मारिया अगाथा फ्रान्झिस्का गोबर्तिना व्हान ट्राप.. हे तिचे (एकटीचे) नाव. जग मात्र तिला ओळखत होते ते ‘साऊंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट ज्यांच्यावरून निघाला, त्या ट्राप भावंडांमधली सातांपैकी तिसरी म्हणून. गाण्यांसाठीच अधिक गाजलेल्या आणि अनेकांनी लहानपणीच पाहिलेल्या त्या चित्रपटाची कथा बऱ्याच जणांना मोठेपणीही आठवत असेल : ऑस्ट्रियातले ते सात भावंडांचे कुटुंब, आईचा मृत्यू झाल्यावर वडिलांकडून एका गव्हर्नेसची नियुक्ती आणि वडिलांच्या लष्करी शिस्तीला मुरड घालून, त्या गव्हर्नेसने या कुटुंबातील मुलांना दिलेले संगीताचे धडे.. पुढे याच संगीताच्या आधाराने अख्ख्या कुटुंबाने ऑस्ट्रिया युद्धाच्या खाईत लोटला जात असताना, अक्षरश: गाणी म्हणत केलेले पलायन.. ही चित्तरकथा मारियाच्या आयुष्यात जरा कळत्या वयात, म्हणजे ती विशीच्या उंबरठय़ावर असताना प्रत्यक्ष घडली. साल्झबर्गमधून आपल्या मुलांना कुठेही जावे लागू नये, अशी वडील जॉर्ग व्हान ट्राप यांची कळकळ, परंतु हिटलरी रागाचे धनी झाल्यामुळे हे कुटुंब घरदार सोडून देशोधडीला लागले, मैलोगणती पायी फिरत, त्यांनी जागोजागी गाण्याचे कार्यक्रम केले. आम्ही कुठेही पळून चाललेलो नाही, संगीताच्या या कार्यक्रमासाठी इथे आलो आहोत, हा या कुटुंबाचा नेहमीचा बचाव! अगदी धाकटी मार्टिना, तिच्याआधीची योहाना, सर्वात थोरला रूपर्ट, त्याच्या पाठची अगाथे, तिच्याहून धाकटे वेर्नर आणि हेड्विग हे सारेच्या सारे गात.. या सप्तसुरांच्याच साथीने, महायुद्ध सुरू होण्याच्या आत- १९३८ सालीच अमेरिकेस सुखरूप पोहोचण्यात हे कुटुंब यशस्वी ठरले. लहानपणीच असे अनुभव आलेल्या मारियाचे अमेरिकेतील तरुणपणही गात-गातच सुरू झाले. तिथे १९४२ पर्यंत देशभर दौरा, पुढे १९४७ पर्यंत, म्हणजे वडिलांच्या मृत्यूपर्यंत अनेक ठिकाणी कार्यक्रमांची निमंत्रणे अशी पायाला चाके लावूनच हे कुटुंब अमेरिकेत बस्तान बसवू पाहत होते. मारिया आणि तिची शिक्षिका- दुसरी आई (हीदेखील मारियाच, मारिया ऑगुस्ता) या दोघींना १९४८ साली अमेरिकी नागरिकत्व मिळाले, पण वर्षभरापूर्वीच वडिलांचे छत्र हरपले होते. काही बहिणींची लग्ने झाली होती. धाकटी मार्टिना अल्पजीवी ठरली. अशाही स्थितीत, १९५० साली ऑस्ट्रियात पुन्हा घर घेण्याचा बेत या भावंडांनी आईच्या मदतीने तडीस नेला. तरीही मारिया मायलेकी, सन १९५५ पर्यंत जगात कुठे ना कुठे संगीताचे कार्यक्रम करीत राहिल्या. मग एका धर्मादाय संस्थेतर्फे पापुआ न्यू गिनीमध्ये त्यांनी सेवाकार्यालाही वाहून घेतले. २८ सप्टेंबर १९१४ रोजी जन्मलेल्या मारिया अगाथा ९९ व्या वर्षी गेल्या. अखेपर्यंत त्या अविवाहित होत्या. संहार आणि संगीत यांची ओळख लहानपणीच झालेल्या या व्हायोलिन- पियानोवादक मुलीला वृद्धपणी विरक्तीचीच साथ होती.

 

Story img Loader