विश्वनाथन आनंद गेल्या शतकात भारताचा पहिला बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टर बनला त्या वेळी तो १८ वर्षांचा होता. हल्ली मात्र भारतात मुले टीनएजर होण्यापूर्वीच ग्रॅण्डमास्टर होतात की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. आर. प्रज्ञानंद गेल्या वर्षी ग्रॅण्डमास्टर बनला, तो केवळ १२ वर्षांचा होता. आता तमिळनाडूचाच डी. गुकेश हा बुद्धिबळपटूही १२व्या वर्षीच ग्रॅण्डमास्टर बनला आहे. १९८८ मध्ये आनंद भारताचा पहिला ग्रॅण्डमास्टर बनला होता. तीसेक वर्षांत भारतात गुकेशसह ६० ग्रॅण्डमास्टर बनले, हा आनंदचा महिमाच म्हणावा काय? १५ जानेवारी रोजी वयाची १२ वर्षे ७ महिने आणि १७ दिवस पूर्ण करताना गुकेश भारताचा सर्वात युवा आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा युवा ग्रॅण्डमास्टर बनला. खरे तर या घडीला तो जगातला सर्वात युवा ग्रॅण्डमास्टर आहे, तर सर्वात कमी वयात बुद्धिबळातील हे शिखर गाठण्याचा विक्रम आजही रशियाच्या सर्गेई कार्याकिनच्या (१२ वर्षे ७ महिने) नावावर अबाधित आहे. गेल्या वर्षी प्रज्ञानंदला असल्या आकडय़ांकडे फार लक्ष देऊ नकोस. हवे तितके खेळ,आराम कर, नि तो झाल्यावर भरपूर सराव कर. यातून बुद्धिबळातला आनंद तू लुटू शकशील आणि चांगली कामगिरी आपोआप होईल, असा सल्ला साक्षात विश्वनाथन आनंदने ‘ट्विटर’द्वारे दिलेला आहेच! गुकेशचे वडील डॉ. रजनीकांत हे नाक-कान-घसातज्ज्ञ आणि आई सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. या दोघांना बुद्धिबळ खेळताना पाहून गुकेशला बुद्धिबळाची गोडी निर्माण झाली. बुद्धिबळ प्रशिक्षणात चेन्नईची सर कदाचित जगात कोणत्या शहराला नसेल. वेल्लामल समूहाच्या चेन्नईतील काही शाळांमधून प्रज्ञानंद, गुकेश, मुरली कार्तिकेयन, अरविंद चिदम्बरम असे युवा ग्रॅण्डमास्टर निर्माण झाले. चेन्नईत २०१३ मध्ये आनंद आणि विद्यमान जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात जगज्जेतेपदाची लढत झाली. तिचा गुकेशवर मोठा प्रभाव पडला आणि त्याने अधिक गांभीर्याने बुद्धिबळाचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यातूनच प्रथम आंतरराष्ट्रीय मास्टर आणि नंतर ग्रॅण्डमास्टर किताबासाठीचे आवश्यक नॉर्म मिळवण्यासाठी तो स्पर्धातून खेळू लागला, जिंकूही लागला. प्रथम ग्रॅण्डमास्टर पी. कार्तिकेयन आणि आता ग्रॅण्डमास्टर विष्णू प्रसन्न यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. इतर युवा ग्रॅण्डमास्टरांप्रमाणे आक्रमक न खेळता तो संयत चाली रचून दीर्घकालीन योजनांवर (पोझिशनल प्ले) भर देतो. प्रज्ञानंद आणि निहाल सरीन यांच्यापाठोपाठ गुकेशही केवळ ग्रॅण्डमास्टर बनण्यावर समाधान मानणारा नाही. भविष्यात भारताला आणखी जगज्जेते मिळतील याचीच ही लक्षणे आहेत.
डी. गुकेश
तमिळनाडूचाच डी. गुकेश हा बुद्धिबळपटूही १२व्या वर्षीच ग्रॅण्डमास्टर बनला आहे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 22-01-2019 at 03:35 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngest grandmaster gukesh d