लढाऊ, आक्रमक भूमिका घेण्याच्या कार्यशैलीतून शिवसेनेची सुटका इतक्यात होणार नाही, हे खरे. पण कसे लढायचे, याचा अंदाज सध्या तरी शिवसैनिकांना घेता येणे कठीण आहे. स्मारकाबाबत दाखवलेल्या समजूतदारपणाच्या आधीचे राजकारण हा या गोंधळाचा भाग होता..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून शिवसेनेच्या विविध नेत्यांनी जो काही गोंधळ घातला त्याचे वर्णन पोरकट असेच करावे लागेल. शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारण्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात याची कल्पना असतानाही शिवसेना नेत्यांनी आगीत तेल ओतण्याचे पद्धतशीरपणे काम केले. तसा कायदा हा शब्द कधीच शिवसेनेच्या शब्दकोशात नव्हता. शिवसेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार झाले तो चौथरा हलविण्यावरून महिनाभर वाद घालून हा विषय चर्चेत राहील व त्यातून शिवसैनिकांमध्ये आपोआपच बळ येईल याची खबरदारी शिवसेना नेत्यांनी घेतली. अंत्यसंस्कार झाले त्या जागेला अयोध्येची उपमा देण्यापर्यंत शिवसेना नेत्यांची मजल गेली. सरकार बळाचा वापर करून चौथरा हलविणार म्हणून पहारा देण्याकरिता शिवसैनिकरांना पाचारण करण्यात आले.  शिवसैनिकांचा पहारा वाढला. अर्थात तेथे येणाऱ्या शिवसैनिकांच्या जेवणाखाण्याकडे लक्ष द्या, अशा सूचना नेतेमंडळींनी देऊनही ज्यांच्याकडे ही व्यवस्था सोपविण्यात आली होती त्यांनी दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी तेथे पहाऱ्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांकडूनच करण्यात आल्या आहेत. वातावरण पेटविण्यात आले. शिवाजी पार्क मैदानात चौथरा उभारण्याकरिता पर्यायी जागा मिळेपर्यंत शिवसेना हा विषय ताणून धरणार हे निश्चित. शिवसेनाप्रमुख आणि शिवाजी पार्क यांचे नाते घट्ट होते हा शिवसेना नेत्यांचा दावा खरा असला तरी याच जागेत स्मारक उभारण्याचा हट्ट धरण्यामागे राजकारणाची किनार आहेच. दादर हा शिवसेनेचा वर्षांनुवर्षे बालेकिल्ला राहिला असला तरी मनसेने आता या ठिकाणी शिवसेनेचे आव्हान मोडून काढले. दादर-माहीमचा आमदार आणि या विभागातील सातही नगरसेवक मनसेचे निवडून आले. शिवसेनेला पुन्हा दादरवर कब्जा करायचा आहे. स्मारकावरून मनोहर जोशी आणि संजय राऊत या शिवसेनेतील प्रस्थापित नेत्यांनी वातावरण पद्धतशीरपणे तापविले. मनोहर जोशी यांच्याबद्दल सामान्य शिवसैनिकांमध्ये कधीच आदराची भावना नव्हती. शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाच्या मनात जोशी सरांबद्दलची अढी लपून राहिलेली नाही. स्मारकाचा मुद्दा घेऊन शिवसैनिकांशी जवळीक साधण्याचा मनोहर जोशी यांचा प्रयत्न होता, पण स्मारकाकरिता कोहिनूर मिलच्या जागेचा मुद्दा पुढे येताच जोशींचीच पंचाईत झाली. स्मारकाचा मुद्दा गाजत असतानाच शिवाजी पार्कचे शिवतीर्थ नामकरण करण्याची योजना शिवसेनेच्या वतीने पुढे करण्यात आली. तेथेच सारे वातावरण बिघडले. शिवाजी पार्क या ऐतिहासिक मैदानाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर सामान्यांमध्ये प्रतिक्रिया उमटली. मनसे व काँग्रेसने विरोध केला, पण नामकरणाचा ठराव मंजूर करण्यासाठी भाजपची साथ मिळणे कठीण आहे हे लक्षात येताच महापौर सुनील प्रभू यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले. लंडन किंवा न्यूयॉर्कचे महापौर शहरांवर आपली छाप पाडतात (अर्थात त्यांना अधिकार असतात). मुंबईत महापौरांची छाप पडणे तर दूरच, पण पालिका प्रशासनाला महापौर म्हणजेच शहराच्या प्रथम नागरिकाला चौथऱ्याचे अनधिकृत बांधकाम हटवा म्हणून नोटीस बजावावी लागली यासारखी नामुष्की नाही. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी समजूतदारपणा दाखविल्याने पुढील वाद तूर्त तरी टळला आहे.
स्मारकावरून शिवसेनेने एक पाऊल मागे घेतले असले तरी हा विषय लगेच संपणार नाही. शिवसेनेने कितीही आक्रमक होण्याचा प्रयत्न केला तरी काही वर्षांतील शिवसेनेची आंदोलने फसली आहेत. राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीच्या विरोधात शिवसेनेने वातावरण पेटविले व ते जातील तेथे आंदोलन करण्याचा इशारा दिला. पण राहुल गांधी यांनी उपनगरीय लोकल गाडीतून प्रवास करून शिवसेनेच्या आंदोलनातील हवा काढून घेतली होती. पुढे शाहरुख खानच्या चित्रपटाच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली, पण शिवसेनेच्या विरोधानंतरही चित्रपट झळकला. शिवाजी पार्क मैदान मोकळे करण्यासाठी पोलिसी बळाचा वापर व्हावा म्हणजे शिवसेनेबद्दल सहानुभूती वाढेल, असे शिवसेनेतील काही जणांचे गणित होते. राज्य सरकारनेही हा नाजूक विषय चर्चेच्या माध्यमातून सोडविला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशीच चर्चा केली. येणाऱ्या अडचणीच त्यांना समजावून सांगितल्या. वरील पाश्र्वभूमी लक्षात घेता शिवसेनेनेही जास्त ताणून न धरता थोडे सामोपचाराने घेतले. कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्क मैदानात छोटा चौथरा उभारायचा आणि शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक इतरत्र उभारण्याची योजना आखायची, अशी हवा सध्या आहे.  शिवाजी पार्क मैदानात चौथऱ्याला जागा मिळणे हेही सोपे नाही. कारण सरकारने जरी जागा देण्याची तयारी दर्शविली तरी लगेच कोर्टबाजी होण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनी राज्यभर दौरा करून मोठय़ा प्रमाणावर जनसमुदाय जमविला होता. त्या माध्यमतून आपले नेतृत्व त्यांनी प्रस्थापित केले. सांत्वन यात्रेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद बघूनच काँग्रेस नेतृत्वाने जगनमोहन यांचा पुढे पत्ता कापला. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे बाहेर पडले असले तरी त्यांनी थेट जनतेत जाण्याऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिला. शिवसैनिकांचे मनोधैर्य उंचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. ‘आता रडायचे नाही, तर लढायचे’ हा संदेश या दौऱ्यातून देण्यात आला. लढण्यासाठी शिवसैनिकांना बळ द्यावे लागेल. बाळासाहेबांचा एक आदेश लढण्याकरिता शिवसैनिकांसाठी पुरेसा असायचा. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला. मवाळ धोरण आणले. यामुळे रडायचे नाही, तर लढायचे हे सांगण्यात येत असले तरी लढायचे कसे, असा सवाल शिवसैनिकच करू लागले आहेत. भगवा फडकविण्याची जुनीच प्रतिज्ञा पुन्हा या दौऱ्यातून करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्यापुढे शिवसेनेचे घर सुस्थितीत ठेवण्याचे सध्या मोठे आव्हान आहे. मनसे टपूनच बसली आहे. राष्ट्रवादीही शिवसैनिकांना खुणावत आहे. अशा वेळी शिवसेना एकसंध ठेवून ती आक्रमक राहील याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. एकदा गळती लागल्यास ती थोपविणे कठीण जाईल. यामुळेच उद्धव हे सावध झाले आहेत. राज ठाकरे हे सध्या शांत आहेत. पण जसजशा निवडणुका जवळ येतील तसे राज ठाकरे यांचे लक्ष्य हे शिवसेना वा उद्धव हेच असतील.
 शिवसेनेत सध्या जुने-नवे, शहरी-ग्रामीण असे वाद सुरू झाले आहेत. जुन्या नेत्यांना जरा दूरच ठेवण्यात येत आहे. जनतेतून निवडून येण्याची क्षमता नसलेली किंवा जनमानसाच्या नाडीचा अंदाज न येणारी  नेतेमंडळी सध्या ‘मातोश्री’च्या जवळ आहेत. मुंबई महानगरपालिकेची सत्ता कायम राखायची या एकाच उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले. परिणामी जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसला. वास्तविक गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्त आमदार हे ग्रामीण भागातून निवडून आले होते. ग्रामीण भागातील आमदारांना डावलण्यात येते अशी त्यांची भावना आहे. मुंबई महानगरपलिकेची सत्ता हाती असल्याने शिवसेनेच्या आर्थिक नाडय़ा घट्ट आहेत. याउलट मनेसेचे आहे. यामुळे कार्यकर्ता कोठे जायचे वा थांबायचे हा विचार करूनच मग निर्णय घेणार. उद्धव ठाकरे हे कशी पावले टाकतात यावरही शिवसेनेचे भवितव्य ठरणार आहे. तब्येत त्यांना कशी साथ देते यावरही बरेच अवलंबून आहे. सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत आगामी काळ शिवसेनेसाठी नक्कीच आव्हानात्मक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा