‘अध्यापकीय अतिरेक’ अग्रलेख (४ एप्रिल) आणि त्यावरची मुग्धा कर्णिकांची प्रतिक्रिया, (५ एप्रिल) दोन्ही वाचले. समस्त अध्यापक वर्गाला उच्च श्रेणीचे वेतन मिळायला हवे, जेणेकरून गुणवान मंडळी या क्षेत्राकडे येतील, असे मानणारा मोठा वर्ग समाजात आहे. याची जाणीव संपादक आणि मुग्धा कर्णिक यांनाही असेलच. तेव्हा अध्यापक वर्गाला योग्य वेतन मिळवण्यासाठी यंत्रणेशी झगडा करावा लागतो याचा निषेध व्हायलाच हवा.
परंतु त्याचबरोबर कर्णिकांनी मांडलेल्या काही मुद्दय़ांचा ऊहापोह झाला पाहिजे. शिक्षण क्षेत्राच्या अवनतीची व्याख्या करणे कठीण जाईल, असे त्या म्हणतात आणि लगेच ‘पदवी प्रमाणपत्राला’ला ‘पुंगळी’ असे संबोधतात. शिक्षण क्षेत्राच्या अवनतीचा यापेक्षा वेगळा कोणता पुरावा आवश्यक आहे? जर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुचकामी आहे, तर ते सक्षम करण्याची जबाबदारी कुणाची? गेल्या पाच-सहा वर्षांत, वर्षांला आठ परीक्षा ते आठवीपर्यंत ‘नो परीक्षा’ असा दिव्य प्रवास महाराष्ट्रात झाला. तेव्हा शिक्षणमंत्र्यांना अधिकाराने खडसावण्याची जबाबदारी कुणाची होती? तंत्रशिक्षण कालसुसंगत नाही. मूलभूत विज्ञानशिक्षण संशोधनाला पूरक नाही. प्राथमिक-माध्यामिक शिक्षण व्यक्तीविकास करणारे नाही. या सगळ्याला दोष कुणाचा?
असेही म्हणता येइल की, अध्यापक वर्गाला अ-शैक्षणिक कामांचा मोठा बोजा असतो त्यामुळे त्यांच्या प्रमुख कर्तव्याला त्यांना न्याय देता येत नाही. पण मग पगारवाढीसाठी टोकाला जाऊन आंदोलन करता येते, तर ‘आम्हाला आमचे कर्तव्य नीटपणे पार पाडू द्या’, असे यंत्रणेला खडसावण्याचे बळ अध्यापक वर्गात का नाही?
ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्याची जबाबदारी, शिक्षकवर्गाव्यतिरिक्त आणखी कुणाकडे असू शकते? जबाबदार नागरिक घडवू शकलो नाही, याची जबाबदारी शिक्षण क्षेत्र आणि पर्यायाने अध्यापक वर्गावर नाहीच का?
बुद्धिजीवी वर्गाची शस्त्रे कर्णिकांच्या मते, विचार आणि शब्द. पण मग आम्हा सामान्यांना त्यांनी हेही सांगावे, की ‘कृती’ची जबाबदारी कुणाची? शिक्षणक्षेत्राच्या अवनतीबद्दलचे बरेचसे प्रश्न अध्यापक वर्गाच्या कृतिशीलतेनेच सुटतील. परंतु वेतनासाठी हट्टाग्रही असणारा अध्यापक वर्ग, शिक्षण क्षेत्राच्या एकंदरीत परिस्थितीबद्दल अतिशयच उदासीन असलेला दिसतो, म्हणूनच अध्यापकांनाही ‘तेव्हा कुठे गेला होता, राधासूता तुझा धर्म?’ असा जाब विचारण्याचा अधिकार समाजाला आहे, असा मला समजलेला लोकसत्तेच्या संबंधित अग्रलेखाचा अर्थ.
‘उडदामाजी काळेगोरे’ सर्वच क्षेत्रात आहेत. शिक्षण क्षेत्राच्या समर्थतेवर समाजाचे भवितव्य अवलंबून असते म्हणूनच अध्यापकांची जबाबदारी मोठी आहे. दुर्दैवाने, अध्यापक वर्गातल्या ‘ओजस्वी’ प्रभृती व्यापक कृतीपासून दूर राहातात आणि उरलेले पोटार्थी, पगारापुरत्या पाटय़ा टाकतात. हे लक्षात घेतले तर बरेचसे सोपे होइल.
आशीष चासकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा