सुब्बाराव यांच्यानंतर आता कठीण काळात रघुराम राजन यांना चलनस्थैर्याबरोबरच अन्य आव्हानेही पेलावी लागतील.
बदलामध्ये धोका असतो. परंतु न बदलणे अधिक धोकादायक असते, अशा शब्दांत रघुराम राजन यांनी बुधवारी रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे घेतल्यानंतर आपल्या विचारांची दिशा स्पष्ट केली. पहिल्याच दिवशी राजन यांनी पाच महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा जाहीर करून त्यांनी तरुण वयातील गतीचा अंदाज अर्थनिरीक्षकांना दिला. राजन अवघे पन्नास वर्षांचे आहेत. रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी इतक्या लहान वयात कोणाची नेमणूक होण्याची ही पहिलीच वेळ. तरुण वयात मोठे पद हाताळताना विवेकाची जागा उत्साहाने घेतली जाण्याची शक्यता असते. राजन यांच्याबाबत तो धोका संभवणार नाही असे म्हणणे धोकादायक ठरणार नाही. त्यांच्याबाबत इतके आशावादी होण्याचे कारण गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच निवेदनात त्यांनी दाखवलेली विचारांची दिशा आणि स्पष्टता. कटू निर्णय घेण्यापासून आपण मागे हटणार नाही कारण लोकप्रिय होणे वा फेसबुकवर जास्तीत जास्त चाहते मिळवणे हे काही आपले उद्दिष्ट नाही, हे नमूद करीत त्यांनी राजकीय दबावाचा मुद्दा निकालात काढला. बँकांना विद्यमान व्यवस्थेत नव्या शाखा सुरू करण्यासाठी रिझव्र्ह बँकेची परवानगी लागते. ही सरकारी विचारधारा. ज्या बँकांना जेथे शाखा सुरू करायच्या आहेत तेथे त्या करू द्याव्यात. शेवटी आपणास कोठे फायदा आहे वा तोटा हा त्या त्या आस्थापनाचा विचार असतो. आपल्या पहिल्याच घोषणेत राजन यांनी ही शाखांसाठी परवानगीची पद्धत निकालात काढली. रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून कोणत्या खासगी कंपन्यांना बँकांचे परवाने द्यायचे याचा निर्णय जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशीही घोषणा त्यांनी केली. गेल्या काही वर्षांत बँकांच्या वाढत्या थकीत कर्जाचा मुद्दा अधिकाधिक गंभीर होत चाललेला आहे. राजन यांना तो प्रश्न लवकरात लवकर धसास लावावयाचा आहे. तसे करायचे म्हणजे देशातील काही राजकीय सुरक्षित उद्योगपतींना आव्हान देण्यासारखे आहे, याची जाणीव त्यांना असणारच. तरीही या उद्योगपतींकडे अडकलेले तब्बल सहा लाख कोटी रुपये सोडवण्याच्या त्यांच्या निर्धाराचे स्वागत करावयास हवे. धनिक वा उद्योजकांकडील गुंतवणूक हा जरी चिंतेचा विषय असला तरी तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामान्य नागरिकास भेडसावणारी चलनवाढ. जनसामान्यांची झोप उडवणारी चलनवाढ रोखणे हे पूर्णपणे रिझव्र्ह बँकेच्या हाती नसले तरी त्या समस्येची जाणीव आपल्याला आहे हे राजन यांनी दाखवून दिले आणि चलनवाढीशी निगडित गुंतवणूक प्रमाणपत्रे बाजारात आणण्याच्या धाडसी आणि नावीन्यपूर्ण प्रयोगाची घोषणा केली. हे बहुधा पहिल्यांदाच होत असावे. त्याचप्रमाणे कोणत्याही बँकेतून कोणतीही देणी देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि बँकांशिवाय अन्य व्यवस्थापनांना एटीएम सेवा सुरू करण्यास उत्तेजन देणे हे दोन्ही प्रयोगही तितकेच नावीन्यपूर्ण म्हणावयास हवेत. रिझव्र्ह बँकेच्या काही घोषणांनी वा निर्णयांनी गेल्या काही दिवसांत बाजारपेठेत खळबळ उडाली. आपल्याही काळात बाजारपेठेस धक्का दिला जाणारच नाही असे नाही, हे राजन यांचे वक्तव्य सूचक म्हणावे लागेल.
व्हिडिओ : आरबीआयचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांचे पहिले भाषण
सुब्बाराव यांच्याप्रमाणे राजन यांची पाश्र्वभूमी सरकारी नाही. ते अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत. त्यांना व्यायामाची आवड आहे आणि अमेरिकेतील वास्तव्यात ते मॅरेथॉनसारख्या स्पर्धात सहभागी होत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील कामाचा अत्यंत लक्षणीय असा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तेथील कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या अर्थतज्ज्ञांशी वा त्या त्या देशांतील रिझव्र्ह बँक प्रमुखांबरोबर त्यांची ऊठबस होती. तो काळ अमेरिकी अर्थव्यवस्थेचा फुगा फुगण्याचा. अमेरिकेचे म्हणून एक दडपण असते. मग ते क्षेत्र कोणतेही असो. परंतु राजन यांनी ते दडपण न घेता अमेरिकेच्या श्रीमंती आकाशात आर्थिक संकटाचे ढग लवकरच जमा होतील अशी लक्षणे आहेत, असे जाहीर भाकीत करून अनेक अर्थतज्ज्ञांचा रोष ओढवून घेतला होता. त्यातील एकाने राजन यांच्या विचारांचे वर्णन अत्यंत मागास आणि नव्यास विरोध करणारा असे केले होते. पुढे त्याच्या दुर्दैवाने.. आणि तरीही राजन यांच्या सुदैवाने नाही.. ती भविष्यवाणी खरी ठरली आणि अमेरिकेवर गंभीर आर्थिक संकटास तोंड देण्याची वेळ आली. आता तेच रघुराम राजन हे भारतीय रिझव्र्ह बँकेची सूत्रे हाती घेत असताना योगायोग असा की त्यांना मागास म्हणून संबोधणाऱ्याकडेच, लॅरी समर्स यांच्याकडे, अमेरिकी फेडचा, म्हणजे त्या देशातील रिझव्र्ह बँकेचा, कारभार सोपवला जाईल अशी चिन्हे आहेत. राजन यांची खरी कसोटी लागेल ते अमेरिकी फेडच्या प्रमुखपदी समर्स यांची नियुक्ती झाली तर. अमेरिकी फेडचे विद्यमान प्रमुख बेन बर्नाके अवघ्या तीन महिन्यांनंतर, नव्या वर्षांरंभी जानेवारी महिन्यात निवृत्त होणार असून त्यांच्या जागी समर्स हेच येतील अशी लक्षणे आहेत. खुद्द अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडूनच याबाबत सूचित करण्यात आले आहे. तेव्हा त्याप्रमाणे खरोखरच समर्स यांची नियुक्ती झाली तर भारताप्रमाणे अनेक विकसनशील देशांना त्यांचा फटका बसेल हे भाकीत आताच वर्तविले जात आहे. याचे कारण समर्स यांची मते विद्यमान फेडप्रमुख बर्नाके यांच्या पूर्ण विरोधात आहेत. विद्यमान आर्थिक संकटाला सामोरे जाण्याचा एक उपाय म्हणून बर्नाके यांनी दरमहा आठ हजार कोटी डॉलर इतके चलन बाजारात ओतण्याचा परिपाठ ठेवला आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था आता स्थिरावत असल्याने हा डॉलर प्रवाह थोडा कमी करणार असल्याचे संकेत बर्नाके यांनी दिल्या दिल्या भारतासह सर्व विकसनशील देशांतून डॉलर्सचा ओघ मायदेशी वळू लागला आणि अनेक बाजारपेठा कोसळल्या. समर्स हे बर्नाके यांच्या पुढे जाऊन हा डॉलर प्रवाह पूर्णपणे थांबवायलाच हवा या मताचे आहेत. याचा अर्थ देशोदेशीच्या बाजारांतील डॉलर्स पुन्हा अमेरिकेकडे जायला सुरुवात होईल आणि आपले संकट अधिक गहिरे होईल. धोरणात्मक पातळीवर समर्स यांचे आव्हान आणि त्याच वेळी पश्चिम आशियात सीरियाची डोकेदुखी अशा दुहेरी संकटांना रघुराम राजन यांना तोंड द्यावे लागणार आहे. याही पलीकडे तिसरा एक परिस्थितीजन्य धोका आहे. तो म्हणजे आगामी निवडणुका. तेव्हा पदाची सूत्रे घेतल्यापासूनच रघुराम राजन यांना खडतर परिस्थितीत तोंड द्यावे लागेल, हे स्पष्ट दिसते.
पाच वर्षांपूर्वी २००८ सालच्या जून महिन्यात ध्रुवी सुब्बाराव यांनी रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दहाच दिवसांनी तिकडे अमेरिकेत लेहमन ब्रदर्स ही बँक बुडली आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या नाकातोंडात पाणी जायची वेळ आली. कोणाही बँकप्रमुखाचे असे स्वागत होणे वाईटच. पण सुब्बाराव यांनी ही परिस्थिती चोख हाताळताना अर्थमंत्रालयाशी उत्तम समन्वय राखत बाजारपेठेला चलनाची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांच्या जवळपास ६० महिन्यांच्या काळात १३ वेळा व्याजदर वाढवले गेले आणि एकूण १० वेळा ते कमी केले गेले. रिझव्र्ह बँक गव्हर्नरच्या एकाच कारकिर्दीत २३ वेळा व्याजदरात चढउतार झाल्याचे दुसरे उदाहरण नाही. अर्थमंत्र्यांच्या तालावर नाचणे सुब्बाराव यांनी साफ नाकारल्याने सत्ताधारी त्यांच्यावर नाराज झाले आणि त्याच वेळी व्याजदरात कपात न करण्याचे धोरण अवलंबिल्याने उद्योग आदीही त्यांच्यावर रुष्ट झाले. परंतु चांगल्या नियंत्रकाने कोणाला काय वाटते याची तमा बाळगायची नसते वा लोकप्रियतेच्या मागे लागायचे नसते. सुब्बाराव यांनी हे तत्त्व उत्तमपणे पाळले आणि आपल्या पदाच्या लौकिकास जराही तडा जाऊ दिला नाही. तेव्हा या पदावरून निवृत्त होऊन सुब्बाराव यांनी पदाची सूत्रे एका समाधानात रघुराम राजन यांच्याकडे दिली असतील.
आता पुढचे आव्हान राजन यांना पेलावयाचे आहे. हे रघुरामराज अर्थव्यवस्थेसाठी नव्या उमेदीचे ठरेल अशी आशा करावयास हवी.
अग्रलेख – रघुरामराज
सुब्बाराव यांच्यानंतर आता कठीण काळात रघुराम राजन यांना चलनस्थैर्याबरोबरच अन्य आव्हानेही पेलावी लागतील.
First published on: 05-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What raghuram rajan the new governor of rbi needs to do