भारतीय समाजशास्त्र अभ्यासायचे म्हणजे काय करायचे? जात-वर्ण व्यवस्था आणि ‘आधुनिक’ म्हणवली जाणारी समाजशास्त्र ही पाश्चात्त्य विद्याशाखा यांची सांधेजोड का करायची आणि कशी? संस्कृतीकरण, पाश्चात्त्यीकरण या (एम. एन. श्रीनिवास यांनी मांडलेल्या) संकल्पनांना आज कितपत महत्त्व द्यायचे? ‘जागतिकीकरणोत्तर’ भारतात दिसणारे अस्मिताकारण अभ्यासण्यासाठी कोणत्या संकल्पना उपयोगी पडतील? – यातील एकाही प्रश्नाचे उत्तर केवळ समाज-अभ्यासातून मिळणारे नाही. त्यासाठी सैद्धान्तिक बैठक हवी. ती देण्याचे काम ज्यांनी केले होते; ते योगेन्द्र सिंह १० मेच्या रविवारी सकाळी निवर्तले. देशभर अनेक शिष्य, शिष्यांचे शिष्य अशा पिढय़ा त्यांनी घडवल्या होत्या. ‘मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन’ (१९७३) ते ‘कल्चरल चेंज इन इंडिया : आयडेंटिटी अॅण्ड ग्लोबलायझेशन’(२०००) असा त्यांच्या प्रत्यक्ष समाज-अभ्यासाचा आवाका होता. त्यांनी एकंदर आठ पुस्तके स्वतंत्रपणे लिहिली, तर आणखी चार पुस्तकांचे सहलेखन आणि ‘फॉर अ सोश्यॉलॉजी ऑफ इंडिया’ (१९६७) या, भारतीय समाजशास्त्राने कशाचा अभ्यास करावा आणि कसा, हे शोधू पाहणाऱ्या निबंधसंग्रहाचे सह-संपादन केले. पाहण्या, सर्वेक्षणे अशा स्वरूपाच्या प्राथमिक अभ्यासाचे महत्त्व ते नाकारत नसत. पण सैद्धान्तिकदृष्टय़ा आपण काही भर घालतो आहोत का, याचे भान अभ्यासकाने नेहमी ठेवावे, ही त्यांची शिकवण होती. उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यतील जमीनदार कुटुंबात १९३२ मध्ये जन्मलेल्या योगेन्द्र सिंह यांनी समाजाची अनेक स्थित्यंतरे पाहिली, तसेच समाजशास्त्र या अभ्यासशाखेतील अनेक बदलही पाहिले- काही घडविलेसुद्धा. लखनऊ विद्यापीठात पीएच.डी.पर्यंत शिकल्यानंतर आग्रा येथील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये ते शिकवू लागले. तेथून जयपूरमध्ये, ‘राजस्थान विद्यापीठा’त समाजशास्त्र विभाग स्थापन करण्यासाठी ते गेले. ‘जोधपूर विद्यापीठा’तही त्यांनी अध्यापनकार्य केले. दिल्लीत ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’ची स्थापना १९६९ मध्ये झाली, पण या विद्यापीठातील ‘समाजशास्त्र शाखा’ १९७१ मध्ये योगेन्द्र सिंह यांनी स्थापन केली. पुढे या विद्यापीठाचे ते ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’(प्रोफेसर एमिरेट्स) झाले. ‘इंडियन सोश्यॉलॉजिकल सोसायटी’ने २०१७ मध्ये त्यांना कारकीर्द-गौरव पुरस्कार दिला होता. अनेक आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतील त्यांच्या निबंधांचे संदर्भ वारंवार दिले जातात, ही त्यांची खरी कीर्ती!
योगेन्द्र सिंह
अनेक आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतील त्यांच्या निबंधांचे संदर्भ वारंवार दिले जातात, ही त्यांची खरी कीर्ती!
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2020 at 00:01 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra singh profile abn