२०१२ मधील दिल्ली बलात्कारानंतर रस्त्यावर उतरलेल्या महिलांमध्ये वयाची पासष्टी पार केलेल्या कमला भसीन होत्याच. पण २०१८ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकविरोधी आंदोलनातही त्या दिसल्या आणि २०२० च्या फेब्रुवारीत, ‘‘भाजपनेत्यांची द्वेषपूर्ण वक्तव्ये राजकीय सूड घेण्याचा मार्ग म्हणून बलात्काराला समर्थन देणारी ठरत आहेत’’ असे सरकारला सुनावण्यातही त्या आघाडीवर होत्या. भसीन यांच्यावर जल्पकांच्या टोळ्यांनी तोंडसुख घेण्यास एवढय़ा गोष्टी पुरेशा होत्याच, पण ‘हर जोर जुल्म से.. आजादी! जातिवाद से.. आजादी!’ अशा सामाजिक दोषांपासून ‘आजादी’ची घोषणा भसीन यांचीच, हे तर गेल्या काही वर्षांत त्यांना टीकेचे लक्ष्य केले जाण्याचे मूळ कारण होते. त्यांना वैरी मानणाऱ्यांना ‘मरणान्तानि वैराणि’ वगैरे नीतितत्त्वे माहीत असतील वा नसतील, पण कमला भसीन हे एक लोभस, बुलंद, ठाम व्यक्तिमत्त्व होते ही बाजू भसीन यांच्या निधनानंतरच उजळून निघाली. पुरुषांना नव्हे, पुरुषसत्ताकतेला विरोध- ती घट्ट करणाऱ्या स्त्रियांनाही विरोधच, इतक्या सरळसाध्या शब्दांत ‘नारीवाद’ समजावून सांगण्याची हातोटी कमला भसीन यांच्याकडे होती. १९४६ साली अखंड पंजाबात जन्मलेल्या कमला राजस्थानात वाढल्या. वडील डॉक्टर असल्याने शिक्षण उत्तम मिळालेच पण ग्रामीण जीवनही पाहाता आले. एम. ए. नंतर वैकासिक समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्तीवर म्युन्स्टर विद्यापीठात त्या गेल्या आणि तेथून मायदेशी परतल्यावर राजस्थानातच कार्यरत झाल्या. दिल्लीत येणे झाले ते लग्नानंतर. इथे संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न व कृषी संघटने’त काम करताना दक्षिण आशियाई देशांचे तळागाळातील जिणे त्यांनी संवेदनशीलतेने पाहिले. १९७४ पासूनच्या स्त्रीवादी चळवळीशी, ‘जागोरी’सारख्या संस्थांशी त्यांचा संबंध होताच. निव्वळ अधिकारपदावर राहायचे नाही, लोकांमध्ये काम करायचे, ही ऊर्मी जिवंत होती.  १९८६ सालच्या ‘नारीवाद प्रश्नोत्तरी’पासून पुस्तकांचे लेखनही त्यांनी सुरू ठेवले होते. ‘व्हॉट इज पॅट्रिआर्की?’ (१९९३ – सैद्धान्तिक विचाराला सामाजिक निरीक्षणांची जोड देणारे लिखाण) आणि ‘बॉर्डर्स अ‍ॅण्ड बाउण्ड्रीज’ (१९९८- फाळणी व महिला यांच्या आलेखातून कट्टरतेला नकार देण्याचे प्रतिपादन) या पुस्तकांच्या नंतरचे- २००२ मध्ये नोकरी सोडल्यानंतर लिहून पूर्ण केलेले- ‘एक्स्प्लोअिरग मॅस्क्युलिनिटीज’ हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर सकस मानले गेले. स्त्रीवाद हा माणूस म्हणून जगण्याचा आग्रह असल्याने तो परका असूच शकत नाही, उलट लोकशाही, धर्मनिरपेक्षता हे आग्रहदेखील स्त्रीवादी ठरतात, अशी त्यांची धारणा होती. ती संघटनकार्य आणि लिखाण या दोन्हीतून दिसली. जातीअंताचा लढा स्त्रीवादातून उभारण्यात त्या कमी पडल्याची टीका करणारेच, त्यांचे कार्य पुढे नेऊ शकतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा