पृथ्वीचा किमान सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे, त्यातील ९६.५ टक्के पाणी महासागरात आहे, त्यामुळे भूपृष्ठावर होणाऱ्या घडामोडींइतकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्त्व सागरांच्या संशोधनाला असायला हवे, कारण आपले हवामान, पाऊस, दुष्काळ या बहुतांश बाबी तेथील घडामोडींवर विसंबून असतात. एल निनो व ला निना या सागरी परिणामांमुळे मान्सूनवर होणारा परिणाम हाही आता सामान्यांच्या आकलनाचा भाग ठरला आहे. सागरी विज्ञानातील हे सगळे संशोधन आताच्या पातळीपर्यंत आणण्यात वॉल्टर मुंक यांचा मोठा वाटा होता. भौतिकशास्त्रात आइन्स्टाइनच्या संशोधनाचे जे महत्त्व होते तेच मुंक यांच्या संशोधनाचे सागरी विज्ञानात होते. त्यांच्या निधनाने सागरी विज्ञानाच्या या आइन्स्टाइनला आपण गमावले आहे. विशेष म्हणजे मुंक यांचे निधनही सागरानजीक असलेल्या त्यांच्या निवासस्थानीच निधन झाले.
तेथील स्क्रीप्स इन्स्टिटय़ूशन ऑफ ओशनोग्राफी या संस्थेला त्यांच्या संशोधनामुळेच जगात नाव मिळाले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांचे सागरी हवामान अंदाज अमेरिकी सैन्याला विशेष लाभदायी ठरले, कारण त्यावरूनच सैन्य कुठे व केव्हा उतरवायचे हे ठरवले जात होते. १९५०च्या सुमारास अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती, त्याचे निरीक्षण त्यांनी एका भल्या मोठय़ा बोटीतून केले होते. सागरी जीवसृष्टीच्या विविधतेचे त्यांना तेवढेच कुतूहल होते, उडण्याचा आभास निर्माण करणाऱ्या एका सागरी प्राण्याला त्यांचे नावही देण्यात आले होते. त्यांचे बालपण ऑस्ट्रियात गेले. नंतर स्कीइंगच्या वेडातून त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्षही केले. आई-वडिलांनी मुंक यांना नंतर कोलंबिया विद्यापीठात पाठवले, तेथे ते मार्ग प्रशस्त करीत गेले. १९५०-६०च्या सुमारास त्यांनी खोल सागरात मोहिमा आखल्या. सागरी प्रवाहांचा अभ्यास करून पृथ्वी का थरथरते याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. वर अवकाशात पाहण्याइतकेच खाली म्हणजे सागराकडे पाहणेही महत्त्वाचे आहे हे त्यांनी दाखवून दिले. त्यातूनच त्यांनी जगातील वैज्ञानिकांना गोळा करून पृथ्वीच्या रचना, उत्क्रांतीचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी सुरू केलेला ‘मोहोल’ प्रकल्प फसला खरा, पण सागरातील ध्वनिलहरींच्या मदतीने सागरी उत्खनन सोपे करता येते हा महत्त्वाचा धडा त्यातून वैज्ञानिकांना मिळाला. अखेपर्यंत ते उत्साही होते, युरोपातच नव्हे तर इतर अनेक ठिकाणी त्यांची भटकंती सुरू राहिली. मुंक यांचे संशोधन हे सागर विज्ञानासाठी मूलभूत असेच आहे.