भारतातील उद्योगधुरिणांच्या यादीत मॅक्स इंडियाचे संस्थापक व व्होडाफोन इंडियाचे अध्यक्ष अनलजित सिंग यांचे नाव अग्रस्थानी आहे यात शंका नाही. त्यांना व्यक्तिगत नेतृत्व व समाजातील योगदानासाठी यंदाचा सुवर्ण मयूर पुरस्कार नुकताच लंडनमध्ये प्रदान करण्यात आला. युरोपातील काही नामवंत संस्थांकडून हा पुरस्कार दिला जातो. अनलजित सिंग यांची उद्योगव्यवसायातील कारकीर्द एका घरगुती अन्यायाच्या कहाणीतून नावारूपास आलेली आहे.
त्यांचे वडील भाई मोहन सिंग यांनी संपत्तीचे वाटप करताना त्यांचे दोन मोठे बंधू परविंदर व भाई मनजित सिंग यांना झुकते माप दिले. त्यात परविंदर यांच्या वाटेला सोन्याची कोंबडी म्हणजे रणबक्षी (रॅनबॅक्सी) ही कंपनी, तर मनजित यांच्या वाटेला रुपेरी पान म्हणजे स्थावर मालमत्ता आली. अनलजित यांच्या वाटेला आली ती ओखला येथील वडिलोपार्जित कंपनी. तिथे फक्त कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचे काम उरलेले होते. या दोघा बंधूंच्या तोडीस तोड मेहनत करून अनलजित यांनी नाव मिळवले. त्यांचे शालेय शिक्षण डून स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे झाले. १९८६ मध्ये ते अमेरिकेतील बोस्टन येथून एमबीए होऊन परतले, तेव्हा त्यांनी औषध उद्योगात उडी घेतली, आपले बंधू परविंदर हे रणबक्षी कंपनीचे प्रमुख असताना त्यांनी त्याच उद्योगात पाऊल ठेवून स्पर्धेची तयारी केली, पण हे धाडस त्यांना पेलता आले नाही. १९९२ मध्ये जेव्हा त्यांनी हाँगकाँगच्या हचिन्सन टेलिकम्युनिकेशन्सशी भागीदारी केली तेव्हा त्यांचे भाग्य उजळले. मुंबईतील केवळ एका परिक्षेत्रात सहा वर्षांत त्यांनी १३६८ कोटींची उलाढाल केली. नंतर या व्यवसायाचा विस्तार करण्यात मात्र त्यांना यश आले नाही त्यामुळे त्यांनी ५६१ कोटींना ही कंपनी विकली. पुढे त्यांनी मॅक्स इंडिया, मॅक्स न्यूलाईफ इन्शुरन्स, मॅक्स हेल्थकेअर, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स या कंपन्या स्थापन केल्या. आज त्यांच्या मॅक्स समूहाची वार्षिक उलाढाल ८० अब्ज रुपये आहे, ग्राहक संख्या ५० लाख आहे. भारतात या कंपनीची कर्मचारीसंख्या ५४ हजार आहे.  बदलत्या व्यावसायिक प्रवाहांशी जुळते घेऊन नवीन कल्पनांचा अंगिकार हे त्यांच्या यशाचे प्रमुख गमक आहे.

Story img Loader