पाकिस्तानातील ‘डॉन’ या इंग्रजी दैनिकाचे स्तंभलेखक आर्देशीर कावसजी वारल्याची बातमी अनेक पाकिस्तानी व दक्षिण आशियाईंना अस्वस्थ करते आहे. आर्देशीर केवळ स्तंभलेखक नव्हते, पाकिस्तानात राहून त्या देशाच्या सदसद्विवेकबुद्धीला सातत्याने आवाहन करण्याचे महाकठीण काम ते करत होते. अत्यल्पसंख्याक पारसी कुटुंबात एक एप्रिल १९२६ रोजी जन्मलेल्या आणि कराचीतील सर्वात मोठी जहाज-वाहतूक कंपनी सांभाळण्यात उमेद घालवलेल्या कावसजींना नफा कमावून, समाजोपयोगी कामांसाठी पैसा वाटून सामाजिक कार्याचे समाधानही मिळवता आले असते. ते त्यांनी केलेच, पण एक विचारी नागरिक म्हणून आपण जिथे राहतो त्या देशाशी आपला संबंध आहे, हे तत्त्व त्यांनी पाळले. बॅ. मोहम्मद अली जिना यांच्याशी आर्देशीर यांच्या वडिलांचा परिचय होता, राजकारण सुधारता येईल असा विश्वासच या कुटुंबाला कराचीत राहण्यास उद्युक्त करत होता. राजकारणाबद्दल आज पाकिस्तानी सर्वसामान्य माणसांना फक्त घृणाच वाटते, त्या सापळय़ापासून आर्देशीर दूर राहू शकले ते याच विश्वासामुळे. ‘तरुणांनो, जमेल तेव्हा हा देश सोडून जा’ अशा मथळय़ाचा एक लेख त्यांनी अलीकडे लिहिला होता, पण त्यामागचा हेतू देश चालवणाऱ्या सर्वच घटकांना ताळय़ावर आणणे हा होता. आर्देशीर यांची कंपनी तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांनी १९७४ मध्ये सरकारजमा केली आणि व्यवस्थापकीय संचालकपद आर्देशीर यांच्याकडे उरले. भुत्तोंची मर्जी तीन वर्षांत फिरली आणि आर्देशीर यांना ७२ दिवस तुरुंगात काढावे लागले. पुढे झिया राजवटीचे स्वागत करणाऱ्यांत आर्देशीरही प्रथम होते, पण नंतर त्यांनी अन्य उद्योजकांप्रमाणे सरकारच्या मागे फरफटणे सोडून दिले. कुटुंबाच्या छोटय़ा-मोठय़ा कंपन्या चालवत, आहे त्यात समाधानी राहिले. १९८८ पासून त्यांनी (जिनांनीच स्थापलेल्या) डॉन दैनिकात स्तंभलेखन सुरू केले आणि बेनझीर यांच्या कौतुकाची प्रचंड लाट असूनही त्यात सामील होणे नाकारले. वैचारिक अत्यल्पसंख्याकांत आर्देशीर यांची गणना होऊ लागली, पण दुसरीकडे लोकांच्या जगण्याला हात घालणारे राजकीय विषय ते मांडत राहिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे २०११मध्ये स्तंभलेखन बंद झाले, तरी तरुण पत्रकारांना आर्देशीर मार्गदर्शन करीत.
आर्देशीर कावसजी
पाकिस्तानातील ‘डॉन’ या इंग्रजी दैनिकाचे स्तंभलेखक आर्देशीर कावसजी वारल्याची बातमी अनेक पाकिस्तानी व दक्षिण आशियाईंना अस्वस्थ करते आहे. आर्देशीर केवळ स्तंभलेखक नव्हते, पाकिस्तानात राहून त्या देशाच्या सदसद्विवेकबुद्धीला सातत्याने आवाहन करण्याचे महाकठीण काम ते करत होते.
आणखी वाचा
First published on: 26-11-2012 at 12:53 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh