स्वतच्या फोटोंसाठीची वेषभूषा आणि रंगभूषा त्यांनी ठरवली, म्हणून काय झालं? हे काम तर नाटकाचित्रपटांसाठी कुणीतरी करतच असतं.. मग पुष्पमाला किंवा तिच्याआधीची सिंडी शर्मन, नंतरची मानसी भट्ट यांना दृश्यकलेच्या क्षेत्रात एवढं महत्त्व का मिळतं आहे? रंगरेषांच्या किमयेपेक्षा ठरवाठरवीला एवढं महत्त्व का द्यायचं? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध..
पुष्पमाला आणि सिंडी शर्मन यांच्या छायाचित्र-कृती पाहून अनेकांना प्रश्न पडला की बंगळुरूतली पुष्पमाला आणि तिच्याआधी अमेरिकेत याच प्रकारच्या कलाकृती करणारी सिंडी या दोघींना आपण नेमकं काय म्हणून ओळखायचं. फोटोत त्या आहेत, फोटो अगदी मोजूनमापून, नियोजनबद्धरीत्या, वेषभूषा, रंगभूषा वगैरे करून घेऊन त्यांनी काढून घेतलेला आहे.. म्हणजे पुष्पमाला किंवा सिंडी या त्या त्या फोटोच्या क्षणापुरत्या ‘अभिनेत्री’च ठरतात की नाही? किमान ‘मॉडेल’ तरी? पण हा फोटो असाच हवा, हे त्यांनी ठरवलंय. म्हणजे त्या दिग्दर्शकाचं काम करताहेत. आपल्या फोटोंचं नेपथ्यदेखील त्या निवडतात, त्यामुळे त्या एकप्रकारे कलादिग्दर्शकाचंही काम करत असतात.
हे सगळं त्या करतात, ठीक आहे. पण आपली खरी अढी अशी आहे की, यांना कलावंत कशा करता म्हणायचं? एकतर दोघी स्वत:ची फक्त बुद्धी (आणि शरीर) वापरतात. म्हणजे मग यांचं ‘चित्रकले’तलं कर्तृत्व काय? चित्रकार या अर्थानं यांना आर्टिस्ट म्हणणं हे फाजील लाडच ठरतील.. वगैरे. पण मुळात ‘हे म्हणजे चित्रकला’ म्हणून ज्या काही ठराविक कल्पना होत्या, त्याच बदलल्या. हा बदल स्वाभाविकच होता. बाकीच्या सर्व क्षेत्रांतल्या मानवी जगण्याचा वेग जसा-जितका बदलला, तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त कलेच्या व्याख्यांमधला बदल होता आणि आहे. आम्ही मोबाइल वापरणार, टोरेन्टवरनं सिनेमे डाउनलोड करणार किंवा घरात थ्रीडी टीव्ही आणून बघणार.. पण चित्रकलेनं मात्र एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला जी काही रंगरेषांची शिखरं गाठली असतील तिथंच राहावं आणि आपल्याला कौशल्यपूर्ण रंग-आकार योजनेचे खेळ दाखवावेत, ही आपली अपेक्षा असेल तर मग बोलणंच खुंटतं.
हे असं व्याख्यांसारखं काहीतरी वाचायला बरं वाटत असेल, तरीही आपण ‘पुष्पमालाला चित्रकार या अर्थानं आर्टिस्ट मानायचं का?- तिनं रीतसर आर्टस्कूलमध्ये शिक्षण घेतलंय की ती मॉडेलिंग किंवा अॅक्टिंगच करतेय?’ अशा शंका घेत असतो.
इथं आपण अगोदरपासून जे ठरवलेलं आहे ते आड येत असतं. या ज्या आपल्या ठराविक कल्पना असतात, त्या ‘जुनाट’ असतातच असंही नाही. अगदी अलीकडे- गेल्या दहाएक वर्षांत आपल्याच शेजारपाजारच्या कुणा उभरत्या अभिनेता/अभिनेत्रीनं करवून घेतलेलं स्वत:चं फोटोसेशन- ‘पोर्टफोलिओ’ वगैरे आपण (इच्छा वा आवड नसताना, केवळ त्याला/तिला दुखवायचं नाही म्हणून तरी) पाहिलेलं असतं. त्यातले ते वेगवेगळे ‘मूड्स देऊन’ काढून घेतलेले फोटो आपल्या लक्षात असू शकतात. त्यामुळे मग, हे असे- एखाद्या मनस्थितीचं वगैरे दर्शन घडवणारे फोटो आणि पुष्पमाला किंवा सिंडी शर्मनचे फोटो यांच्यात फरक काय, हे ठरवता येणं कठीण होतं.
आपण मराठीभाषक आहोत. नव्याचं आपल्याला अजिबात वावडं नाही. उलट, नवेपणाचा शोध घेण्याची एक परंपराच आपल्या कविता, नाटक आणि चित्रपट क्षेत्रात दिसते तिचा सार्थ अभिमान आपण बाळगतो. पण चित्रकलेवर मात्र गेल्या काही दशकांमध्ये आपण ‘आपलेच लोक खरे’ म्हणत जो काही अन्याय केलाय, तो आपल्यावर कधी कधी उलटतो तो असा- पुष्पमालाला दृश्यकलावंत का म्हणायचं, हे आपल्याला ठरवता येत नाही.
या स्थितीतून बाहेर पडण्याचे काही मार्ग साधे असतील, काही शास्त्रशुद्ध- पण कठीण असतील.. त्यापैकी एक साधा मार्ग आपण वापरून पाहू. या मार्गाचं नाव आपण सध्या ‘कला म्हणजे ठरवाठरवी’ असं ठेवू या. प्रदर्शनातली सगळी चित्रं कॅन्व्हासवर छान रंगरेषा- आकार- अवकाश दाखवणारी असली तरीही चित्रकार प्रेक्षकांशी त्या चित्रांबद्दल मनापासनं बोलू लागतो तेव्हा ‘मी हे का केलं’, ‘याच्यातून मला काय साधायचं होतं’ या प्रश्नांची उत्तरं देऊ लागलेला आहे, असा अनुभव आपल्याला आला असेल (नसेल तर गॅलरीत नेहमी गेल्यास कधीतरी येईलच) – हे जे बोलणं आहे ते चित्रकाराला आवश्यक वाटत असतं. कारण प्रेक्षक कौशल्यामुळेच चित्राकडे आकृष्ट झाला तरी त्यानं चित्रामागच्या ठरवाठरवीला दाद द्यावी, असं प्रत्येक चित्रकाराला वाटत असतंच. या ठरवाठरवीला प्रेक्षकांनी स्वत:हून दाद दिली तर चित्रकार भरून पावतात- कलानिर्मितीचं समाधान त्यांना मिळतं.
याच्या पुढली अवस्था म्हणजे, कलानिर्मितीच्या समाधानातला ‘ठरवाठरवी’चा गर किंवा अर्क हाच आपल्या दृश्यकलाकृतीचा पाया मानणारे कलावंत.
पुष्पमालानं तिच्या फोटोंमध्ये ती कशी दिसणार आहे हे ठरवलं, त्यासाठी आवश्यक तो मेकप ठरवला, वेशभूषा ठरवली- या अर्थानं तिनं ठरवाठरवी केली ती अगदीच प्राथमिक आहे- हे तर आपल्या शेजारच्या बंटीचं फोटोसेशन करणारा तो फोटोग्राफरही ठरवू शकतोच.. मग पुष्पमालाचे फोटो मात्र कलाबिला कसे काय ठरले?
हा फोटो पाहून लोकांना काय वाटलं पाहिजे, कशाची आठवण आली पाहिजे, त्या आठवणीच्या आधारे त्यांना या जगातल्या व्यवहाराबद्दलचे जे प्रश्न पडू शकतील ते प्रश्न कोणत्या दिशेनं पडले पाहिजेत, याची ठरवाठरवी पुष्पमालानं केली.
पुष्पमाला जसे स्वत:चे फोटो मांडते, तसे अन्य प्रकारे स्वत:चे फोटो मांडणारे आणखी काही दृश्यकलावंत भारतात आहेत. निखिल चोप्रा आणि मानसी भट्ट हे सध्या त्यांच्यापैकी अधिक सुपरिचित (जगात ठिकठिकाणी प्रदर्शनं झालेले वगैरे) आहेत. पण पुष्पमालाची ठरवाठरवी- तिचा तिच्या फोटोंमागचा हेतू- आणि निखिल चोप्रा किंवा मानसी भट्टच्या फोटोंमागचे हेतू निरनिराळे होते आणि आहेत.
निखिलच्या कलाकृती, मानसीच्या कलाकृती आपण पुढे पाहूच, पण आत्ता हे जे सारखं पुष्पमालाचा हेतू हेतू लिहिलं जातंय, त्याबद्दल खुलासा आवश्यक आहे.
पुष्पमाला ही स्त्रीस्वातंत्र्याची पुरस्कर्ती आहे. स्त्रीस्वातंत्र्य म्हटलं की योनिशुचितेचे, लैंगिक सुखासाठी तरी पुरुषावरच अवलंबून राहण्याचे प्रश्न पडू शकतात, ते तिनं स्वत:पुरते सोडवलेले आहेत. तिच्या खासगी आयुष्यात तिनं असे काही निर्णय घेऊन ते राबवलेले आहेत की जेणेकरून, आपणा सर्वाच्या (प्रचलित आणि सर्वसंमत) स्त्रीविषयक कल्पना काहीशा हास्यास्पदही ठरवण्याइतक्या दृष्टिकोनापर्यंत पुष्पमाला जाऊ शकते. पण ती हे थेटपणे न करता कलेद्वारे करते आहे. ज्यांना तिचा दृष्टिकोन अजिबात पटत नाही, ते पुष्पमालाच्या एकंदर फोटोंना ‘स्लो पॉयझनिंग’ असं दूषणही देऊ शकतील. पण तुम्ही ज्याला प्रचलित आणि सर्वसंमत मानताहात त्याला सौम्यपणे का होईना, मी प्रश्न विचारणारच- आव्हान देणारच, असं पुष्पमालाचं म्हणणं तिच्या या फोटोंमधून मांडलं जातं आहे. गेल्या पाच वर्षांत पुष्पमालानं कलेतिहासविषयक कल्पनांनाही असेच सौम्यपणे प्रश्न विचारणं, आव्हान देणं सुरू केलं आहे. पुष्पमाला सिनेमाची अभ्यासक असल्यामुळे, आपले प्रेक्षक ‘प्रतिमावाचन आणि प्रतिमेबद्दल भावनिक भूमिका घेणं’ हे काम उत्तमपणे करत असतात, याची खात्रीच तिला आहे.
फोटोमध्ये मीच असेन- पण प्रत्येक फोटोतून दिसणाऱ्या काळाला, त्यातल्या स्त्रीच्या स्थितीला आणि फोटोतल्या स्त्रीच्या हावभावांना तुम्ही निरनिराळा प्रतिसाद देणार आहात हे मला माहीत आहे, अशा विश्वासातून पुष्पमालाचं काम सुरू असतं. तुमचा प्रतिसाद काय असेल, याच्या ठरवाठरवीचं हे काम आहे.
आता सांगा, फोटोत तीच दिसत्येय आणि तिनं मेकप-बिकप केलाय हे खरंच महत्त्वाचं आहे का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा