संतोष प्रधान

देशात काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व असताना प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर प्रादेशिक पक्षांची वाढ होत गेली. संघराज्यीय पद्धतीत विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना बरे दिवस आले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे राज्यावर होणारा अन्याय या एका मुद्द्यावर प्रादेशिक पक्षांसाठी पोषक वातावरण तयार झाले. महाराष्ट्रात मराठी माणसावर होणाऱया अन्यायाच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली आणि हळूहळू या पक्षाचा पाया विस्तारला गेला. आंध्र प्रदेशात तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावर (तेलुगू बिड्डा) तेलुगू देशमने राजकीय पट व्यापला. केंद्र सरकारकडून अन्याय होत असल्याची नागरिकांची भावना निर्माण झाल्याने प्रादेशिक पक्षांची वाढ झाली. प्रादेशिक अस्मितेच्या लाटेवर स्वार होत व्यक्तीकेंद्रित असे प्रादेशिक पक्ष उदयाला आले. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे, द्रमुक म्हणजे आधी अण्णा दुराई मग करुणानिधी, तेलुगू देशम एन. टी. रामाराव ही प्रादेशिक पक्ष आणि नेतेमंडळी असे समीकरण तयार झाले. बहुतांशी प्रादेशिक पक्ष हे व्यक्तीकेंद्रित असे निर्माण झाले. या नेत्यांच्या पश्चात त्यांची मुले, जावई आदी नातेवाईकांनी पक्षांचा ताबा घेतला. हाच वादाचा केंद्रबिंदू ठरला. घराणेशाहीच्या या वादातच काही राज्यांमधील प्रादेशिक पक्षांचे नुकसान झाले.

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

सध्या शिवसेना आणि अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये नेतृत्वावरून वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांमधील हे प्रादेशिक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे समीकरण. बाळासाहेबांचाी पक्षावर पोलादी पकड होती. छगन भुजबळ, नारायण राणे वा राज ठाकरे आदी नेत्यांनी बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेला आव्हान दिले आणि हे नेते पक्षापासून दूर गेले. पण कोणालाही शिवसेनेवर ताबा मिळविता आला नाही वा कोणी त्या भानगडीतही पडले नाही. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपला राजकीय वारस नेमल्यानेच शिवसेनेतील नाराजी वाढत गेली व त्यातून बंडाळी झाली. तमिळनाडूत अण्णा द्रमुक पक्षात एम. जी. रामचंद्रन किंवा त्यांच्या पश्चात जयललिता यांचे वर्चस्व होते. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात कोणी लोकप्रिय किंवा सर्वांना मान्य होईल असा नेता नव्हता. यातूनच पलानीस्वामी व परीनसेल्वम असे दुहेरी नेतृत्व निर्माण करण्यात आले. पण हा प्रयोग फसल्याने आता पलानीस्वामी यांनी पक्षाची सूत्रे ताब्यात घेत पनीरसेल्वम यांचीच पक्षातून हकालपट्टी केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या ८ ऑगस्टपर्यंत शिवसेनेला पक्षाची सूत्रे ताब्यात ठेवण्याकरिता कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागतील.

तेलुगू अस्मितेचा मुद्दा उपस्थित करीत एन. टी. रामाराव यांनी आंध्रच्या जनतेवर अधिराज्य गाजविले. एन. टी. रामाराव यांच्या हयातीतच त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी तेलुगू देशमची सूत्रे हाती घेत सासरे रामाराव यांनाच अज्ञातवासात पाठविले. चंद्राबाबूंनी पुढे पक्ष सावरला. त्यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देशमला आांध्रची दोनदा सत्ता मिळाली. ओडिशात बिजू पटनायक यांच्या निधनानंतर नवीन पटनायक यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली. परदेशात शिक्षण घेतलेल्या नवीन पटनायक यांना धड उडिया भाषा बोलता येत नव्हती. पण गेले २० वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवून नवीन पटनायक यांनी आपली पकड कायम ठेवली. तसेच पक्षात त्यांच्या नेतृत्वाला आव्हानही दिले गेले नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी आपला मुलगा अथवा भाचा हाच राजकीय उत्तराधिकारी असेल हे अधोरेखित केले आहे. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक हे पक्षाचे सरचिटणीस असून, पक्षाच्या दैनंदिन कारभारात ते लक्ष घालतात. अभिषेक बॅनर्जी यांचे नेतृत्व पुढे आणण्यास सुरुवात झाल्यानेच काही जुने सहकारी ममतादिदींना सोडून गेले होते. तेलंगणात चंद्रशेखर राव यांचा मुलगा रामराव तसेच भाचा हरिश राव हे मंत्री आहेत. मुलगी कविता ही खासदार आहे. पुत्र रामाराव हे राजकीय वारस असतील हे राव यांनी स्पष्ट संदेश दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपू्र्वी कदाचित पुत्राकडे मुख्यमंत्रीपद सोपविले जाईल, अशी चिन्हे आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून कुमारस्वामी या मुलाकडे मुख्यमंत्रीपद सोपविले होते. यातून काही नेते पक्ष सोडून गेले. आता तर नातवांना देवेगौडा यांना पुढे आणलेे. नातवासाठी मतदारसंघ देवेगौडा यांना बदलला आणि स्वतः देवेगौडाच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले.

द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी एम. के. स्टॅलिन यांनाच आपले राजकीय वारस नेमले. आंध्रचे राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर जगनमोहन यांनीच त्यांचा वारसा चालविला. शिवसेनेत आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य हे आजोबांचा, तर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हेही खासदार आहेतच. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचा राजकीय वारस अजित पवार की सुप्रिया सुळे ही चर्चा नेहमीच घडत असते. पंजाबमध्ये अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र सुखबिहरसिंग बादल हे पुढे चालवित असले तरी लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये अकाली दलाची पीछेहाटच होत गेली. बादल यांच्या पुतण्याने बंड केले पण त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. यातूनच तिने तेलंगणात स्वतंत्र पक्ष काढून तेथे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांनी मुलालाच पुढे आणले. सध्या हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी पत्नी, मुलगा व मुलगी यांच्याकडेच पक्षाची सूत्रे राहतील याची काळजी घेतली. त्यातून घरातच भांडणे सुरू झाली. हरयाणात देवीलाल यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर नातू सध्या उपमुख्यमंत्री आहे. घरातच भांडणे होऊन देवीलाल यांच्या दुसऱ्या मुलाने वेगळा पक्ष काढला होता.

शिवसेना किंवा अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षांनी नेतृत्वाची दुसरी फळी तयार केली नाही वा होऊ दिली नाही. माजी मुख्पयमंत्री पलानीस्वामी यांनी आता पक्षावर पकड बसविली असली तरी एम. जी. रामचंद्रन किंवा जयललिता यांच्याएवढी लोकप्रियता आणि जनतेचा पाठिंबा मिळविण्यात ते यशस्वी होतात का हे कालांतराने स्पष्ट होईलच. आता खरी कसोटी उद्धव ठाकरे यांची आहे. शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्याकडे राहते की नाही हे निवडणूक आयोगाच्या निकालावर अवलंबून असेल.

भाजपशी मैत्री किंवा युती केलेले आसाम गण परिषद किंवा गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हे प्रादेशिक पक्ष संपले किंवा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. भाजप आणि शिवसेनेची युती २५ वर्षांपेक्षा अधिक काळाची. २०१४ पर्यंत तरी युतीत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. मोदी यांच्या कार्यकाळात किंवा बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेची घसरण सुूरू झाली. यामुुळेच गोवा किंवा आसामप्रमाणे महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्षाला नामोहरम करणे भाजपला राजकीयदृष्ट्या शक्य होईल का, याचीच उत्सुकता आहे.

santosh.pradhan@expressindia.com