समूहाची संस्कृती ही त्या त्या व्यक्तीच्या, समूहाच्या प्रतीकांतनं दिसत असते. निवडणुकांच्या सभांत तलवारी, भाले, बरच्या वगैरे आपल्याकडे मिरवली जात असतील तर ती प्रतीकं काय दाखवतात?
गेल्या निवडणुकीपासून हा प्रश्न जास्तच सतावायला लागलाय. त्या वेळी एका नेत्याच्या प्रचार दौऱ्यात सामील झालो होतो. ते वातावरण पाहणं एक अनुभव असतो. कोणताही नेता आला की त्याच्याशिवाय त्या प्रदेशाला कसा तरणोपाय नाहीच असं सांगणाऱ्या बिलंदरांची फौजच्या फौज लोंबकळत असते. कोणताही पक्षाचा नेता आला तरी ही वटवाघळं तीच असतात. त्यांचं चातुर्य थक्क करणारं. इतका जिवंत अभिनय जमायलासुद्धा कौशल्य लागतं. तर हे असे बिलंदर त्या नेत्याच्या पाया पडणार.. परिस्थिती त्याच्यासाठी वा त्या नेत्याच्या उमेदवारासाठी किती उत्तम आहे याचं वर्णन करणार.. सगळं सेटिंग त्यानं कसं चोख केलंय हेही आवर्जून नमूद करणार. जे नेते असं सांगणाऱ्यांपेक्षा सवाई बिलंदर असतात ते या असल्या हरभऱ्याच्या झाडांकडे दुर्लक्ष करतात आणि कामाला लागतात. मग प्रचारसभा.
ती सुरू होतानाचा जामानिमाही पाहण्यासारखा. या नेत्याला चार पावलंही चालायला लागू नयेत म्हणून अगदी मंचापर्यंत त्याच्या मोटारीसाठी मार्ग केलेला. तिथे हा उतरला. त्या जिन्यावर त्यानं पाऊल टाकलं आणि तिकडे समोर मंचावर दोघांनी जोरदार रणशिंग फुंकायला सुरुवात केली. हे शिंग फुंकणारे खास मुंबईहून आणलेले. डोक्यावर मराठमोळय़ा पगडय़ा. मावळय़ांच्या असतात तशा. ते पोटातली सगळी ताकद काढून, तोंडाचा तांब्या करून शिंग फुंकण्यात मग्न. त्या शिंगांच्या गर्जनेला पाश्र्वसंगीत खास मराठमोळय़ा रणसंगीताचं. त्याचा कानठळय़ा बसवणारा आवाज. वातावरण एकदम भारलेलं.. तापलेलं.. सभा संपली की साऱ्या समुदायानं शत्रूवर हल्लाबोलच करायचा जणू. मग त्या नेत्यावर पुष्पवृष्टी. ती थांबणं आणि संगीताचा आवाज कमी होणं.. सगळं एकदम जुळलेलं. मग त्या नेत्याचा समोरच्या जनतेला मुजरा. नमस्कार नाही.. मुजरा. तो झाला की त्या नेत्याच्या पक्षाचा स्थानिक नेता व्यासपीठावर. कृतकृत्य झाल्याचा चेहरा करून समोरच्या जमावाकडे त्याचं पाहणं. हातानं मग जमावाला शांत राहण्याची सूचना. जमाव शांत. मग समोर ताट येतं. व्यासपीठावरचा मुख्य नेता त्याला वंदन करतो. म्हणजे अंगारा वगैरे लावावा तसं ते वंदन. त्या तबकातली ती वस्तू हातात घेतो.
ती असते तलवार. छान. चमचमती. सजवलेली. हा नेता ती मस्तकी लावतो. मग डाव्या हातात ती धरून उजव्या हातानं त्या म्यानातली तलवार बाहेर काढतो आणि ते चकाकतं पातं व्यासपीठाच्या तीनही दिशांना दाखवत समोरच्या जनसागराला अभिवादन.. ते पातं मस्तकी लावणं..
एव्हाना मागे तिथल्या स्थानिक नेत्याचं निवेदन सुरू झालेलं असतं. आई जगदंबेच्या आशीर्वादानं.. वगैरे.. मुख्य नेत्याचं ते तलवारीचं पातं मस्तकी लावणं आणि भाषणाला सज्ज होणं या समेवर त्या उपनेत्यांचं भाषण संपतं.. शेवटचं वाक्य म्हणजे.. या तलवारीनं या आपल्या लाडक्या अमुकतमुक साहेबांनी विरोधकांची खांडोळी करावी.. असं मी आवाहन करतो. या वाक्यावर समोरचा उन्माद शिगेला..
ती सभा संपते. मध्ये तासाभराची उसंत असते. त्या काळात तो नेता बाकीची कामं उरकतो आणि मग आमचा लवाजमा पुढच्या सभेसाठी.
तिथेही तेच. आणखी एक तलवार.
त्या नेत्याच्या त्या दिवशी सहा सभा होत्या. रात्री आम्ही परत निघालो तेव्हा गाडीच्या सामान कक्षात सहा तलवारी होत्या.
तो मुद्दा तसाच राहिला.
आता या निवडणुकांची घोषणा झाली, त्यानंतर दोनेक दिवसांतच अगदी योगायोगानं त्यांची भेट झाली. त्यांनी विचारलं कधी येताय दौऱ्यात?
न राहवून मी विचारलं.. त्या गेल्या वेळच्या तलवारींचं काय केलंत?
ते म्हणाले या इकडे.. त्यांच्या मागे एका खोलीत गेलो. आत जवळपास साठेक तलवारी होत्या. काय करायचं याचं? आता याही निवडणुकीत त्या पुन्हा जमा व्हायला लागतील..
निवडणुका, लोकशाही.. मग हे तलवारी दाखवणं का?
हा प्रश्न त्यांना विचारण्यात काही अर्थ नव्हता. पेलला असता की नाही शंका होती.
आता सध्या प्रचाराची हवा चांगलीच तापलीये. पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी हे तर १८५ सभा घेणार आहेत. परवाच त्यांची एक सभा चित्रवाणीवर पाहिली. पूर्वेकडच्या कोणत्या तरी राज्यात होती. त्यांचा अवतार पाहिला आणि आधीचा दौरा आठवला. तलवारवाला. इथे मोदींच्या हातात तीरकमठा आणि डोक्यावर पक्ष्याची चोच असलेली भली मोठी टोपीसारखं काही. छान आनंद घेताना दिसत होते ते. एके ठिकाणी तर मोदींच्या डोक्यावर मोराच्या पिसांपासनं बनवलेला टोप होता. अत्यंत नामांकित विनोदी दिसत होते ते. दुसऱ्या एका सभेत सोनिया गांधी. परातीपेक्षाही मोठय़ा आकाराची टोपी डोक्यावर आणि हाती तेच.. तलवार. प. बंगालमधल्या एका परगणातल्या सभेत तर त्यांच्या डोक्यावर लालेलाल रंगाची पगडी होती आणि तिच्या दोन बाजूंना.. म्हणजे दोन्ही कानांवर.. पांढरी पिसं. हे असं याच दोन नेत्यांचं होतं असं नाही. अनेक सापडतील. पंजाबमध्ये असली कोणाची सभा की लगेच डोक्यावर शिखांसारखी पगडी आणि हाती कटय़ारीसारखं शस्त्र.
एकदा एका नेत्याला मी न राहवून विचारलं.. हे असं का करावं लागतं.. असं केल्यानं आपण नामांकित वेडगळ दिसतो असं कधी वाटत नाही का तुम्हाला..
त्यावर तो म्हणाला कळतं ना.. पण करावं लागतं. स्थानिकांच्या भावना असतात.. संस्कृती पाळावी लागते.
संस्कृती. पण ती पाळायला तुम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रमांत किंवा फॅन्सी ड्रेससारख्या स्पर्धात सहभागी होता की काय.. निवडणुकांच्या प्रचारसभांत या गोष्टी कशा काय असू शकतात..?
या नेत्यालाही काही हा प्रश्न झेपला नाही.
हे नेत्यांचं सोडून देऊ या. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की जनतेला, सुज्ञ, सुजाण म्हणवून घेणाऱ्या मतदारांना हे प्रश्न पडतात की नाही? निवडणूक हा लोकशाही राज्यपद्धतीतला अत्यंत उत्कट असा आविष्कार असतो. दुसऱ्याच्या मताचा आदर करायचा असतो, विरोध करणाऱ्याचा म्हणून एक हक्क असतो आणि त्याला तो बजावू देण्यासाठी आपणही मदत करायची असते.. विरोध असला तरी.. हे या राज्यपद्धतीचं तत्त्वज्ञान असायला हवं. आपल्याकडे ते आहे का? एखाद्याचं मत आपल्या विरोधात आहे म्हणून विरोध करणाऱ्याचं अस्तित्वच मिटवून टाकूया.. ही विचारधारा लोकशाहीत नसते हे आपल्याला मान्य आहे का?
माणसाची, समूहाची संस्कृती ही त्या त्या व्यक्तीच्या, समूहाच्या प्रतीकांतनं दिसत असते. निवडणुकांच्या सभांत तलवारी, भाले, बरच्या वगैरे आपल्याकडे मिरवली जात असतील तर ती प्रतीकं काय दाखवतात? राजीव गांधी यांच्यामुळे संगणकयुग आलं म्हणायचं आणि त्याच राजीव गांधींना आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेली कोणत्या तरी जनावराच्या कातडय़ाची किंवा कोणा पक्ष्याच्या पिसांची टोपी घालून तीरकमठा घेऊन पाहायचं; हा विरोधाभास आपल्याला खुपतो का? व्यक्तीच्या अभिव्यक्तीतून त्याची सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख होते, हे खरं असेल तर आपली ही प्रतीकं काय दर्शवतात?
प्रश्न असा की बदल यात होणारच असेल तर संस्कृती आधी बदलणार की प्रतीकं? आणि कधी?