‘सत्यार्थ आणि सत्यार्थी’ हा अग्रलेख (१३ ऑक्टोबर) सहसा न चर्चिल्या जाणाऱ्या विषयावर प्रकाश टाकतो, हे प्रशंसनीय आहे. नोबेल शांतता पारितोषिकामागे कोणकोणते हिशेब असू शकतात, याबद्दल या अग्रलेखात मांडल्या गेलेल्या दृष्टिकोनाशी मी सहमत आहे. मलालाच्या बाबतीत तर, भांडवलशाही देशांचा ‘छुपा अजेंडा’ गेली कैक वर्षे स्पष्टच दिसतो, असे मला वाटते. या देशांनी फौजांद्वारे अथवा ड्रोनद्वारे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात निरपराधांचा संहार केलेला आहे आणि आता त्यांना या संहाराच्या आरोपांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी ढाल म्हणून काहीतरी हवेच आहे. मलाला हिच्यावर गोळीबार झाल्यावर आयतीच ढाल पाश्चात्त्य देशांना सापडली. मग तिला संयुक्त राष्ट्रांत भाषणाचे निमंत्रण, तिला सुरक्षा, प्रमुख दैनिकांत तिच्या मुलाखती, यांतून पाश्चात्त्य देश हे ‘गुंतागुंतीच्या’ देशांबाबत कशी ‘काळजी’ घेत असतात, हे दाखविण्याची व्यूहरचनाच सुरू झालेली दिसली.
या तुलनेत, कैलाश सत्यार्थी हे नोबेल शांतता पारितोषिकाच्या घोषणेपूर्वी सामान्य माणसाच्या नजरेसमोर नव्हते. त्यांचे काम नक्कीच मोठे आहे. मात्र मी व्यक्तिगतरीत्या अनेक अशा व्यक्तींना ओळखतो, ज्या भारताच्या दुर्गम भागांत बालमजुरीविरोधी काम करीत आहेत. त्यामुळे मला हा नोबेल शांतता पारितोषिकाच्या निकषांचा प्रश्न वाटतो. दुसरीकडे, मानवतावादी काम करणारे बहुतेक जण कोणत्याही पुरस्कार वा मान्यतेसाठी काम करीत नाहीत, हेही दिसते.
नोबेल शांतता पारितोषिकांमागच्या राजकीय हेतूंचा शोधक धांडोळा घेणे अन्य काही प्रसारमाध्यमांनीही सुरू केले आहे. ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकाचे संपादकीय सहायक एलियास ग्रोल यांनी त्यांच्या लेखात, या पारितोषिकानंतरही तळागाळाच्या स्तरावर ज्या उद्दिष्टांसाठी या दोघांचे काम सुरू आहे ती उद्दिष्टे साध्य होतीलच याची शाश्वती नसल्याचे म्हटले आहे. तर ‘स्क्रोल’मध्ये रोहन वेंकटरामकृष्णन् यांनी नोबेल शांतता पुरस्काराचा पाश्चात्त्य जगाकडून राजकीय हत्यार म्हणून वापर झाल्याचे आरोप यापूर्वीही कसकसे झाले आहेत, याची आठवण विविध उदाहरणांनी करून दिली आहे. नोबेल समितीने पुरस्काराची घोषणा करताना (मलालाच्या) धर्माचा उल्लेख करणे हे माझ्या मते केवळ दुर्दैवीच नव्हे तर अजिबात खपवून घेऊ नये असेच आहे.
माझ्या मते नोबेल शांतता पारितोषिकाच्या निवड समितीचा हा लहरीपणा सुरू आहे. ओबामा वा अल् गोर यांना हे शांतता पारितोषिक देण्याची संभावना तर ‘होपलेस’ अशा शब्दांत झाली होती. शिवाय सारे विश्व ज्यांना शांततेचे महान दूत म्हणून ओळखते, त्या महात्मा गांधीजींना नोबेल शांतता पारितोषिक मिळालेच नव्हते.
हे असे पारितोषिक भारत आणि पाकिस्तानला विभागून का देण्यात आले, याची खरी कारणे कदाचित आपल्या बुद्धी वा कल्पनेच्याही पलीकडली असू शकतात. एक भारतीय म्हणून मला एवढेच वाटते की, भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार देण्यासाठी काही ‘डील’ (छुपा करार) झालेले नसावे अशी आशा करू या.
असो. अग्रलेख विचारप्रवर्तक होता,हे नक्की.
शांतता-नोबेलची ‘ढाल’पाश्चात्त्य राष्ट्रांना हवीच!
‘सत्यार्थ आणि सत्यार्थी’ हा अग्रलेख (१३ ऑक्टोबर) सहसा न चर्चिल्या जाणाऱ्या विषयावर प्रकाश टाकतो, हे प्रशंसनीय आहे. नोबेल शांतता पारितोषिकामागे कोणकोणते हिशेब असू शकतात, याबद्दल या अग्रलेखात मांडल्या गेलेल्या दृष्टिकोनाशी मी सहमत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-10-2014 at 02:28 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western countries need nobel prize shield