एकविसाव्या शतकात भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात इतिहास या विषयावर बोलणे आणि लिहिणे हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे कठीण काम झालेले आहे; परंतु हेच एक शतक असेही आहे की, यापूर्वी इतिहास संशोधकांना फारशी उपलब्ध होऊ न शकलेली साधने नव्याने उपलब्ध झालेली आहेत. संगणक, इंटरनेट, मोबाइल, फोटोग्राफी, दूरदर्शन, टेपरेकॉर्डर, अनुवाद साधने यामुळे इतिहास संशोधनाचे क्षितिज विस्तारले आहे.
इतिहास हा विषय मानवाच्या आदिपासून अंतापर्यंत सोबत करणारा आहे. इतिहासाचा इतिहास हा मानवी कालखंडाइतकाच जुना आहे. इतिहासाचा एक मर्यादित अर्थ ‘असे घडले’ किंवा ‘गतकालीन घटना’ असा आहे. विचारी मनुष्याला, संशोधकाला मात्र केवळ ‘असे घडले’ यावर अवलंबून चालत नाही. एखादी घटना घडली की माणसाच्या मनात का, कधी, कोणी, कोठे, कसे, केव्हा असे सहा ‘क’कार प्रश्न उभे राहतात. इतिहास संशोधनच नव्हे तर कोणत्याही संशोधनाचा पाया हे सहा ‘क’कार असतात.
इतिहासातील घटनांचा अभ्यास करणे आपणास वरवर वाटते तेवढे सोपे काम कधीच नसते. शेकडो, हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असते. अनेकदा ते संदिग्ध, अस्पष्ट असते. इतिहासकाराला मागे तर जाता येत नसते. शरीराने वर्तमानात आणि मनाने भूतकाळात, पण पुराव्यांची संगती लावताना त्याला आधुनिक शास्त्रांची संगत सोडता येत नाही. उपलब्ध पुराव्यांचे सामथ्र्य आणि मर्यादा लक्षात घेऊन इतिहासकाराला त्याच्यासमोरील आव्हानांना सामोरे जावे लागते. यातूनच आपणास इतिहासकारांना किती खडतर आव्हानांना तोंड द्यावे लागते याची कल्पना येऊ शकेल.
गणितात जगभराच्या पाठीवर कोठेही जाता परिस्थिती आणि उत्तरात बदल होणार नाही; परंतु इतिहासाचे तसे नसते. मानवी कृती आणि मनोव्यापार यांचा संबंध ज्या ज्या ठिकाणी होतो तेथे आपणास इतिहास वेगळ्याच पद्धतीने घडल्याचे दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज समकालीन विरोधकांच्या गराडय़ात, लाखोंच्या फौजेला तोंड देऊन यशस्वी कसे झाले याचे उत्तर आपणास आकडय़ात न शोधता तत्कालीन समाजपरिस्थितीत, मातोश्री जिजाऊ साहेबांच्या शिकवणुकीत, शिवरायांच्या बालपणात शोधावे लागते. तेथे सैन्य संख्या हा महत्त्वाचा विषय नसतो.
सामाजिक व ऐतिहासिक घटनांमध्ये मानवी मनोव्यापार आणि कृती यांचा संबंध आला की त्याचे परिणाम यांत्रिकी पद्धतीने होत नाहीत. कित्येकदा चमत्कार वाटावी अशी कृती एखादी व्यक्ती करून जाते. ही कृती प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. शिवरायांची आग्रा येथून सुटका, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान या गोष्टींमध्ये मानवी कृती महत्त्वाची असते. त्यांची कारणे आपणास त्या व्यक्तींच्या जडणघडणीत शोधावी लागतात. त्यामुळे इतिहास विषयातील संशोधन कित्येकदा समाजातील एखाद्या समूहास अमान्य असते. ऐतिहासिक संशोधन १०० टक्के मान्य होणे हे दुर्मीळ असते. जन्मतिथीचा वाद आपणास आजही समाधानकारकरीत्या सोडविता आला नाही. सरकारी शिक्कामोर्तब झाले तरी समाजमान्यता ही एक वेगळीच अजब गोष्ट असते. त्यामुळे सर्वाचे समाधान करण्यापेक्षा उपलब्ध पुराव्याला चिकटून राहण्याशिवाय इतिहास संशोधकाला पर्याय नसतो.
इतिहास संशोधन करणाऱ्याला कायम गतकालीन घटनांचे महत्त्व लक्षात घेऊन भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातील सहसंबंध प्रस्थापित करावे लागतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व अन्य घटनांचे यथायोग्य आकलन करून घ्यावे लागते. एकांडय़ा शिलेदाराची भूमिका घेऊन ‘मी आणि फक्त माझा विषय’ असे म्हणून चालत नाही. इतिहास संशोधन करणाऱ्याची इतिहासावर पक्की मांड आणि इतिहास विषयाचे अन्य विषयांशी असणारे संबंध समजून घ्यावे लागतात. प्रतापगडावरची जागा निवडण्यामागील भूगोल समजून घेतल्याशिवाय भेटीचे मर्म कळणार नाही. जलदुर्ग बांधणीचे रहस्य संरक्षण आणि व्यापारात आहे. भाषाशुद्धीचा आग्रह स्वभाषेशी आहे. अशा किती तरी गोष्टी इतिहासाशी संबंधित असल्याने इतिहासकारासमोरचे आव्हान अधिकच कठीण झालेले आहे. थोडक्यात, ज्याला इतिहासाचे संशोधन करायचे आहे त्याला सर्वच क्षेत्रांतील भूतकालीन घटनांचे सुसंगत, यथार्थ, वस्तुनिष्ठ ज्ञान असणे आणि त्याचे वैज्ञानिक पद्धतीने पृथक्करण करण्याचे कसब असणे महत्त्वाचे ठरते.
उपलब्ध माहिती जुन्या पुराव्यांच्या साहाय्याने नव्याने मांडणे किंवा नव्या दृष्टिकोनांचा स्वीकार करून जुन्या घटनांचा अर्थ लावणे आता क्रमप्राप्त झाले आहे. यासाठी विश्वसनीय आणि संबंधित तथ्यांचे आकलन आणि संकलन करणे, संशोधन विषयाचे सामान्य आणि सूक्ष्म अध्ययन करण्याची तयारी असणे, संशोधन विषयाच्या मर्यादा आणि व्यक्तिगत मर्यादा यांचे ज्ञान असणे, कल्पकता असणे या गोष्टी अंतिमत: इतिहास संशोधनपर प्रभाव टाकतात.
या सगळ्या पाश्र्वभूमीवर सध्याच्या इतिहास संशोधनाची परिस्थिती पाहिली तर आपल्या असे लक्षात येईल की, राजकीय इतिहासाच्या बरोबरीने आर्थिक, सामाजिक, धार्मिक, साहित्यिक अथवा वाङ्मयीन इतिहास यांचा अभ्यास वाढत चालला आहे. चित्रपटसृष्टीचा इतिहास, वाहतूक संकल्पनेचा इतिहास, शास्त्रांचा इतिहास, मंदिरांचा इतिहास, गावांचा इतिहास, आडनावांचा इतिहास, वाङ्मयाचा इतिहास यातून आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि इतिहासाचे क्षेत्र अधिक विस्तारत चालले आहे. त्यामुळे इतिहास अभ्यासकांस विस्तृत क्षेत्र उपलब्ध होत चालले आहे.
इतिहासाचा अभ्यास, इतिहासाची मांडणी, इतिहासाचे लेखन, इतिहास विषयाला वाहिलेल्या वाहिन्या, ऐतिहासिक घटनांची शताब्दी, ऐतिहासिक घटनांची क्वचित होणारी पुनरावृत्ती यामुळे इतिहासाविषयीचे आकर्षण वाढतच चालले आहे. सध्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संशोधन विश्वात डोकावून पाहिले तर आपणास याची प्रचिती येईल. ऑल इंडिया हिस्ट्री काँग्रेस, महाराष्ट्र इतिहास परिषद, भारत इतिहास संशोधन मंडळ अशा परिषद वा संस्थांमधून इतिहासविषयक वाचल्या जाणाऱ्या शोधनिबंधांची संख्या वाढत चालली आहे.
इतिहासाच्या संशोधन विषयांवरून समाजाची मानसिकता लक्षात येते. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक. या तीनही छत्रपतींच्या कारकिर्दीवर अधिक प्रकाश टाकणे आवश्यक आहे. मराठेकालीन आर्थिक परिस्थिती, ईस्ट इंडिया कंपनी आणि महाराष्ट्र. अन्य विदेशी व्यापारी कंपन्या आणि महाराष्ट्रातील एतद्देशीय संस्था यांचे संबंध तपासण्याची गरज आहे.
मराठी भाषेत किती तरी विषय येण्याची गरज आहे. २००० सालापर्यंतच्या जगाचा इतिहास मराठीत दुर्मीळच आहे. भारतातील, महाराष्ट्रातील आर्थिक घडामोडींचा इतिहास, औद्योगिक कंपन्यांचा इतिहास, रेल्वेचा इतिहास विशेषत: कोकण रेल्वे आणि ई. श्रीधरन यांचे योगदान, नद्यांचा, धरणांचा इतिहास, वस्तुसंग्रहालयांचा इतिहास.
महाराष्ट्रातील गांधीवादी चळवळींचा विकास, नाटक-सिनेमा, तमाशाचा इतिहास, २०१० पर्यंतच्या मराठी वृत्तपत्रांचा इतिहास, महाराष्ट्रातील शंभरी ओलांडलेल्या संस्था (यात ग्रंथालये, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक संस्था) यांचा इतिहास. काँग्रेसपासून ते मनसेपर्यंतचा इतिहास, आंबेडकरी
चळवळ ते इंदू मिलपर्यंतची वाटचाल,
विधानसभेचा इतिहास, कायद्यांचा इतिहास, इतिहासकारांचा इतिहास, भारतातील सर्व राज्यांचा विशेषत: पूर्वाचलाचा इतिहास. भारत-चीन संबंध, परराष्ट्र संबंध
आणि त्याचे परिणाम, अर्थकारणाचे विशेषत: अमेरिकेच्या अर्थकारणाचे
भारत आणि महाराष्ट्रातील परिणाम
अशा किती तरी अस्पर्शित, दुर्लक्षित गोष्टींकडे इतिहासाच्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे.
जगभर दृष्टी फिरवीत असताना स्थानिक इतिहासाकडे दुर्लक्ष नको. प्रत्येक गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्य़ाचा, हेरिटेज स्थळांचा इतिहास लिहायला हवा. कागदपत्रांची जपणूक, उत्तम दर्जाची संग्रहालये आणि त्यांची जोपासना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.
संशोधकीय दृष्टिकोन वाढेल अशी पाठय़पुस्तके शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठ स्तरावर निर्माण करायला हवीत. विचारांना चालना देणारी पाठय़पुस्तके निर्माण झाली तर कदाचित सामाजिक शास्त्रांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. जगण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य जसे हवे तशीच सामाजिक शास्त्रेही हवीत याचेही भान यायला हवे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा