प्रपंचाचा पाश मनाने तोडायचा पहिला मार्ग महाराज सांगतात तो म्हणजे स्वत:च्या हातानेच ते पाश तात्काळ तोडून टाकायचे. हा आपला मार्ग नव्हे, हेही श्रीमहाराज सांगतात. तरी हा मार्ग सांगणारी जी कथा त्यांनी सांगितली आहे आणि तिचे जे तात्पर्य सांगितले आहे त्याचा विचार करीत आपण आपल्यासारख्या प्रापंचिकांना प्रपंचप्रभावापासून अलिप्त होण्याचा कोणता मार्ग आहे, याकडे वळू. गेल्या भागातल्या कथेप्रमाणे, जन्मानंतर कळू लागले की भगवंताची आवड मनात निर्माण झाली तर अर्धे काम झाले. लहान मुलांमध्ये भगवंताची आवड असतेच, ती जसजशी कमी होते आणि जगाची आवड त्यांच्या मनात रुजू लागते तसतशी त्यांना समज आली, असं मानलं जातं! तर अशी आवड असली तर अर्धे काम झाले. मग सत्पुरुष स्वत:हून अशा साधकाकडे येतात आणि त्याला कृतार्थ करतात. इथे पूर्ण काम झाले. तरीही एवढय़ाने जिवाचं प्रारब्धही स्वस्थ बसलेलं नसतं. ते त्याला भटकवू पाहतं. मग त्या एका भगवंताचं प्रेम ज्या एकाकडून मिळू शकत होतं, त्या जोडीला अनेकांच्या दर्शनासाठी हे मन फिरवतं. त्यानंतर जनरीतीप्रमाणे संसारातही हा साधक पडतो. ज्या प्रारब्धानुसार हा संसार चिकटला त्याच प्रारब्धानुसार तो दुरावतो. जवळची माणसं दुरावतात, जगही दुरावतं. आता तसं पाहता सर्व पाश संपलेले असतात. तरी जन्माला कारणीभूत झालेली जी वासना असते तिला टिकून राहायचं असतं. मग ती परमार्थाच्या परमपदी जाण्याची इच्छा प्रसवून पाहते. हा साधक त्यासाठी मनाने तयार झाला तर मग ती वेगवेगळी कारणं पुढे करून त्या मार्गाच्याच आड येते. सर्व बंधनांपासून मुक्त असूनही लहानशी वासना या मार्गापासून रोखत असते. तिचा समूळ नाश केल्याशिवाय ती नमते घेत नाही. आता हा ‘एक घाव दोन तुकडे’ असा मार्ग जो साधक स्वीकारू शकतो तो त्याच तयारीचा असला पाहिजे. आपला तो मार्ग नव्हे आणि भ्रामक कल्पनेतून कोणी त्या मार्गाचा विचारही करू नये. आपण आधीही पाहिलं की माणूस देहानं एखाद्या गोष्टीचा त्याग पटकन करीलही, पण मनानं जर तो त्याग झाला नसेल तर त्या बाह्य़ त्यागानं काहीही साधणार नाही. तेव्हा आपला मार्ग हा आपल्याला झेपणारा आणि पचणाराच असला पाहिजे. त्या मार्गाच्या वाटचालीनंच आपल्या या सदराचा समारोप होणार आहे. तो मार्ग आता पाहू. हा मार्ग कशासाठी आहे? तो प्रपंचाच्या बंधनातून मनाला सोडवण्यासाठी आहे. ‘मनाला सोडवणारा’ याचा अर्थ प्रपंचात मनाचा अभाव असणे नव्हे! प्रपंचातील प्रेमाचे, सुखाचे क्षण मन भोगीलही पण त्यासाठी लाचार राहाणार नाही. मनाने प्रपंचाच्या गुंत्यातून सुटत असतानाच देहाने मात्र प्रपंचातली सर्व कर्तव्यं पार पाडावीच लागतील.  त्या कर्तव्यांसाठी आवश्यक तेवढा मनाचा सहभागही त्यात राहीलच.  जसजशी आपली ही वाटचाल खोलवर होत जाईल तसतसा प्रपंचाचा मनावरचा प्रभाव पूर्ण ओसरेल. त्यासाठीचा उपाय म्हणजे प्रपंचात भगवंताचं स्मरण, हाच आहे. प्रपंचाच्या काल्यात गोपाळाला आणून त्या काल्याचा गोड असा गोपाळकाला करणे, हाच तो मार्ग आहे.

Story img Loader