भावना मग त्या दु:खाच्या असोत की आनंदाच्या, त्यांचे नेमके काय करायचे, हा आपल्यापुढील नेहमीचाच सांस्कृतिक प्रश्न राहिला आहे. वैयक्तिक भावनांचे एक वेळ ठीक असते, पण त्या समाजाच्या असल्या की मग विचारता सोय नाही. त्या भडकण्यासाठीच असतात, त्यांचे प्रदर्शनच करायचे असते, हे आपण ठाम ठरवून ठेवलेले आहे. अशाने आपण शोकाचाही तद्दन उत्सव करीत असतो आणि प्रसंग जर आनंदाचा असेल, तर आपल्या आनंदाने इतरांना वेदनाच होतील असे वागत असतो, हे आपण समजूनच घेत नाही. कोलकात्यात आयपीएल नामक क्रिकेट तमाशातील विजेत्या संघाच्या गौरवाच्या कार्यक्रमात झालेल्या हुल्लडबाजीने हे दिसले, तेव्हा निमित्त आनंदाचे होते. दुसरीकडे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारानंतरच्या शोकसागरातही भावनांचा अतिरेकच दिसला. कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानात कोलकाता नाइट रायडर्स या संघाच्या खेळाडूंचा गौरव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आला. हा संघ शाहरुख खान याच्या मालकीचा. त्यामुळे या संघाने आयपीएल स्पर्धा जिंकली म्हणून कोलकातावासीयांनी हुरळून जाण्याचे कारण नव्हते, पण त्यांनी त्या कार्यक्रमास कोरबो, लोरबो वगैरे म्हणत तुडुंब गर्दी केली. एवढी गर्दी होणार याचा अंदाज आयोजकांना आणि पोलिसांना अर्थातच असणार, परंतु तरीही तेथे नीट व्यवस्था ठेवण्यात आली नाही. संघमालकाची छबी आपापल्या मोबाइल कॅमेऱ्यांत टिपण्यासाठी एकच झुंबड उडाली आणि मग सगळेच तीनतेरा वाजले. पोलिसांना लाठीमार करावा लागला. परळीतही असेच घडले. वास्तविक तो शोकाचा प्रसंग. अनेकांच्या डोळ्यांतील अश्रूंना खळ नव्हता, पण सगळेच तसे दु:खीकष्टी होते? अनेक जण नसावेत, असे म्हणण्यास वाव आहे. अशा वेळी वातावरण धीरगंभीर असणे अपेक्षित होते. नव्हे, ते तसेच असावयास हवे होते; परंतु तेथे चित्र उलटे होते. लोक जमावाच्या मानसिकतेत होते आणि खुद्द मुंडे यांच्या कन्येला आपले रडू आवरत ध्वनिक्षेपक हाती घेऊन लोकांना शांततेचे आवाहन करावे लागत होते. साहेबांची शपथ आहे तुम्हाला, शांत राहा, हे पंकजा यांचे उद्गार कोणाही संवेदनशील माणसाच्या काळजास टोचून जाणारे, पण जमावाला त्याची पर्वा नव्हती. आपल्या दिवंगत नेत्याला मूक श्रद्धांजली वाहण्याऐवजी त्याच्या पार्थिवाचे, पेटलेल्या चितेचे आपल्या मोबाइलद्वारे छायाचित्रण करण्यात अनेकांना रस दिसत होता. त्यासाठी चितेभोवती रेटारेटी सुरू होती आणि दुसरीकडे ‘परत या.. परत या..’सारख्या बालिश घोषणा देत नेतमंडळीही आपले मानसिक वय अधोरेखित करीत होती. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरही एका महाशयाने हीच घोषणा देऊन वातावरणाचे सगळे गांभीर्य घालवून टाकले होते. संवेदनशीलता, सद्भिरुची यांची थोडी जरी चाड या नेत्यांना असती, तरी असे वावदूक प्रकार या नेत्यांनी टाळले असते. अशा वावदूक प्रकारांमुळेच नंतर जमावाला चेव चढला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर दगड फेकणे, अंत्यसंस्कारास आलेल्या नेत्यांना घेराव घालणे असे जे प्रकार नंतर शोकसंतप्त कार्यकर्ते म्हणविणाऱ्यांनी केले त्याने या शोकगंभीर प्रसंगाची शोभा केली. मुंडे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशा मागणीसाठी आकांडतांडव करण्याची ती वेळ नव्हती. तरीही ते झाले. ती बाब दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे, हे माहीत असूनही ही मागणी भर मैदानात झाली आणि त्यासाठी राज्यातील नेत्यांना शिव्याशाप खावे लागले, याला काय म्हणावे? भावनांचे नेमके काय करायचे, याबाबतच्या अडाणीपणाचाच हा भाग. एक समाज म्हणून आपली सांस्कृतिक यत्ता वाढवायची असेल, तर ही ग्राम्यता गंगार्पणच करायला हवी.

Story img Loader