महाराष्ट्रात जे शिवसेनेचे झाले तेच पुढील काळात पश्चिम बंगालात तृणमूल काँग्रेसचे होईल अशीच चिन्हे आहेत. पश्चिम बंगालमधील मुसलमान मतदार तृणमूलपासून दूर होत, भाजपला एक संधी देण्यास काय हरकत आहे, असे म्हणू लागला आहे.. याचे श्रेय अमित शहा यांना आहेच, पण ममता बॅनर्जी यांच्या राजकारणानेच तृणमूल काँग्रेसचा घात केला आहे.
राजकारणाच्या रणमैदानात बोलले जाते त्यापेक्षा जे बोलले जात नाही, ते अनेकदा अधिक महत्त्वाचे असते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रविवारच्या कोलकाता येथील जाहीर सभेबाबत असेच म्हणावे लागेल. या सभेच्या आधी नमनालाच घडाभर तेल वाया गेले होते. शहा यांची ही सभा कोलकात्यात होऊच नये यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जंग जंग पछाडले. तो शुद्धपणे रडीचा डाव होता आणि ममताबाईंच्या कांगावखोर राजकारणास तो पुरेपूर साजेसा होता. आधी कोलकाता महानगरपालिका, मग राज्य सरकार असे विविध पातळय़ांवर ममताबाईंनी या सभेविरोधात प्रयत्न करून पाहिले. त्यावरून भाजप आणि ममताबाईंची तृणमूल यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यात ममताबाईंना हार पत्करावी लागली. कारण शहा यांची सभाच होऊ न देण्याचा निर्णय अखेर न्यायालयानेच रद्द केला आणि ममताबाईंचे काही चालले नाही. तेव्हा ही सभा होण्याआधीच इतकी गाजल्यामुळे ती झाल्यावरही तिचे पडसाद उमटत राहणार हे उघड होते. तसेच झाले. या सभेच्या निमित्ताने तृणमूल आणि भाजप यांच्यात नव्या संघर्षांची नांदी झडली असून या राजकीय संघर्षनाटय़ाचा पहिला अंक २०१५ साली लिहिला जाईल आणि २०१६ साली भैरवी होईल. पुढील वर्षी कोलकाता महापालिकेच्या निवडणुका असून पुढे वर्षभरानंतर प. बंगाल विधानसभेसाठी मतदान होईल. या दोन्ही निवडणुकांत ममता बॅनर्जी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्याचा भाजपचा निर्धार असून त्याचमुळे अमित शहा यांनी सभेत केलेल्या आणि न केलेल्या विधानांची दखल घेणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी हा अमित शहा कोण, असा उद्दाम प्रश्न ममतादीदींनी केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या प्रियांका वडेरा यांनी भाजपच्या राहुल गांधी यांच्याविरोधातील उमेदवार स्मृती इराणी यांच्या संदर्भात असाच अनुदार प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर मोदी यांनी इराणी यांच्या वतीने दिले होते. त्या निवडणुकीत राहुल गांधी जरी विजयी झाले तरी ती निवडणूक त्यांना अपेक्षेइतकी सोपी गेली नव्हती. आता ममता बॅनर्जी यांनी शहा यांच्याबद्दल विचारताना असाच उद्दामपणा दाखवला. परिणामी शहा यांच्या भाषणाची सुरुवातच ममताबाईंना चोख उत्तर देण्याने झाली. राजकारणात आपल्या प्रतिस्पध्र्यास कधीच कमी लेखायचे नसते, हे आपल्याच मस्तीत असलेल्या ममताबाईंना ठाऊक नसावे. ज्या भाजपला पश्चिम बंगालात चंचुप्रवेशही नव्हता त्या भाजपला ताज्या लोकसभा निवडणुकांत जवळपास १६.५ टक्के मते पडली आहेत. ४२ लोकप्रतिनिधींना लोकसभेत पाठवणाऱ्या या राज्यातून भाजपचे दोनच खासदार विजयी झाले असले तरी त्या पक्षाला पडलेल्या मतांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यातून वारे कोणत्या दिशेला वाहू शकतात, याचेच दर्शन घडते. हे असे म्हणायचे कारण म्हणजे पश्चिम बंगालातील अल्पसंख्याकांकडून भाजपला मिळू लागलेला वाढता पाठिंबा. भाजप म्हणजे केवळ भद्रलोकातील मूठभर असा इतके दिवस समज होता. तो लोकसभा निवडणुकांनी दूर केला. ममताबाईंची खरी चिडचिड होत आहे ती या कारणामुळे. रविवारीही अमित शहा यांच्या सभेत मुसलमानांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होता. त्याचमुळे शहा यांची एक कृती पुरेशी बोलकी ठरते. ती म्हणजे त्यांचे भाषण सुरू असताना शेजारच्या मशिदीतून नमाजाची अजान दिली गेली आणि शहा यांनी ती संपेपर्यंत शांतता पाळणे पसंत केले. मशिदीतील ही हाक सुरू असताना सभेतील काही भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रभक्तीच्या घोषणा देण्याचा उद्योग केला. परंतु शहा यांनी त्यांना गप्प केले आणि जवळपास तीन मिनिटे मौन पाळले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या साहाय्याने धार्मिक वातावरण तापवण्याचा ज्यांच्यावर आरोप झाला त्या शहा यांचे हे बंगाली रूप भाजपच्या प्रयत्नांची दिशा दाखवणारे आहे. पश्चिम बंगालात मुसलमान मतदार मोठय़ा प्रमाणावर आहेत. इतकी वर्षे कम्युनिस्टांनी त्यांना झुलवले आणि नंतर ममताबाईंच्या तृणमूलने निधर्मी राजकारणाचा दावा करीत त्यांना आपल्याकडे ओढले. वास्तविक ममताबाई या अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजपप्रणीत सरकारात मंत्री होत्या. याचा अर्थ त्यांना भाजप अस्पृश्य आहे, असे नाही. परंतु गरजेनुसार निधर्मी बुरखा घेण्याची अनेक पुरोगाम्यांकडून होते ती लबाडी त्यांनीही केली आणि मुसलमानांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. डाव्यांच्या तीव्र निधर्मी परंतु पोकळ दाव्यांना कंटाळलेल्या मुसलमानांनी ममताबाईंना तृणमूल साथ दिली आणि या बाई मुख्यमंत्री झाल्या.
परंतु हे राजकीय यश सोडले तर ममताबाईंना काहीही करून दाखवता आलेले नाही. आयुष्यभर बेगडी विरोधाचे राजकारण केल्याने येणारा कर्कशपणा हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. एका बाजूला डाव्यांचा अवास्तव, नाटकी कर्मठवाद आणि ममताबाईंचा चक्रमपणा यातच इतके दिवस वंगबंधू अडकले होते. कारण अन्य कोणतीही राजकीय ताकदच त्या राज्यात नाही. काँग्रेसने या राज्यातून काढता पाय घेतला त्यास जवळपास तीन दशके उलटली. या पक्षाचे त्या राज्यातून आलेले ज्येष्ठतम नेते म्हणजे प्रणब मुखर्जी. त्यांची हयात राज्यसभेवरच गेली. आपल्या कारकीर्दीच्या शेवटी ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यामुळे त्यांच्या उंचीचा काहीही फायदा काँग्रेसला त्या राज्यात झाला नाही. त्या पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते म्हणजे प्रियरंजन दासमुन्शी. त्यांच्या राजकारणाचा पूर्वार्ध वाचाळपणात गेला आणि उत्तरार्ध रुग्णालयात. तेव्हा काँग्रेस या राज्यात मृतप्राय होती. डाव्यांच्या अतिरेकास त्यामुळे तोंड दिले ते ममताबाईंनीच. त्याचे फळ त्यांना मिळाले. परंतु सत्ता हाती आल्यावर त्यांच्या हातून काहीही भरीव घडले नाही. विरोधी पक्षात असताना आगलाव्या भूमिका घेणे वेगळे आणि सत्ता हाती आल्यानंतर नेमस्तपणे मार्ग काढीत काही विधायक करून दाखवणे वेगळे. यातील पूर्वार्ध ममताबाईंना चांगलाच जमला. बोंब होती आणि आहे ती उत्तरार्धाची. त्यामुळे या अपयशाची जाणीव झाल्यावर त्यांनी आधी मनमोहन सिंग आणि नंतर नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेण्याचा बराच प्रयत्न केला. पश्चिम बंगाल राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होण्याची काहीही चिन्हे नाहीत. तेव्हा यापैकी काही कर्जे केंद्राने माफ करावीत अशी ममताबाईंची मागणी होती. सिंग यांनी तीकडे दुर्लक्ष केले. मोदी यांनी ममताबाईंची गरज लक्षात घेत तसे करण्यास तयारी दाखवली. परंतु त्या बदल्यात भाजपशी अधिकृत युतीचा आग्रह धरला. दिल्लीत मोदी आणि राज्यात दीदी अशी कामचलाऊ कोटी करीत त्यांनी ममताबाईंना गळ घातली. ती मान्य केली असती तर तृणमूलचा घात झाला असता. कारण नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे बंगालातील मुसलमानांना दूर करणे ठरले असते. ते त्यांना परवडणारे नव्हते. नेमक्या याच मुद्दय़ावर त्यांचा अंदाज चुकला. ज्या मुसलमान मतांतराच्या भीतीपोटी ममताबाईंनी भाजपचा हात झिडकारला तोच मुसलमान मतदार तृणमूलपासून दूर होत, भाजपला एक संधी देण्यास काय हरकत आहे, असे म्हणू लागला आहे.
हे असेच होणार होते. याचे कारण या पक्षाने केलेले खोटय़ा अस्मितेचे त्याहून खोटे राजकारण. अन्यत्रही ज्या ज्या पक्षांनी हे अस्मिताकारण आपले राजकारण मानले त्या त्या पक्षांना मोठा फटका बसला. परिणामी महाराष्ट्रात जे शिवसेनेचे झाले तेच पुढील काळात पश्चिम बंगालात तृणमूल काँग्रेसचे होईल अशीच चिन्हे आहेत. अमित शहा यांची सभा त्याचमुळे अस्मिताअंताच्या राजकारणातील आणखी एक पाऊल ठरते.
अस्मिताअंताकडे..
महाराष्ट्रात जे शिवसेनेचे झाले तेच पुढील काळात पश्चिम बंगालात तृणमूल काँग्रेसचे होईल अशीच चिन्हे आहेत. पश्चिम बंगालमधील मुसलमान मतदार तृणमूलपासून दूर होत,
First published on: 02-12-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal muslims shifting loyalty to bjp