डाव्यांचा ३४ वर्षांचा एकछत्री अंमल उद्ध्वस्त करून ममता बॅनर्जी यांनी ‘पोरिबोर्तन’ घडवून आणले. हे कसे झाले याचा शोध घेत लेखकाने डाव्यांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या ‘ऐतिहासिक चुका’ दाखवून दिल्या आहेत. ममता यांचा एकचालकानुवर्ती स्वभाव आणि हेकेखोरपणा सांगतानाच त्यांची ‘राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा’ही स्पष्ट केली आहे.
आजच्या काळात सलग दुसऱ्यांदा यश मिळाले की, चांगले काम केल्याने जनतेने आपल्याला पुन्हा कौल दिला अशी सत्ताधारी आपली पाठ थोपटून घेतात. अशा वेळी बंगालमध्ये सलग ३४ वर्षे डाव्यांचा एकछत्री अंमल राहिला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी २०११ मध्ये राज्यात ‘पोरिबोर्तन’ घडवून आणले. ‘मा, माटी आणि मानूष’ याला साद घालत ममता यांनी सत्ता खेचली. या सगळ्याची कारणे काय, पडद्यामागे राजकारण कसे फिरत होते, केडरबेस पक्ष असलेल्या डाव्यांच्या सत्तेला कशामुळे सुरुंग लागला, याचा ऊहापोह सीताराम शर्मा यांनी ‘वेस्ट बंगाल, चेंजिंग कलर्स, चेंजिंग चॅलेंजेस’ या पुस्तकात केला आहे. पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते अशा दोन्ही भूमिका शर्मा यांनी वठवल्या आहेत. सुरुवातीला डाव्यांशी, तर नंतर काँग्रेसशी त्यांची जवळीक होती. मात्र राजकारणी असूनदेखील सर्व घटनांकडे त्यांनी तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. डाव्यांचे पतन आणि ममतांचा उदय याची कारणमीमांसा करताना त्यांनी जाणीवपूर्वक व्यक्तिस्तोम टाळले आहे.
डाव्यांना व्यापक जमीन सुधारणा कार्यक्रमामुळे राज्यभर जम बसवता आला. त्यातून कार्यकर्त्यांचे जाळे असणारी पक्ष संघटना, कामगार व शिक्षकांच्या विविध संघटनांचा पाठिंबा यामुळे त्यांचा पराभव करणे काँग्रेसला अशक्य झाले, हे सांगतानाच राज्याचे झपाटय़ाने औद्योगिकीकरण करण्याच्या नादात डावे पक्ष लोकांच्या मनातून कसे उतरले याचेही सुरेख विवेचन केले आहे.
बंगालच्या राजकारणाचे तपशील देतानाच, त्याअनुषंगाने देशात घडणाऱ्या राजकीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय संदर्भ याची सोप्या भाषेत माहिती दिल्याने इतिहास, राजकारण आणि स्वातंत्र्योत्तर काळातील बारीकसारीक घडामोडी जाणून घ्यायला मदत होते.
डाव्यांनी जनतेच्या कळीच्या प्रश्नांना हात घालून राज्यात कसा जम बसवला याची हकिकत रंजक आहे. १९५० मध्ये आलेली निदर्शनांची लाट, त्यातच १९५३ मध्ये रस्त्यावर चालणाऱ्या ट्रामच्या भाडेवाढीचे निमित्त, वेतनवाढीसाठी शिक्षकांचे आंदोलन, बंगाल आणि बिहार यांच्यातील सीमावाद सोडवण्यासाठी दोन राज्यांच्या विलीनीकरणाच्या अजब प्रस्तावातून निर्माण झालेला असंतोष डाव्यांनी हेरला. त्या काळात संयुक्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष ही राज्यात प्रमुख शक्ती होती. १९५९ मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा बंगालमध्ये जोर होता. त्यावेळी सरकारने निदर्शकांवर बळाचा वापर केला, त्यात ८० जण दगावले. या घटनांमधून राज्यात काँग्रेस एकाकी पडली. त्याचा फायदा डाव्यांनी उचलला. राज्यात काँग्रेस विरुद्ध डावे असे ध्रुवीकरण झाले. नंतर फुटीच्या राजकारणात कम्युनिस्ट आणि काँग्रेसमध्ये फूट पडली. १९६९ मध्ये राज्यात संयुक्त आघाडीतील घटक पक्ष या नात्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सर्वाधिक ८० जागा मिळाल्या.
लेखकाने याच काळातल्या नक्षलवादाचा उदय, चकमकी याचाही इतिहास दिला आहे. सत्तेवर आल्यावर महसूलमंत्री म्हणून हरिकृष्ण कोन्नूर यांनी अतिरिक्त जमिनीचे वाटप करण्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आणली, त्यातूनच डाव्यांच्या तीन दशकीय अखंडित सत्तेचा पाया घातला गेला असे लेखकाने स्पष्ट केले आहे. जमीन सुधारणा दोन टप्प्यांत केल्या गेल्या. पहिल्या टप्प्यात जमीनदारांनी हडप केलेली जमीन शोधली गेली. त्याचा लाभ ४० लाखांवर नागरिकांना झाला. डाव्यांची हीच मतपेढी वर्षांनुवर्षे भक्कम राहिली.
मात्र हे सांगतानाच राज्यात अनेक वर्षे सत्तेत असताना कामगार संघटनांची अरेरावी कशी वाढली, महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त्यांमध्ये डाव्यांच्या हस्तक्षेपाचा अतिरेक कसा झाला याचीही उदाहरणे लेखकाने दिली आहेत. राज्यात उद्योगांचा विकास खुंटला, पायाभूत सुविधा वाढल्या नाहीत हे सांगून अलीकडे काही ‘बिमारू’ समजल्या जाणाऱ्या राज्यांनी कशी प्रगती केली याचाही आढावा घेतला आहे. राजकीय हिंसाचार, सत्ताधारी-विरोधकांमधील संवादाचा अभाव आणि सत्तेवर मांड पक्की असल्याने डाव्यांचा अहंभाव वाढला, अशी कारणमीमांसा लेखकाने केली आहे.
ज्योती बसूंचे व्यक्तिमत्त्व वेगळे होते. त्यांच्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याकडे धुरा आली. त्यांनी पक्षाच्या तोवरच्या धोरणांच्या विरोधात जाऊन उद्योगप्रधान भूमिका घेतली, त्याला २००६ च्या निवडणुकीत यश मिळाले. मात्र हे यश डाव्यांना पचवता आले नाही. औद्योगिकीकरणासाठी सुपीक जमिनी संपादन करण्याचा सपाटा भट्टाचार्य सरकारने सुरू केला. त्यामुळे शेतकरी पेटून उठले. आपला घास सरकार हिरावून घेत आहे अशी भावना शेतकऱ्यांची झाली.
ममतांनी नेमका याचा फायदा उठवला. नंदीग्राम, सिंगूर येथील घटना, त्याचा देशव्यापी परिणाम याचा सविस्तर उल्लेख केला आहे. त्यामुळे सामान्यांसाठी झटणाऱ्या साध्या आणि प्रामाणिक नेत्या ही ममता यांची प्रतिमा जनतेला भावली. त्यातून ‘पोरिबोर्तना’चा मार्ग साध्य झाला. थोडक्यात, ममता यांना संघर्षांतून यश मिळालेले आहे. लेखकाने ममता बॅनर्जी यांनाच परिवर्तनाचे सगळे श्रेय दिले असले तरी त्याअनुषंगाने बहुसंख्य प्रादेशिक पक्ष कसे एकचालकानुवर्ती आहेत, हे दाखवत त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रकाश टाकला आहे. ममता यांची ‘सामान्यांसाठी झटणाऱ्या साध्या आणि प्रामाणिक नेत्या’ ही आपली प्रतिमा जपण्यासाठी कशी धडपड सुरू असते याचे एक उदाहरण म्हणजे, मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून त्यांनी पहिल्या दीड वर्षांमध्ये एकाही उद्योजकांच्या शिष्टमंडळाला वेळ दिला नाही. इतकेच काय, भेटीसाठी आलेल्या उद्योजकांना ते गैरवापर करतील म्हणून छायाचित्रही घेऊ दिलेले नाही असे लेखकाने लिहिले आहे. आपली मतपेढी सांभाळण्यासाठी त्या ही प्रतिमा जपत असल्याचे दाखवून दिले आहे.
ममता यांना मंत्रिमंडळात कुणीही सहकारी नाही, त्या कुणाचे ऐकत नाहीत, कुणावर फारसा विश्वास ठेवत नाहीत. तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांच्यानंतर कुणीही नेता नाही. रेल्वे अर्थसंकल्पातील भाडेवाढीवरून तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांची एकाएकी केलेली गच्छंती ही घटना ममतांच्या स्वभावावर प्रकाश टाकणारी आहे असे लेखकाने म्हटले आहे.
अर्थात असे असले तरी लेखकाने ममता आणि डाव्यांवर केवळ टीकाच केलेली नाही, तर वेगवेगळ्या जाणकारांशी बोलून त्यांचे शक्य तेवढे तटस्थ मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला आहे. लढाऊ आणि रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या नेत्या अशी ममता यांची खरी ओळख, पण सत्तेवर आल्यावर त्या विरोधी मानसिकतेतून बाहेर पडून प्रगल्भ राजकारणी अशी आपली ओळख निर्माण करू पाहत आहेत हेही दाखवून दिले आहे.
विरोधी पक्षात असताना डाव्यांशी चर्चेला न येणाऱ्या ममतादीदी आता डाव्यांशी संवाद वाढवू पाहत असल्याचे लेखकाचे म्हणणे आहे. इतकेच काय, सभागृहात सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना अधिक वेळ द्या, अशी विनंती त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केली. यातून राष्ट्रीय राजकारणात चर्चेत येण्यासाठी ममतांचे प्रयत्न सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आता ममतांचे उद्दिष्ट बंगालमधील लोकसभेच्या ४२ पैकी ३० जागा जिंकण्याचे आहे. त्यातून राष्ट्रीय राजकारणात त्यांना आपले महत्त्व वाढवायचे आहे.
थोडक्यात हे पुस्तक केवळ डाव्यांच्या राजकारणापुरतेच मर्यादित नाही, तर डावे पक्ष, काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी, बंगालमधील समाजजीवन, देशाच्या राजकारणाचे विविध कंगोरे जाणून घेण्यासाठीही उपयुक्त आहे.
वेस्ट बेंगॉल – चेंजिंग कलर्स, चेंजिंग चॅलेंजेस : सीताराम शर्मा,
रुपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,पाने- २२९, किंमत : २९५ रुपये
बंगाली ‘पोरिबोर्तना’चा पट
डाव्यांचा ३४ वर्षांचा एकछत्री अंमल उद्ध्वस्त करून ममता बॅनर्जी यांनी 'पोरिबोर्तन' घडवून आणले. हे कसे झाले याचा शोध घेत लेखकाने डाव्यांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या 'ऐतिहासिक चुका' दाखवून दिल्या आहेत. ममता यांचा एकचालकानुवर्ती स्वभाव आणि हेकेखोरपणा सांगतानाच त्यांची 'राष्ट्रीय …
First published on: 18-01-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal changing colours changing challenges by sitaram sharma