बोस्टन आणि बंगळुरू येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या बॉम्बस्फोटांची तुलना होणे स्वाभाविकच आहे. भारत ही उगवती महासत्ता असल्याचे सांगत आपण आपलीच पाठ थोपटून घेत असतो म्हणून, आणि गतवर्षीच्या ‘जागतिक दहशतवाद सूची’मध्ये दहशतवादी हल्ल्यांबाबत जगात चौथ्या क्रमांकावर असलेले राष्ट्र म्हणून, अमेरिकेसारख्या प्रगत देशातील दहशतवादी हल्ल्याची घटना आणि त्याचा तपास याच्याशी आपणच आपली तुलना करणे हे आवश्यकही आहे. बोस्टन मॅरेथॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर दोनच दिवसांनी बंगळुरूतील भाजप कार्यालयानजीक स्फोट झाला. तो कोणी केला, याचा गंधही पोलिसांना अद्याप नाही. पोलीस तपासाच्या बाबतीत आपण मागे असलो, तरी या अशा प्रत्येक घटनेचे, मग तो दहशतवादी हल्ला असो की, बलात्काराच्या घटना, राजकारण करण्याचे जे कौशल्य आपण हस्तगत केलेले आहे, त्यास मात्र तोड नाही. याचा पुन:प्रत्यय या प्रकरणातही आला. बंगळुरूमधील स्फोटाचा आवाजही विरत नाही, तोच त्यावरून अत्यंत निर्लज्ज अशी राजकीय ‘बयानबाजी’ मात्र सुरू झाली. कर्नाटकात निवडणूक प्रचार सुरू असल्याने असे अकलेचे तारे तोडले गेले म्हणावे, तर ते तसेही नाही. कारण, एरवीही आपण हेच करीत असतो. स्फोटानंतर मंत्रिगणांनी अत्यंत स्थितप्रज्ञतेने ‘भ्याड हल्ल्याचा निषेध’ करून मृतांच्या कुटुंबीयांना ‘भरपाई’ देणे आणि विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे, अशी एक थोर परंपराच आपण बूमबहाद्दरांच्या सक्रिय सहभागाने तयार केलेली आहे. बोस्टन बॉम्बस्फोटानंतर मात्र ना त्या राज्याच्या, मॅसेच्युसेट्सच्या राज्यपालांचा राजीनामा मागण्यात आला, ना ओबामांचा. त्या संकटाच्या वेळी संपूर्ण देश एक बनून प्रशासनाच्या मागे उभा होता. फरारी चेचेन दहशतवाद्याला पकडण्यासाठी पोलिसांनी बोस्टनच्या एका उपनगराची ‘टाळेबंदी’ केली, तेव्हाही तेथील नागरिकांमध्ये हीच भावना होती. किंबहुना, फरारी दहशतवादी पकडला गेला, तो एका जागरूक नागरिकाने दिलेल्या माहितीमुळेच. दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय आणि सामाजिक व्यवस्थांची वर्तणूक कशा प्रकारची असावी, याचाच तो वस्तुपाठ होता. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या काळात केलेली भाषणे हीसुद्धा तेथील एकूण व्यवस्थेच्या प्रगल्भतेचीच द्योतक होती. घेराव घालून तोंडातच बूमचे दांडके कोंबणाऱ्या पत्रकारांना बाइट देत बसण्याऐवजी किंवा प्रवक्त्यांच्या तोंडातून बोलण्याऐवजी ते थेट लोकांसमोर गेले होते. शुक्रवार रात्रीचे त्यांनी राष्ट्रास उद्देशून भाषण केले. ‘कोणत्याही उपलब्ध माहितीवरून बोस्टन हल्ल्याबाबत निष्कर्ष काढण्याचा मोह होतो. पण अशा प्रकारची दुर्घटना जेव्हा घडते, तेव्हा आपण सर्व काही योग्य प्रकारेच केले पाहिजे. तपास अधिकारी, न्यायालये त्यासाठीच असतात. आणि म्हणूनच आपण त्या व्यक्तींच्या आणि त्या ज्या समाजघटकांतील आहेत, त्यातील प्रत्येकाच्या हेतूंबाबत कोणत्याही निष्कर्षांप्रत येता कामा नये.’ त्यांचे हे भाषण ऐकल्यानंतर कोणासही वाटावे, की ओबामा अमेरिकी नागरिकांस नव्हे, तर बंगळुरूमधील काँग्रेस आणि भाजपच्या बोलभांड नेत्यांनाच उद्देशून बोलत होते! विशेष म्हणजे ९/११चा हल्ला किंवा त्यानंतरचे इराकवरील आक्रमण या वेळी तेथील काही वृत्तवाहिन्यांना चढलेली ‘मर्डॉकी’ राष्ट्रवादाची नशाही या वेळी दिसून आली नाही. माध्यमांचे सुसंस्कृत वर्तन, तपासयंत्रणांची कार्यक्षमता, राजकीय व्यवस्थेची प्रगल्भता अशा विविध अंगांनी बोस्टन आणि बंगळुरूची तुलना केली, तर एक गोष्ट प्रकर्षांने समोर येते की, आपल्या सगळ्याच स्तंभांना आपली इयत्ता उंचावण्याची खूपच गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा