनायकांच्या भरड आवाजांमध्ये जो दुष्टाव्याचा भाग असतो (आपल्या सदाशिव अमरापूरकरांनी आवाज भरड नसूनसुद्धा कथानकांच्या गरजेनुरूप आवाजात दुष्टावा आणला होता), तो राय लिओटा यांच्या आवाजात जराही नव्हता. त्यामुळे काय होई? तर त्यांच्या भूमिकांमध्ये त्यांनी कितीही दुष्कृत्ये केली, तरीही ते ‘दुष्कृत्ये करणारा खरा माणूस’ वाटत. हे मानुषपण आधी १९८० पासून विविध चित्रवाणी मालिकांमध्ये व्यक्त होत राहिले आणि १९८६ मध्ये ‘समिथग वाइल्ड’ या चित्रपटात बहरले. बायकोला मारहाण करणारा अतिसंतापी नवरा, अशी ती भूमिका. त्यानंतरही वर्षांला एखादा चित्रपट, अशा गतीनेच त्यांची कारकीर्द सुरू राहिली आणि मग चौथ्या वर्षी (१९९०) ‘गुडफेलाज’ मिळाला. ‘यशानंतर संधींची कमतरता नसते’ ही उक्ती लिओटा यांच्याबाबतच खरी ठरू शकली असतीच, पण खुद्द लिओटांनी तिला खोटे पाडले. माफिया टोळीनायकाच्या- ‘गँगस्टर’च्या- भूमिका त्यांनी ‘एका छापाच्या’ म्हणून नाकारल्या. इतक्या की, ‘द सोप्रानोज’ ही पुढे गाजलेली चित्रवाणी मालिकाही त्यांनी नाकारली. मात्र अगदी हल्ली या मालिकेचे पूर्वकथानक (प्रीक्वेल) म्हणून ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘द मेनी सेंट्स ऑफ नेवार्क’ या चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी आपण स्वत:च दिग्दर्शकाला भेटलो, हे सांगणारे लिओटा भूमिका नाकारल्याचा काहीसा पश्चात्ताप व्यक्त करू लागले होते. कदाचित आता त्यांच्या वयाला शोभणाऱ्या अधिक भूमिका त्यांना मिळाल्या असत्या, किंबहुना त्यांनी त्या स्वीकारल्याही होत्या. अद्याप चित्रीकरण सुरू असलेल्या तीन चित्रपटांत ते होते आणि आणखी तीन चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ते प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
पण मध्यंतरीच्या काळात अति-चोखंदळ राहून, भूमिकांचे वैविध्य जपण्यासाठी चित्रपट नाकारणारे लिओटा साधारण २००२ साली एका वेगळय़ाच उद्योगात गुंतले होते. त्या २० वर्षांपूर्वीच्या काळात, ‘ग्रँड थेफ्ट ऑटो (जीटीए) व्हाइस-सिटी’ या संगणकीय खेळासाठी त्यांनी आवाज दिला. व्हाइस सिटी अर्थात अवगुणनगरीचे महापौर असे त्यांचे पात्र होते. पडद्यावर ते दिसले नाहीत.. पण या आवाजामुळेच, आज तिशीत असलेल्या पिढीसाठी ते ‘लीजंड’ ठरले.. अतुलनीय आणि स्मरणीय!