अलाहाबाद बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पदावर एक महिन्यापूर्वी  शुभलक्ष्मी पानसे यांची निवड  झाली, तेव्हा मराठीच नव्हे तर अनेक महिलांना त्यांचे उमदे व्यक्तिमत्त्व प्रेरक वाटले होते. पानसे यांच्यापेक्षा खूप निराळय़ा व्यक्तिमत्त्वाच्या, पण तितक्याच कर्तबगार असलेल्या विजयालक्ष्मी अय्यर यांना आता दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेचे- ‘बँक ऑफ इंडिया’चे   सीएमडी पद मिळाले आहे. या पदाचा कार्यभार त्यांनी नुकताच स्वीकारला. राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखपदाला साजेसे बहुविध क्षेत्रांतील कर्तृत्व विजयालक्ष्मी यांच्या गाठीशी नक्कीच आहे. एम. कॉम आणि सीएआयआयबी पदव्या घेऊन त्यांनी १९७५ मध्ये बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला. युनियन बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये नऊ वर्षांत त्यांच्या प्राथमिक बढत्यांचा प्रवास झाला. १९८४ पासून त्यांनी नवनवी व्यावसायिक आव्हाने स्वीकारण्याची सुरुवात केली.. बँकेच्या क्रेडिट विभागात त्या रुजू झाल्या आणि तिथे १५ वर्षांत तर त्यांनी कर्तृत्वाचा दबदबाच मुंबई व पुण्यासारख्या मोठी कर्जमागणी असलेल्या ठिकाणी निर्माण केला. राष्ट्रीयीकृत बँकांना काळासोबत बदलण्यासाठी उशीरच झालेला असताना, २००० मध्ये विजयालक्ष्मी यांना युनियन बँकेचे ‘रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंट’ स्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली, ती त्यांनी यशस्वी केल्यामुळेच नवे काही करायचे तर ते विजया मॅडमच्या हाती सोपवावे, असे समीकरणच तयार झाले आणि २००६ मध्ये युनियन बँकेमधील माहिती तंत्रज्ञान विभागाचे उप-सरसंचालक पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले.  रिस्क मॅनेजमेंट आणि माहिती-तंत्रज्ञान या दोन्ही खात्यांचे सरसंचालकपद दोनच वर्षांत (जानेवारी २००८) त्यांच्याहाती आले आणि ‘कोअर बँकिंग’च्या छत्राखाली २५०० शाखा आणण्याचा त्यांचा धडाका अवघ्या दीड वर्षांत दिसला. युनियन बँकेनेही त्यांना कार्यकारी संचालकपद दिले होते, परंतु एक सप्टेंबर २०१० पासून विजयालक्ष्मी अय्यर सेंट्रल बँकेच्या कार्यकारी संचालक झाल्या.  तेथे अष्टावधानी व्यवस्थापक म्हणून त्यांचा लौकिक झाल्यावर त्यांना सर्वोच्च पद मिळाले आहे. शुभलक्ष्मी यांच्यानंतर विजयालक्ष्मी यांची पावले सर्वानाच अनुकरणीय वाटतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा