सांगली महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता भाजपसह सर्व विरोधकांची मोट बांधली आणि सत्ता उपभोगली. आता  याच जयंत पाटलांना सांगलीकरांनी धूळ चारली. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना    प. महाराष्ट्रातच पराभवाचा धक्का बसल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना त्याची नक्कीच दखल घ्यावी लागेल..
केंद्रात सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भर दिला असतानाच बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बसलेला झटका राष्ट्रवादीसाठी निश्चितच धक्कादायक आहे. सांगली-मिरज-कुपवाडा महापालिका निवडणुकीत बहुमत मिळवून काँग्रेसने गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला चांगलाच धक्का दिला. वास्तविक सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. राज्यातील सांगली आणि नंदुरबार हे लोकसभेचे दोनच मतदारसंघ असे आहेत की राज्याच्या स्थापनेपासून कायम काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघांतून निवडून येतात. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या प्रभावामुळे सांगली जिल्हय़ावर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या सांगली महापालिका निवडणुकीनंतर जयंत पाटील यांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता भाजपसह साऱ्या विरोधकांची मोट बांधली आणि सत्ता उपभोगली. पाच वर्षांनंतर याच जयंत पाटील यांना सांगलीकरांनी धूळ चारली. सांगलीच्या राजकारणात वसंतदादा पाटील आणि जयंतरावांचे वडील राजारामबापू पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत होते. राजारामबापू जनता पक्षात गेल्यावर वसंतदादांनी आपली सारी ताकद पणाला लावून विधानसभा निवडणुकीत राजारामबापूंचा पराभव केला होता, हा सांगलीचा इतिहास आहे. वसंतदादांच्या घराण्याला राजकीयदृष्टय़ा संपविण्याकरिता जयंत पाटील यांनी जोर लावला. लोकसभा निवडणुकीत वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांच्या पराभवासाठी जयंतरावांनी पडद्याआडून बरेच उद्योग केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सांगली परिसरात झालेल्या जातीय दंगलीचा काँग्रेसला फटका बसला. ही दंगल मुद्दामहून पेटविण्यात आल्याचा स्थानिक काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भडक प्रचार केला, पण सांगलीकरांनी राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकविला. डॉ. पतंगराव कदम, प्रतीक पाटील, मदन पाटील हे सारे एकत्र आल्याने काँग्रेसला विजय मिळविणे सहजशक्य झाले. जयंत पाटील यांच्याबद्दल प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलेल्या आरोपाचा फायदा काँग्रेसला निश्चितच झाला. काँग्रेसच्या विजयामुळे डॉ. पतंगराव कदम आणि त्यांचे चिरंजीव व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांचे राजकीय वजन नक्कीच वाढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगली जिंकायचीच, या निर्धाराने डॉ. पतंगराव िरगणात उतरले होते व निवडणूक जिंकून दाखविली. सांगलीच्या पराभवानंतर जयंत पाटील यांचे राजकीय भवितव्य काय, असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो. जयंतरावांना हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून भाग पाडले जाईल का, हा खरा प्रश्न आहे. स्वत: जयंत पाटील यांची अजिबात तशी इच्छा दिसत नाही. जयंतराव काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या वावडय़ा अधूनमधून उठत असतात. जयंतरावांनी मुंबईत सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी प्रयत्न केल्याचे जाहीर विधान प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केल्याने ही शक्यता कमी वाटते. कारण असे काही होणार असल्यास माणिकरावांनी तसे विधान केले नसते. सांगलीचे नेतृत्व आपल्याच हाती ठेवण्याच्या जयंतरावांच्या प्रयत्नांना मात्र चांगलाच धक्का बसला. सांगलीत आपली एकहातीच सत्ता असली पाहिजे यातूनच जयंतरावांनी आर. आर. आबा पाटील या दुसऱ्या सांगलीकराला पद्धतशीरपणे प्रचारापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.
सांगली हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसबरोबर आघाडीत आमच्या ताब्यात नसल्याने सांगलीच्या पराभवाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करू शकतात. लोकसभेची निवडणूक जवळ आली असतानाच बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातच पराभवाचा धक्का बसल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना त्याची नक्कीच दखल घ्यावी लागेल. वातावरणनिर्मितीसाठी सांगलीची सत्ता कायम राखणे हे राष्ट्रवादीला आवश्यक होते. बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झाले, हा संदेशही राष्ट्रवादीसाठी त्रासदायक ठरू शकतो. काँग्रेसबरोबर आघाडीत वाटय़ाला येणाऱ्या २२ पैकी १५ जागा निवडून आणण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे. जेणेकरून सत्तास्थापनेत शरद पवार यांचे महत्त्व वाढेल हे त्यामागचे गणित आहे. अर्थात यासाठी राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रावर जोर द्यावा लागेल. साखरपट्टय़ात किंवा पश्चिम महाराष्ट्र (नगर आणि शिर्डीसह) या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या विभागांत लोकसभेच्या एकूण १२ जागा आहेत. यापैकी आठ जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे आहेत. गेल्या वेळी स्वत: शरद पवार, त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि साताऱ्यात उदयनराजे भोसले अशा तीनच जागा निवडून आल्या होत्या. याउलट बालेकिल्ल्यातील पाच जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. राष्ट्रवादीला तिहेरी आकडा गाठायचा असल्यास या पाचही जागा जिंकाव्या लागतील. त्यातच उदयनराजे राष्ट्रवादीबरोबर राहण्याची शक्यता फारच कमी आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून त्याचा निवडणुकीत फायदा होतोच असे नाही, हे सांगलीच्या निकालावरून राष्ट्रवादीला अनुभवास मिळाले. लोकसभेत संख्याबळ वाढविण्याकरिता मतदारांचा विश्वास आधी संपादन करावा लागणार आहे. राष्ट्रवादीत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये बरेच अंतर निर्माण झाले आहे. नेतेमंडळी विचारत नाहीत, अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना बळावली. ठेकेदारमंडळींची चलती झाल्याचे पक्षातील कार्यकर्ते खुलेपणाने बोलू लागले. मधल्या काळात घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांचे निकालही राष्ट्रवादीला प्रतिकूल असेच होते. सिंचन घोटाळा, राज्य बँकेतील गैरव्यवहार यासह पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधात होणाऱ्या आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. जवळपास १४ वर्षे सत्तेत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फटका काही प्रमाणात राष्ट्रवादीला बसत आहे. पक्षाची प्रतिमा सुधारण्याकरिता गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीमध्ये संघटनात्मक आणि सरकारमध्ये बदल केले गेले. सर्व जाती-जमातीबरोबर राहतील या दृष्टीने आखणी करण्यात आली. राज्यातील पक्षाच्या घडामोडींमध्ये स्वत: शरद पवार हे बारीकसारीक बाबींमध्ये लक्ष घालू लागले. राज्यातील दौरे वाढविले आहेत. तरीही राष्ट्रवादीला अजून पोषक वातावरण तयार झालेले नाही, हे सांगलीच्या निकालावरून स्पष्टच झाले.
सांगलीच्या निकालाने काँग्रेसला मात्र नैतिक बळ मिळाले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महापालिकेची सत्ता मिळाली हे काँग्रेससाठी अधिकच फायद्याचे ठरणार आहे. सांगलीत राष्ट्रवादीची जिरली याचा काँग्रेसला जास्त आनंद झाला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री वा नेत्यांवर आरोप होत असताना त्याला जोरकसपणे प्रत्युत्तर दिले जात नाही. म्हणूनच मंत्री व नेत्यांवर होणाऱ्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादीने जरा अधिकच आक्रमक होण्याचे ठरविले. यासाठी जशास तशी भाषा वापरण्याबरोबरच विरोधकांच्या टोप्या उडविण्याचा नवा कार्यक्रम हाती घेण्यात आला. मात्र पोपटपंची करून मते मिळत नाहीत, हा धडा सांगलीच्या निकालावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिकायला मिळाला असेल.
गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले. मुख्यमंत्रिपद मिळणारच हा विश्वास निर्माण झाला. पण सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर झालेले आरोप, त्यांचा राजीनामा किंवा दुष्काळावरून केलेले वादग्रस्त वक्तव्य या साऱ्यांपासून राष्ट्रवादीचा आलेख घसरणीला लागला आहे. लोकसभेच्या १५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत असले तरी १० ते १२ जागा जिंकण्यावर पक्षाचा भर आहे. यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेसाठी िरगणात उतरविले जाणार आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. स्थानिक निवडणुकीच्या निकालावरून राज्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज बांधणे हे चुकीचे ठरणार असले तरी सांगलीचा पराभव राष्ट्रवादीसाठी जिव्हारी लावणारा आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तोही पश्चिम महाराष्ट्रात पराभवाचा फटका बसणे हा राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशाराच आहे.