चतुरस्त्र आणि नेमस्त म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांचे नगर जिल्ह्य़ात स्वतंत्र स्थान होते. उच्चशिक्षणाने त्यांच्यातील सजग नेता घडला. सार्वजनिक जीवनात उणीपुरी पासष्ट वर्षे अग्रभागी राहून ते काळाच्या पडद्याआड गेले. कोपरगाव तालुक्यातील छोटय़ाशा गावात प्रतिकूल परिस्थितीत शंकरराव काळे यांनी जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले. १९४८ मध्ये अभियांत्रिकीतील पदवी घेतल्यानंतर त्या काळात त्यांना कुठल्याही सरकारी खात्यात मोठय़ा पगाराची व हुद्दय़ाची नोकरी मिळाली असती. काही काळ त्यांनी ती केलीही, मात्र ते त्यात रमले नाहीत. सुधारणावादी विचारांची पक्की बैठक लाभल्याने डाव्या विचारसरणीकडे त्यांचा कल होता. नोकरीला रामराम ठोकून त्यांनी जाणीवपूर्वक शेकापच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनाला सुरूवात केली. याच दरम्यान इतर काही ज्येष्ठांच्या सहकार्याने माहेगाव देशमुखच्या माळरानावर शंकरराव काळे यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे रोपटे लावले, या सहकारी उद्योगसमूहामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट झाला. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाणांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या वाटेने नवा राजकीय प्रवास सुरू केला. राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज्यव्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर नगरच्या जिल्हा पषिदेचे पहिले अध्यक्ष म्हणून सलग दहा वर्षे त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा पाया रचला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हीच त्यांच्या राजकारणाची पायाभरणी ठरली. या जोरावर त्यांनी स्वत:चा कोपरगाव तालुका सोडून पारनेरमधून विधानसभेत प्रवेश केला. पुलोदच्या मंत्रिमंडळात त्यांना शिक्षण व सहकार या त्यांच्या आवडीच्या खात्यांचे राज्यमंत्रिपद मिळाले होते. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला वाहून घेताना दीर्घ काळ त्यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. राजकीय जीवनात त्यांनी मोठा संघर्षही केला. अनेक चढउतार, पराभवही लीलया पचवले. आपलाच तालुका आपल्याला स्वीकारत नाही याची खंत त्यांना होती, मात्र १९९० मध्ये त्यांना लोकसभेत पाठवून कोपरगावकरांनी ही खंतही दूर केली. यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्र ‘साहेब’ म्हणून ओळखतो, ते यशवंतराव मात्र शंकररावांचा नेहमी ‘साहेब’ म्हणून उल्लेख करीत. बहुधा त्यामुळेच त्यांचे ‘काळे साहेब’ हे नाव रूढ झाले असावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा