कोणतीही संस्था नावारूपास आल्यानंतर तिचा नावलौकिक टिकविणे, वाढवणे हे एक आव्हानच असते. कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी मुला-मुलींमध्ये शारीरिक शिक्षणाची व तंदुरुस्तीची आवड निर्माण व्हावी, मराठी मुलांनी सैन्यदलात जावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली आणि ही संस्था नावारूपास आणली. या संस्थेचा नावलौकिक टिकविण्याची आणि भारतीय खेळांना प्रोत्साहन मिळवून देण्याची जबाबदारी शिवरामपंतांनंतर त्यांचे चिरंजीव रमेश यांनी स्वीकारली. महाराष्ट्र बँकेत नोकरी असताना रमेश दामले यांनी मंडळाच्या कार्याचा विस्तार करण्याच्या कामात कधीही खंड पडू दिला नाही. अल्प शुल्कामध्ये जलतरण, व्यायामसुविधा देऊन सर्वसामान्यांत व्यायामप्रसार करण्याचे कार्य त्यांनी केले. मलखांब, कुस्ती, जिम्नॅस्टिक्स आदी खेळांच्या स्पर्धासाठी मंडळ हे एक हक्काचे व्यासपीठच त्यांनी निर्माण करून दिले. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर गेली वीस वर्षे अहोरात्र त्यांनी मंडळाच्या विकासकार्यात झोकून दिले होते. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयामार्फत त्यांनी आजपर्यंत शेकडो क्रीडाशिक्षक निर्माण केले. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांना शारीरिक शिक्षणाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम करणे शक्य नसते, अशा शिक्षकांकरिता वासंतिक सुटीमध्ये दीड-दोन महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करून त्यांनी या शिक्षकांमध्येही शारीरिक शिक्षणाची आवड निर्माण केली. सामाजिक संस्थेस आर्थिक पाठबळ उभे करायचे असेल तर संस्थेच्या कामाची सतत प्रसिद्धी करणे आवश्यक आहे याचे उदाहरणच त्यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांना प्रसिद्धी मिळवत सिद्ध केले. अजातशत्रू म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या रमेश दामले यांनी नवोदित मल्लांकरिता दरवर्षी कुस्तीचे मैदान आयोजित करण्याचा उपक्रम अव्याहत चालविला होता. या मैदानात तयार झालेल्या अनेक खेळाडूंनी नंतर राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. मलखांब, कुस्ती, जिम्नॅस्टिक्स आदी खेळांना प्रायोजक मिळणे खूप कठीण मानले जाते, मात्र दामले यांनी आपल्या व्यापक जनसंपर्काच्या जोरावर याही खेळांच्या स्पर्धासाठी अनेक प्रायोजक मिळवून दिले.
रमेश दामले
कोणतीही संस्था नावारूपास आल्यानंतर तिचा नावलौकिक टिकविणे, वाढवणे हे एक आव्हानच असते. कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी मुला-मुलींमध्ये शारीरिक शिक्षणाची व तंदुरुस्तीची आवड निर्माण व्हावी, मराठी मुलांनी सैन्यदलात जावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली आणि ही संस्था नावारूपास आणली.
First published on: 27-11-2012 at 12:04 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh sports organiser ramesh damle