sam09सर्वसामान्यपणे कोणत्याही विद्यापीठीय शिक्षणात व्यवहार चातुर्य (स्ट्रीट स्मार्टनेस) या विषयाचा थेट समावेश नसतो. अगदी अमेरिकेत- हार्वर्डच्या नामवंत बिझनेस स्कूलमध्ये शिकलात, तरी नेमकी वेळ साधून, समोरच्याची गरज ओळखून वाटाघाटींमध्ये प्रभाव पाडून यशस्वी होणं, हे अनुभवातूनच शिकता येतं. हेच शिक्षण मान्यवरांच्या अनुभवांमधून देऊ पाहणारं एक पुस्तक बाजारात कमालीचं यशस्वी ठरलं.. भाबडय़ा विश्वासानं ते पुस्तक वाचणारे बरेच होते.. या पुस्तकाच्या शाळेमुळे कोणी व्यवहारचतुर होईल असं नाही, पण यशस्वी माणसांकडे पाहून काय शिकायचं, याचं गमक सांगणारं हे चमकदार पुस्तक आहे – ‘व्हॉट दे डोन्ट टीच यू अ‍ॅट हार्वर्ड बिझनेस स्कूल’

कायदा, व्यवस्थापन या शाखांतील पदवी घेतली म्हणून कोणी यशस्वी वकील वा व्यवस्थापक बनू शकत नाही. विद्यापीठ तुम्हाला तात्त्विकदृष्टय़ा मूलभूत बाबी शिकवू शकते किंवा खरं तर फक्त भाबडा आत्मविश्वास (आणि त्यातून येणारा पोळक दर्प) शिकवू शकते, पण त्यातून व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्या अंगात भिनत नाहीत, हे सत्य आहे.. असे प्रस्तावनेतच सांगत मार्क मॅक् कॉरमॅक उद्योगविश्वात यशस्वी कसे होता येईल याची सूत्रे मांडू लागतात.. ते सत्य आपल्याला आधीच माहीत असते, म्हणून तर पुस्तकाचे केवळ नाव पाहून ते वाचायचे आपण ठरवलेले असते!
पण ही सूत्रे सांगणारे मॅक् कॉरमॅक कोण? १९७०-८० च्या दशकातील अनेक विख्यात गोल्फपटू, टेनिसपटू आणि अन्य क्रीडापटूंना करारबद्ध करणाऱ्या इंटरनॅशनल मॅनेजमेंट ग्रूपचे संस्थापक, ही त्यांची व्यावसायिक ओळख. विम्बल्डनसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा-आयोजकांचे तसेच ‘नोबेल फाउंडेशन’, व्हॅटिकनचे कॅथलिक चर्च अशा नामांकित संस्थांचे मार्केटिंग सल्लागार म्हणून या कंपनीने काम केले आहे. पुस्तक लिहिताना त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन, गोल्फपटू अर्नोल्ड पामर, टेनिसपटू बियाँ बोर्ग यांच्याशी झालेल्या भेटींचे दाखले दिले आहेत. स्वाभाविकच आपल्यातील सर्वोत्तमाची अद्वितीय पद्धतींनी विक्री कशी करायची ते ठरविणे हे मार्क यांचे अंगभूत वैशिष्टय़ मान्य करावे लागेल. पुस्तकाच्या पानापानावर हे वैशिष्टय़ प्रतििबबित होताना दिसते.
पुस्तकाची एकूण मांडणी तीन भागात केली आहे. पहिला भाग लोकांविषयी, दुसरा भाग विक्री आणि वाटाघाटींविषयी तर तिसरा भाग व्यवसायाचा गाडा नेमका कसा हाकावा याविषयी माहिती देतो. कोणताही व्यवसाय हा अनिवार्यपणे लोकांवर अवलंबून असतो. त्यामुळे ‘लोकांना त्यांच्या वर्तनावरून जोखता येणे महत्त्वाचे’. हे जितके खरे तितकेच ‘आपले त्यांच्यावर पडणारे वजन- आपला प्रभाव- हादेखील महत्त्वाचा’, ही दोन व्यावसायिक सूत्रे मॅक् कॉरमॅक मांडतात.
पहिल्या विभागाचे वेगळेपण त्यानंतर सुरू होते. जनसंपर्काच्या विविध माध्यमातून लोकांवर अनेक जण प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतातच. पण त्यापेक्षा वेगळे ठरत आपला प्रभाव कसा वाढवावा, इतरांच्या तुलनेत आपल्याला सरस कसे ठरता येऊ शकेल, याची सूत्रे मार्क यांनी सोदाहरण मांडली आहेत. ती निश्चितच वाचनीय आहेत. त्यांच्या मांडणीतून सातत्याने व्यवहारचातुर्य म्हणजे नेमके काय आणि अशा लोकांची प्रसंगांकडे पाहण्याची दृष्टी कशी असते हे दिसत राहते. मात्र त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष, जगातील अव्वल मानांकित खेळाडू, व्हॅटिकन-कॅथलिक चर्च अशा ठिकाणी आपला प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीने बेस्टसेलर पुस्तक लिहिणे हाच ‘स्टीट्र स्मार्टनेस’ नव्हे का, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. शिवाय लोकांची मानसिकता लक्षात घेता, अशा जगप्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकाची विक्रमी विक्री होण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही हे कळले की खरोखरीच हे पुस्तक वाचनीय असेल का अशी कुशंकाही येतेच.
तरीदेखील, विद्यापीठीय शिक्षणातून बाहेर पडून, पुस्तकी चाकोरींच्या पलिकडे जात आपल्यापुढे निर्माण होणारे असे प्रश्नच आपल्याला व्यवहारचतुर करत जातात हे कळले, की पुस्तकाची उपयुक्तता जाणवते.
पुस्तकाचा दुसरा विभाग वाटाघाटींविषयी भाष्य करतो. विक्री करताना येणाऱ्या जर कोणत्या प्रमुख समस्या असतील तर त्या म्हणजे भीती आणि विक्री करण्याच्या संकल्पनेविषयी असणारी अनास्था. (मराठी संस्कृतीतील यासाठीचा उत्तम शब्द म्हणजे भिडस्तपणा) ही भीड आपल्याला आपल्या उत्पादनाचे (उत्पादन या शब्दाची पुस्तकातील व्याप्ती ही केवळ वस्तू किंवा सेवा यांपुरती मर्यादित नसून ती व्यक्तिमत्त्वापर्यंत व्यापक आहे.) गुणगान करण्यास किंवा आपलीच पाठ थोपटून घेण्यास आपल्याला परवानगी देत नाही. त्यातच आपण अपयशी होऊ का किंवा आपल्याला नाकारले जाईल का ही भीती मनांत घर करून बसलेली असते, तिला धक्के मारूनही हाकलता येत नाही.
या अनुषंगाने मार्क यांनी विख्यात टेनिसपटू बोर्ग याचा किस्सा उद्धृत केला आहे. टेनिस मैदानावर आईस मॅन – थंड डोक्याचा माणूस म्हणून बोर्ग प्रसिद्ध होता. त्यामुळे परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी याच्यावर काहीच परिणाम होत नाहीत अशी लोकांची भावना होती. ‘प्रत्यक्षात बोर्ग याने अनेकदा गप्पांदरम्यान आपल्याला अनेक गोष्टींची भीती वाटते याची कबुली दिली’ असे मार्क यांनी नमूद केले आहे.. या उदाहरणातून, भीती ‘वाटणे’ व ती आपल्या ‘वरचढ होणे’ यातील सूक्ष्म फरक त्यांनी अधोरेखित केला आहे.
खरे तर या सूत्रांमध्ये नवीन किंवा अज्ञात असे काही नाही. पण व्यक्तिमत्त्व उभारणीच्या-विकासाच्या अनेक पुस्तकांचे एक वैशिष्टय़ आहे. अशी पुस्तके विजेत्यांच्या, यशस्वितांच्या जीवनातील अशा कळीच्या बाबी अधोरेखित करतात, ज्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येऊन गेलेल्या असतात, फक्त थोरांनी दिलेला प्रतिसाद आणि सर्वसामान्य माणसांकडून दिला जाणारा प्रतिसाद यांच्यात फरक असतो, हे अशी पुस्तके अधोरेखित करतात. सदरहू पुस्तकही याच रुळलेल्या मार्गावरून जाते. पुस्तकात अधोरेखित करण्यात आलेली आणखी एक बाब म्हणजे ‘टायमिंग’ किंवा अचूक वेळ साधणे. अनेकदा आपण उचललेले पाऊल अपेक्षित गंतव्यस्थळी आपल्याला पोहोचवू शकत नाही याचे खरे कारण योग्य मुहूर्त साधता न येणे हे असते, ही बाब मार्क यांनी उदाहरणांसह दाखवून दिली आहे.
तिसरा विभाग उद्योग-व्यवसाय उभारणे, तो टिकवणे आणि लोकांकडून गोष्टी करवून घेणे याविषयीची सूत्रे विषद करतो. आपल्या संकल्पना लोकांच्या गळी कशा उतरवाव्यात, जे निर्णय आपण घेणे अपेक्षित आहे ते परिस्थितीनुरूप इतरांना आपल्यासाठी घेण्यास कसे भाग पाडावे, अंतर्गत बैठकांचे महत्त्व, मौनाचे अर्थ आणि महत्त्व या बाबींचे महत्त्व आणि वापर करण्याचे चातुर्य विविध प्रसंगांद्वारे लेखकाने उभे केले आहे.
पहिल्यांदा वाचताना हे पुस्तक मनांवर चांगलीच पकड घेते. त्यातील सूत्रे म्हणजे जणू आजवर दडवून ठेवली गेलेली यशस्वी व्यावसायिक गुपिते असून आपल्या हाती घबाडच लागले आहे अशी भावनाही मनांत निर्माण होते, हे या पुस्तकाचे यश. पण व्यवहारिक चातुर्य विद्यापीठीय शिक्षणातून मिळत नाही तसेच ते केवळ त्यावर लिहिलेले पुस्तक वाचूनही मिळू शकत नाही, हे कळू लागले की पुस्तकाचा प्रभाव ओसरू लागतो. मग तरीही हे पुस्तक का वाचावे..
थोडक्यात काय तर : अनेक मान्यवरांचे वर्तन, त्या वर्तनातून मिळणारे ‘आदर्श’ किंवा धडे, आपल्या व्यवसायाच्या- उद्योगाच्या वृद्धीसाठी आखावयाची व्यूहनीती, मौन आणि अचूक मूहूर्त यांचे व्यावसायातील महत्त्व या बाबींचा परिचय ‘व्हॉट दे डोन्ट टीच यू अ‍ॅट हार्वर्ड बिझनेस स्कूल’ या १९८४ सालच्या पुस्तकात तपशीलवार वाचायला मिळतो.
पहिल्या वेळी पुस्तक वाचताना मनांत येणारी भाबडी भावना त्यानंतर वाचन करताना हरवत जाते. या सूत्रांमध्ये नवीन काय, असा सवाल निर्माण होऊ लागतो. हे तर माहिती होतंच की आपल्याला असंही अनेकदा वाटून जातं. असा वेळी, एकच प्रश्न स्वतला विचारून पहावा..माहिती होतं; पण आपण कधी वापरलं होतं का..?या प्रश्नाचं खरं उत्तर म्हणजेच व्यवहारचातुर्य!

Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
strict action against students if found with a mobile phone in an exam
खबरदार ! परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास आता इतके वर्ष…
maharashtra navnirman sena demand to use marathi language in bank of maharashtra
महाबँकेत मराठी भाषेचा वापर करा, का केली मनसेने ही मागणी ?
importance of NAAC accreditation for colleges
काही महाविद्यालयें नॅकला सामोरी का जात नाहीत?
Skill University , Tuljapur, Symbiosis Skills University ,
तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ होणार, सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ करणार तांत्रिक सहकार्य, राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
What is the decision of the State Board of Secondary and Higher Secondary Education regarding the directors and supervisors of teachers during examinations Nagpur news
दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर नवीन वाद?….हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर…
Story img Loader