ईश्वराचे अस्तित्व हे ‘स्वयंमात्र’ (इनइटसेल्फ) असो, नसो वा अज्ञेय राहो; त्याने फरक पडत नाही. बहुसंख्य माणसांच्या मनातले अस्तित्व तर नाकारता येत नाही! माणसे त्यांच्या जाणिवेत कशा स्वभावाचा ईश्वर मानून, त्याआधारे स्वत:च्या कसल्या कृतींना प्रेरणा मिळवतात, याने मात्र फरक पडतो. त्यांची ‘उपासनादृष्टी’ त्यांच्या मूल्यव्यवस्थेवर परिणाम करतेच. धर्म-सुधारणेच्या संदर्भात, उपासनादृष्टींची एक चिकित्सा.
मी धर्म हा शब्द रिलिजन/मजहब या अर्थानेच वापरत आहे. कर्तव्याला ‘कर्तव्य’ हा नि:संदिग्ध शब्द असताना उगीच ‘धर्म’ हा संदिग्ध शब्द वापरून गोंधळ वाढवणे मला मान्य नाही. मानवी कल्याणाचा मार्ग अचल (अपरिवर्तनशील)- धर्मनिष्ठा, धर्मउच्छेद वा धर्मपरिवर्तन यांपकी कशातून जातो यावर कडाक्याचे मतभेद आहेत. या तीन पक्षांना अनुक्रमे सनातनी, नास्तिक आणि धर्मसुधारक असे शब्द ढोबळमानाने वापरले जातात. पकी अचल-धर्मनिष्ठेला स्पष्ट नकार देण्याच्या पक्षात मी पक्का आहे. धर्मउच्छेदवादी व धर्मपरिवर्तनवादी यांच्यात कित्येकदा माणसाने कसे असायला हवे (अहिंसक, न्यायी, कर्तव्यनिष्ठच नव्हे तर उदारही इ.) हा जो खरा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यावर बऱ्यापकी एकमत असते. असे असूनही उच्छेदवादी (निष्ठावाद्यांबरोबर) परिवर्तनवाद्यांनादेखील दूर लोटतात. पण स्वत:च लोकांतून बाजूला पडतात असा इतिहास आहे व तो अजूनही चालूच आहे. उच्छेदवादी, ईश्वराच्या स्वरूपाची चिकित्सा करण्याऐवजी त्याच्या अस्तित्वावर वाद घालून मोठीच गल्लत करतात. ‘‘पुराव्याचे नसणे हा नसण्याचा पुरावा नव्हे,’’ या बिनतोड मुद्दय़ावर ते हमखास अडचणीत येतात. श्रद्धा हा ज्ञान-दावा नसतोच. त्याचे प्रमाण काय मागणार? श्रद्धाविधान हे श्रद्धावानाच्या अंतरंगाविषयीचे असते. वास्तवाविषयीचे नसतेच. इहवादापुढील प्रश्न श्रद्धा नाकारण्याचा नसून श्रद्धेची सक्ती नाकारण्याचा आहे. दुसरे असे की, धर्मचच्रेत उतरायचेच नाही, या हटवादापायी आपण ‘परिवर्तनवादी पण धार्मिक’ असे मित्र गमावत राहिलो, तर सनातन्यांच्या कचाटय़ातून लोक सुटणार तरी कसे? हाही विचार नास्तिक प्रागतिकांनी करायला हवा. माझ्या या मतामुळे माझे नास्तिक मित्र माझ्यावर रागावतात. ‘‘एकदा का तुम्ही ‘त्याला’ थोडी जरी फट सोडलीत की धर्माधतेचे सगळे नष्टचर्य मागे लागलेच म्हणून समजा.’’ असा इशारा ते मला देतात. ही चिंता मी समजू शकतो, कारण ‘धर्माधतेचे नष्टचर्य’मध्ये काय काय येते याची जाणीव मलाही आहेच.
ते काहीही असो. उपासक हे तर वास्तवातच व दणदणीत बहुमतात आहेत आणि त्यांना बरोबर घेऊनच परिवर्तन करायचे आहे. ‘तो’ रिटायर तर होत नाहीये. मग निदान त्याची जॉब-एनरिचमेंट तरी करूया! म्हणूनच आता उपासक आणि त्याच्या अंतरंगातील उपास्य यांत काय प्रकारची नाती असू शकतात व उपासकाची उपासनादृष्टी त्याला माणूस म्हणून ‘कशा प्रकारचा’ घडविते हे पाहिले पाहिजे. ही चिकित्सा करताना आपण ईश्वराच्या ईश्वरत्वालाच ढळ पोहोचत नाही ना? हा धार्मिकांच्या चौकटीतलाच निकष वापरणार आहोत.
उपासनादृष्टींना ईश्वरत्वाचीच कसोटी
१. सौदेबाजी किंवा वशीकरण ही दृष्टी ईश्वराची अवहेलनाच करते. ‘तुझी कामे आम्ही करतो त्या बदल्यात तू आमची कामे कर’ या ऑफरने ईश्वराला वश करू पाहणे म्हणजे त्याला भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या पातळीवर आणणे आहे. यज्ञातील मंत्रांना निसर्गाचे पासवर्ड समजण्यापासून ते कोंबडी, दारू मागणाऱ्या ढमकोबा-ठमकाईंपर्यंत ही दृष्टी पसरलेली आहे. यात उपासकांच्या नाडय़ा कोणती कामे ‘त्याची’ हे ठरविणाऱ्या धर्मगुरूंच्या हातात जाऊन बसतात.
२. कोणीतरी सांगितलेला एकच ईश्वर खरा आहे. त्याची जणू इतर ‘तथाकथित ईश्वरांशी’ स्पर्धा आहे. उपासकांनी ‘एकमेव खऱ्या’ ईश्वराशीच निष्ठावान राहायचे आणि इतरांशी निष्ठावान राहणाऱ्यांना वठणीवर आणायचे वा नष्ट करायचे. जे ‘एकमेवा’च्या मते सतानी वा अपवित्र (प्रोफेन) असेल तेही नष्ट करायचे. मुख्य म्हणजे हे काम स्वत:च्या उपासनेचा भाग म्हणून करायचे. मग इह-परलोकीचे कल्याण करण्याबाबत ‘खरा’ ईश्वर निष्ठावानांची (एक्सक्लुजिवली) निवड करेल. यात पुण्यकृत्याद्वारे निष्ठा न तपासता निष्ठा हेच पुण्यकृत्य बनून बसते. असा ईश्वर मानणे, म्हणजे ईश्वराला सत्तापिपासू झोटिंगशहा बनविणे आहे.
३. ईश्वराने जे वैध वा निषिद्ध ठरविले असेल त्याप्रमाणे उपासक आपले आचरण राखतो. यामुळे ईश्वराला अभिप्रेत असलेली ‘सुव्यवस्था’ टिकते. पण उपासकाच्या प्रेरणा या पाप-भये व पुण्य-प्रलोभने याच पातळीवर राहतात. उपासकांना भले-बुरे कळतही नाही आणि स्वत:चा नतिक-निग्रह राखताही येत नाही. यात उपासक हे ‘मॅनेजिबल’ बनतात. स्वतंत्र-नतिक-कत्रे बनत नाहीत. यात जरी ‘त्याच्याशी निष्ठे’पासून ‘एकमेकांशी करण्याच्या आचरणा’पर्यंत, उन्नयन होत असले तरी ईश्वर हा हितकारी-हुकूमशहा (बेनिव्होलंट डिक्टेटर) बनतो. ‘रामराज्या’चे आकर्षण असे या दृष्टीचे वैशिष्टय़ सांगता येईल.
४. यात ईश्वराने मानवाला स्वातंत्र्य दिलेले असते, पण ते त्याची परीक्षा घेण्यासाठी. हा कडक परीक्षक प्रार्थनांना बधत नाही. प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचवणे हे काम धर्मपीठाकडून होत नाही. उपासकाला आपण कृपाप्राप्त आहोत की नाही हे कसे कळते? तर ईश्वराच्या दिव्यत्वगुणाच्या (ग्लोरी) खुणा इहलोकी प्राप्त झाल्याने. श्रम-उद्योग करून वैभव वाढवणे ही उपासना ठरते! कॅलव्हिनिस्ट प्रॉटेस्टंट संप्रदाय आणि औद्योगिक क्रांती यातील असा संबंध मॅक्स वेबरने मांडला आहे.
५. यात परीक्षेस उतरायचेच असते, पण भर ‘त्या’च्या दिव्यत्वगुणा (ग्लोरी)कडून ‘त्या’च्या मांगल्यगुणाकडे (ग्रेस) शिफ्ट झालेला असतो. विकारवश न होता निखळ कर्तव्यबुद्धीला जे पटते ते निष्ठेने करणे ही उपासना बनते. कांट, गांधीजी वगरेंनी कर्तव्यनिष्ठा हीच उपासना, उपासना हे कर्तव्य नव्हे, असा क्रम उलटविला. ही धर्मक्षेत्रातली नतिक-इहवादी क्रांतीच होती. पण ‘विकारवश न होता’ या भरात सुखाने होणारी मानसिक शक्तीची भरपाई हा विषयच बाद होतो. त्याग, आत्मक्लेश, तपोबल या दिशेने जाणारा शुद्धतावाद (प्युरिटनिझम) उरतो.
६. स्वत:चा स्वत:शीच असलेला झगडा/ताण/दुरावा पूर्ण लोप पावला आहे, अशी शांत-आनंदी-अवस्था (आत्मावस्था) प्राप्त करणे हे उपासनेचे उद्दिष्ट बनते. अहंकार झडावा यासाठी माणसाने मिळेल ते फळ त्याचा प्रसाद म्हणून घ्यायचे असते आणि स्वत:चे कर्तृत्व हे त्याचे कर्तृत्व म्हणून समíपत करायचे असते. पण असा संवाद स्वत:शीच करणे अवघड असते. ‘मी व तू हा संवाद शक्य करणारा ‘द्वितीय पुरुष’ म्हणून असणारा सखा’ (संत-परंपरा व गॅब्रियल मास्रेल) ही भूमिका ईश्वराकडे येते.
उपासनादृष्टींचे वरील वर्गीकरण हा एक अपुरा व नम्र प्रयत्न आहे. तसेच निरीश्वरवादी असूनही उपासना सांगणारे धर्म, हा विषय जागेअभावी घेऊ शकलेलो नाही. असे धर्म ईश्वरवादी धर्माच्या मानाने कमी धोक्याचे असतात, एवढाच उल्लेख करून ठेवतो.
सतान-नास्तिकता जास्त महत्त्वाची
एकच एक सत्यधर्म असू शकतो हा आग्रह बऱ्याच (आंतर-साम्प्रदायिक) िहसक व युद्धसदृश घटनांना कारणीभूत ठरतो. तसेच प्रसारवादी धर्मानी जग जिंकण्याची कामगिरी ही ‘उपासनेत आवश्यक’ करून घेतलेली असते. इतकेच नव्हे तर कोणत्याही एकाच धर्मात जी अंतर्गत दमनकारिता असते ती अ-धर्माचे दमन किंवा अपवित्रा (प्रोफेन)चे उच्चाटन करणे हे धर्मपालकाचे कर्तव्य मानल्यानेच फोफावलेली असते. ईश्वर जर सर्वशक्तिमान आहे तर त्याच्या आज्ञांपासूनचे विचलन चालू देणे हा त्याच्याच योजनेचा भाग असणार. तो कृपाळूही असेल तर तो भरकटलेल्यांना समृद्धी देईलच देईल. ते उपासकांचे काम नाही. तो आपली परीक्षा पाहतोय असे जरी मानले तरी आपण आपापला पेपर नीट लिहावा! कोण कॉपी करतेय किंवा कोण चुकीची उत्तरे लिहितेय वा कोण परीक्षेला दांडी मारतेय याची उचापत प्रामाणिक परीक्षार्थीनी कशाला करायची? एवढे एकच पथ्य पाळले तर जगात धर्मावरून युद्धे होण्याचे कारण उरत नाही. दुर्बुद्धीही ईश्वरच देत असेल आणि ती ‘सुचल्या’बद्दल नरकयातना वा आपल्या एजंटांकरवी पीडाही ईश्वरच देत असेल तर तो ईश्वर कसला? सतानच ठरतो! बरे, स्वतंत्ररीत्या कोणी सतान जर अस्तित्वात असेल तर आपला (चांगला) ईश्वर सर्वशक्तिमान उरत नाही!
धर्मक्षेत्रात जो तातडीने बदल हवा आहे, तो ईश्वराचे अस्तित्व न मानणे हा नसून, सतानाचे अस्तित्व न मानणे हा आहे. ईश्वराच्या जगात दुष्टावा हा भरकटल्याने घडत असेल, पण त्याला सत्-ता नाही ही श्रद्धा प्रबळ हवी. तसेच एक तर पवित्र/अपवित्र (सेक्रेड/प्रोफेन) ही जोडीच नाकारली पाहिजे किंवा जे आहे ते पवित्रच आहे, कारण ते ईश्वराच्या अनुमतीनेच आहे ही श्रद्धा भक्कम हवी. अनीश्वर असे काहीच नाही. सर्व काही ईश्वराच्या आतच आहे. या भूमिकेला सर्वेश्वरवाद*       (पॅन-थीइझम) म्हणतात. हा मूल्यात्मक बाबतीत इहवादाशी छेद न जाणारा (कम्पॅटिबल) असतो.
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल- rajeevsane@gmail.com
* उपनिषदांपासून सर्वेश्वरवाद सिद्ध करणारा डॉ. रामचंद्र पारनेरकर महाराज यांचा ‘पूर्णवाद’ हा ग्रंथ या दृष्टीने अभ्यसनीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा