भारतीय हवाई दलातील लढाऊ जबाबदाऱ्याही आता महिलांकडे दिल्या जातील, हे वृत्त अलीकडे आले. इथवरचा प्रवास आपण आता कुठे केला, हेही त्यातून उघड झाले. पण महिलांना भारतीय हवाई दलात स्थान मिळण्याच्या या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यांपैकी एक म्हणजे ‘विशिष्ट सेवा मेडल’च्या मानकरी, विंग कमांडर विजयालक्ष्मी रमणन. हवाई दलातील सुमारे २५ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर, वयाच्या ९२व्या वर्षी बेंगळूरु येथे रविवारी (१८ ऑक्टोबर) त्यांचे निधन झाले.

त्यांचा उमेदवारीचा काळ महिलांसाठी किती निराळा होता, याची कल्पना येण्यासाठी १९२७ साली जन्म, १९४३ साली मद्रासहून ‘एमबीबीएस’ पदवी, विवाहानंतर उच्चशिक्षण आणि १९४८ मध्ये ‘एमडी’ ही पदव्युत्तर वैद्यकीय पदवी, ही सनावळी कदाचित उपयोगी पडेल. पण वडील टी.डी. नारायणन अय्यर हेही (ब्रिटिश) सैन्यात होते, पहिल्या महायुद्धात लढले होते आणि घराणे प्रागतिक विचारांचे होते. स्वत: विजयालक्ष्मी कुशाग्रबुद्धी होत्या.मद्रास विद्यापीठाचे बेलफोर सुवर्णपदकही त्यांनी मिळवले होते. १९५५ मध्ये त्यांची निवड ‘इंडियन आर्मी मेडिकल कोअर’मध्ये झाली. परंतु पती – विंग कमांडर के. व्ही. रमणन हवाई दलात, शिवाय लष्करात ‘कमिशन्ड ऑफिसर’ होण्याची संधी कमी, म्हणून काही महिन्यांत (१९५६ साली) त्या हवाई दलाच्या बेंगळूरु रुग्णालयात रुजू झाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या ‘विंग कमांडर’ असल्या, कमिशन्ड ऑफिसर – म्हणजे पूर्ण दर्जाच्या अधिकारी असल्या, महिला म्हणून वेळेत कोणतीही सवलत न घेणाऱ्या  पदावर असल्या, तरी विजयालक्ष्मी यांच्याकडे लढाऊ जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. त्या डॉक्टर होत्या. स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र यांतील विशेषज्ञ असल्यामुळे हवाई दलाच्या कुटुंब रुग्णालयांत त्यांना अधिक काळ काम करावे लागले. अर्थात, हेही काम रात्रीबेरात्री कधीही डॉक्टरची गरज भासेल असे, ते त्यांनी उत्तमरीत्या केलेच. शिवाय, भारतास १९६२, १९६६ आणि १९७२ मध्ये लढाव्या लागलेल्या युद्धांत जखमी सैनिकांवर उपचारांची जबाबदारीही त्यांनी निभावली होती. कुटुंब रुग्णालयाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असताना कुटुंब नियोजन प्रसारात त्यांनी अग्रस्था मिळवले. विंग कमांडर हा हुद्दा त्यांना बऱ्याच काळाने मिळाला, ‘विशिष्ट सेवा मेडल’ तर १९७७ मध्ये मिळाले. मात्र त्याआधी, हवाई दलातील हुद्देदार अधिकारी महिलांनी पुरुषांसारखा शर्ट-विजार पोशाख न करता साडी नेसल्यास ती कशी असावी, ब्लाऊजचे हात पुरुषी शर्टाप्रमाणे मनगटापर्यंत असावेत की कोपरापर्यंत चालतील, याचा विचार हवाई दलास त्यांच्यामुळे करावा लागला!