गेले २-३ दिवस मनोहर जोशीसरांच्या संबंधातल्या बातम्या वाचून आश्चर्य वाटले आणि दु:खही झाले. शरद पवारांची त्यांनी दिल्लीत घेतलेली भेट व उद्धव ठाकरे यांच्यावरील त्यांची टीका या दोन्ही गोष्टी अत्यंत लाजिरवाण्या अहेत. जोशीसरांना शिवसेनेने इतके मोठे केले हे ते विसरले, पण लोक विसरणार नाहीत. त्यांना मुंबई महापालिकेत महापौरपद दिले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दिले, अटलजींच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते दिले, लोकसभेचे सभापतीपद देऊन त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा यथोचित गौरवही केला. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वयाची पंच्याहत्तरीही ओलांडली आहे, आता त्यांनी स्वस्थ बसून तरुण मंडळींना मार्गदर्शन करणे हेच अपेक्षित असताना पवारांसारख्या धूर्त राजकारण्यांची भेट घेऊन काय साधले किंवा काय साधायचे ठरवले आहे? त्यांना काय साधायचे आहे हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यांनी बेशिस्तीचे जे प्रदर्शन सध्या चालवले आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. एक प्रथितयश व नावाजलेला शिक्षकच अशा प्रकारे वागून विद्यार्थ्यांपुढे (अनुयायांपुढे )असला घाणेरडा आदर्श ठेवतो हे कदापीही मान्य होण्यासारखे नाही. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो हे जोशीसरांना कोण सांगणार? बाळासाहेब असते तर असे वागण्याची हिंमत त्यांनी केली असती का? सरांनी आजच्या परिस्थितीत कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता शिवसेनेचे मार्गदर्शक होणे एवढेच अपेक्षित आहे, निवडणुकीच्या भानगडीत त्यांनी पडूच नये, कारण जर ते दुर्दैवाने निवडून आले नाही तर तो धक्का सहन करू शकतील असे वाटत नाही.
त्रागा साहजिकच!
मनोहर जोशीसरांची उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका वाचून फार वर्षांपूर्वी वाचलेल्या एका पुस्तकातली एक willing to wound but afraid to strike. अडवाणी, जोशीसर यांच्यात यानिमित्ताने साम्य दिसले. घरात मुले कर्तीसवरती झाल्यावर आपल्याला कोणी विचारात नाही या विचाराने (की कल्पनेने?) त्रागा करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारी घराघरातली ज्येष्ठ मंडळी नजरेसमोर आली. जे घरात, तेच दारात अथवा दिल्लीत तेच गल्लीत असा िपडी ते ब्रह्मांडी असेही वाटले. डॉ. राधाकृष्णन यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुन्हा राष्ट्रपती होण्यासाठी पािठबा दिला नाही त्या वेळीसुद्धा असाच प्रकार थोडय़ाफार फरकाने झाला होता. मनोवैज्ञानिकांनी अभ्यास करावा असा हा गुंतागुंतीचा खेळ माझ्यासारख्या सर्वसामान्यांना उदास करणारा वाटतो!
गजानन गुर्जर पाध्ये, दहिसर
तरीही, सचिन सामान्यच!
‘सचिनला देवत्व का देताय’ या शुभा परांजपे यांच्या पत्राने (१२ ऑक्टो.) माझ्यासारख्या असंख्य वाचकांच्या भावनांना वाट करून दिली आहे. सचिन हा महान खेळाडू आहे. आणि तो २४ वर्षे क्रिकेट खेळून निवृत्त होत आहे याला आपण किती महत्त्व देणार आहोत? मुळात सचिनचा फॉर्म गेल्यामुळे पुढील कसोटीत त्याला अकरा खेळाडूंमध्ये खेळवतील का नाही हीच शंका होती, पण सचिनने क्रिकेट बोर्डाला भावनिक आवाहन करून या दोन कसोटींची तजवीज हुशारीने करून घेतली आहे. सचिन देशासाठी खेळला ही एक आणखी भावनिक फसवणूक आहे, कारण सर्वच खेळाडू देशासाठीच खेळतात. देशातील नागरिकांसाठी भरीव असे समाजकार्यही त्यांनी केले नाही, जाहिरातीत चमकून भेट मिळालेली फेरारी विकून, आपल्या व्यायामशाळेसाठी अनधिकृत बांधकाम करण्याचा घाट घातलेला सचिन हा आपल्यासारखाच सामान्य आहे. तेव्हा भावी गुणी खेळाडूंची वाट अडवणाऱ्या सचिनच्या निवृत्तीच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटच्या मोरीचा बोळा आता सुटला आहे असेच म्हणावे लागेल.
देवयानी पवार, पुणे
‘भारतरत्न’ देऊन उतराई व्हावे
मास्टर-ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर गेली अडीच दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर तसेच भारतातील हृदयांवर अधिराज्य गाजवून आपला अखेरचा ऐतिहासिक दोनशेवा सामना खेळून निवृत्त होतोय, याचे दु:ख आहे. सचिन हा भारतीयांचा रत्न आहे हे त्याने गेली २४ वष्रे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून सिद्ध करून दाखवलेले आहेच. तो क्रिकेट आणि भारतातील मायकल फेल्प्सच आहे. त्याचे निवृत्तीचे दु:ख तर होतेय, पण त्याला कधीतरी जावे लागणारच, पण त्याच्या चाहत्यांचे हे दु:ख थोडय़ाफार प्रमाणात का होईना त्याला भारतरत्न देऊन कमी नक्कीच करता येईल..!
मुस्तफा मिर्झा, भडगाव, जि. जळगाव</strong>
सचिनचीच सवय..
२४ वर्षांची सवय! हा अग्रलेख वाचला (१२ ऑक्टो.). उत्कृष्ट खेळणारे बरेच आहेत, पण आम्हाला सवय सचिनचीच. अरे कोण खेळतंय? ‘सच्या’ खेळतोय असे समजले की आम्ही निर्धास्त व्हायचो. जणू क्रिकेट=सचिन हे समीकरण झालं. सचिन प्रत्यक्षात अनेकांना भेटलेला नसेल तरी तो अशा कोटय़वधींना जवळचा वाटतो.
वैभव वि. शेवाळे, पुसद जि. यवतमाळ</strong>
हुरहुर लावणारी निवृत्ती
सचिन निवृत्त कधी होणार? सध्या तो फार्मात नाही म्हणूनच त्याने आताच निवृत्ती घेण्यात खरे शहाणपण आहे. किंवा सचिनने अजून काही काळ खेळत राहावे अशा अनेक प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया रसिकांकडून ऐकू येत होत्या. पण या सर्वाना सचिननेच आता पूर्णविराम द्यायचे ठरविले आहे. वानखेडेवरील २०० वा सामना खेळून सचिन निवृत्त होणार व त्यानंतर त्याचा मदानावरील झंझावात पुन्हा पाहावयास मिळणार नाही हे ऐकूनच सर्व रसिक प्रेक्षक दु:खी झाले आहेत. पण त्याला इलाज नाही, मग कोणीही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असो त्याची ठराविक वयोमर्यादेनंतर निवृत्ती ही अटळ असते. व सचिनने या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला आहे. कारकिर्दीतील २०० सामने खेळणे ही काही सोपी गोष्ट नाही हादेखील एक विक्रमच म्हणावयास हवा. या सर्व यशाचे गमक म्हणजे त्याची जिद्द, चिकाटी व मनाची एकाग्रता हे आहे. त्याच्या जवळपास कोणी जायचे ठरवले तरीही त्यासाठी त्याला अथक मेहनत तसेच खडतर मेहनत घ्यावी लागेल. व इतके करूनदेखील तो तिथपर्यंत पोहोचेल याची शाश्वती नाही, नशिबानेदेखील तितकीच साथ देणे गरजेचे आहे. सचिन खऱ्या अर्थाने एका उत्तुंग शिखरावर पोहोचला आहे. पण सचिनला गर्व कधी शिवला नाही. सचिनचे मदानावर असणे त्याच्या इतर सहकाऱ्यांना प्रेरणादायी ठरत असे. सचिनने भरपूर लक्ष्मी कमावली, पण गरजूंना सढळ हस्ते दानही केले. अशी सचिनची ख्याती त्रिखंडात आहे.
गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (पू.)
पोपशरणता कशासाठी?
अन्नसुरक्षा विधेयाकाबद्दल बरीच चर्चा झाली.. काँग्रेसवाल्यांनी ते सोनिया गांधींचे स्वप्न असल्याची भलामण केली. संसदेचे अधिवेशन अगदी तोंडावर आले असतानाही काँग्रेसने घाईने या विधेयकासाठी अध्यादेश काढला होता. हे विधेयक नेमके गरिबांसाठी होते की पोपना दाखवायला होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस यांनी व्हॅटिकनमध्ये जाऊन खुद्द पोपना या विधेयकाची प्रत सादर केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटी येथे आयोजित केलेल्या जागतिक अन्नसुरक्षा परिषदेला केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस हे उपस्थित होते. त्या वेळी पोपची भेट घेऊन त्यांना विधेयकाची प्रत देऊन अन्य तपशील सादर केला. मुळात आपल्या देशातील जनतेसाठी बनविण्यात आलेले विधेयक एखाद्या धर्मगुरूला का दाखवावे? एकीकडे धर्म आणि राजनीतीत अंतर हवे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच्या विपरीत वागायचे हा कुठचा न्याय? हेच आपल्या देशातील एखाद्या शंकराचार्याना एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने दाखवले असते तर प्रसारमाध्यमांनी लगेच केवढा गहजब माजवला असता.
दत्ता केशव माने, लातूर</strong>