‘२१९ पकी फक्त १३ बलात्कार अनोळखींकडून!’ हे धक्कादायक वृत्त (लोकसत्ता २३ जाने.) वाचलं. यापूर्वीही दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर काही संस्थांनी जी आकडेवारी जाहीर केली होती, त्यानुसार एकूण बलात्कारांपकी ८२ टक्के बलात्कार हे संबंधित महिलांचे कुटुंबीय किंवा जवळच्या परिचितांकडूनच झाल्याचं उघडकीस आलं होतं. हे वास्तव फारच भयाण आहे.
ज्यांच्यावर या महिला विसंबून होत्या किंवा विश्वास ठेवून होत्या, त्यांनीच त्यांचा घात केल्याचं या आकडेवारीतून सिद्ध होत आहे. अशा पाश्र्वभूमीवर मग महिलांना चाकूचं वाटप करा किंवा मिरची पूडचं.. त्याचा काय उपयोग होणार आहे?
पोलीस किंवा कोणत्याही अन्य सुरक्षा यंत्रणा अशा प्रसंगी काही करू शकत नाहीत. पण मग अशा परिस्थितीत काय होणं आवश्यक आहे? मुलींनी, महिलांनी स्वत:च्या माणसांकडून, परिचितांकडून कशा प्रकारे या संदर्भात अधिक सजगता बाळगण्यासाठी अधिक ठाम राहणे, एवढाच उपाय तरी पुरेसा आहे?
दोष पद्धतीचा की अंमलबजावणी यंत्रणांचा?
‘असरचे निदान आणि असरकारी उपाय’ हा प्रा. वसंत काळपांडे यांचा लेख (लोकसत्ता, २२ जानेवारी) वाचला.
असरचे मूल्यमापन महत्त्वाचेच आहे, हे सांगताना या लेखात प्राथमिक शिक्षणातील भाषा आणि गणितीय कौशल्याचे विशेष महत्त्व अधोरेखित केले आहे. अध्ययनाच्या मूलभूत प्रक्रियेतील मूलस्रोत असलेल्या भाषा आणि गणित या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे, हेच हा अहवाल सुचवतो. या लेखाने या अहवालाची विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
कोणत्याही क्षेत्रात प्रशासन आणि व्यवस्थापन हे दिशाहीन असले की त्याचा प्रतिकूल परिणाम हा अगदी खालच्या स्तरावरील घटकावर होतोच. तसा तो प्राथमिक शिक्षकांवर झाला आहे, असा सूर या लेखात दिसतो, कारण त्यांनी यात राज्य साधन गटाच्या आणि एमपीएस पीच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. लिहिणे, वाचणे आणि सोपी आकडेमोड करणे हेही शिकवण्याची क्षमता शिक्षक या कार्यपद्धतीमुळे हरवून बसले आहेत का? तसे असेल तर त्यावर त्वरित उपाय योजले पाहिजेत.
ज्ञानरचनावाद ही पद्धती विद्यार्थ्यांच्या अनुभवाशी आणि त्यांच्या कौटुंबिक-सामाजिक पर्यावरणाशी थेट जोडलेली आहे, त्यामुळे शिक्षण हे द्यावे लागत नाही आपोआप होते (अर्थात त्यासाठी फॅसिलिटेटर हा हवाच ) अशी माझी धारणा आहे. मुलांना शिकण्याची प्रेरणा देणारी ही प्रक्रिया मला आनंददायी वाटते. अर्थात यासाठी शिक्षकांना मात्र अधिक सर्जनशील राहून प्रत्येक विद्यार्थी केंद्रस्थानी येईल, अशा प्रकारची अध्यापन पद्धती आणि साधने विकसित करावी लागतील, त्यात आपण कमी पडलो तर मात्र गोंधळ होऊ शकतो. असेच काहीसे आपल्याकडे झाले आहे का ?
शैक्षणिक दूरचित्रवाणी क्षेत्रात २००९ पासून ‘लर्निग ऑब्जेक्ट्स’ (एलओ) ही संकल्पना मोठय़ा प्रमाणात राबवायला सुरुवात झाली. पण मुळात ‘एलओ’ कशा पद्धतीने तयार करावे लागतात, त्यामागील संकल्पना काय , कठीण घटकावर सूत्रबद्धरीतीने आवाज, चित्र, दृश्यमालिका, वापरून अध्ययन प्रक्रिया सुविहित करण्याची सोपी पद्धत काय, त्यातील विद्यार्थी-सहभागितेचा (‘इंटरअॅक्टिव्ह’) भाग कसा असायला हवा याचा सखोल विचार करून हे तयार करावे लागतात, त्यात तंत्रज्ञान, अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेचा नीट अभ्यास असावा लागतो. तसे नसेल तर ते फसता आणि असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
आधुनिक शिक्षणपद्धती स्वीकारून अंमलबजावणीसंबंधी ठोस उपाय योजता येणार नाहीत का?
डॉ केशव साठय़े, पुणे</strong>
२५ वर्षांतील दहशतवादी संघटनांची माहिती द्या!
भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भगव्या हिंदू दहशतवादाचा आरोप केला आहे. सदर आरोप गंभीर आहे. गृहमंत्र्यांनी जे आरोप केले आहेत त्या संबंधीचा सबळ पुरावा त्यांनी देशवासीयांना द्यावा. दोषींवर कारवाई करावी. जर सबळ पुरावा नसेल तर देशवासीयांची माफी मागावी आणि तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.
गेल्या २५ वर्षांत भारतात झालेले बॉम्बस्फोट व दहशती हल्ले यांची श्वेतपत्रिका गृहमंत्र्यांनी तातडीने प्रसिद्ध करावी. त्यामध्ये गुंतलेल्या व्यक्ती व संघटनांची नावे प्रसिद्ध करावीत.
उत्तरा परांजपे, शुक्रवार पेठ, पुणे
नाटय़ परिषद सशक्त कशी करणार?
अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीतील उत्स्फूर्त पॅनेलचे मोहन जोशी आणि नटराज पॅनेलचे विनय आपटे यांची वक्तव्ये (लोकसत्ता, २३ जाने.) वाचली. एक नाटय़रसिक आणि नाटय़-चित्रपट कलाकार म्हणून हे सर्व वाचताना अतीव दु:ख झाले.
ज्या कारणांमुळे मोहन जोशी यांनी राजीनामा दिला अथवा त्या कारणांकरिता राजीनामा द्यावा लागला त्याबद्दलचा अहवाल त्यांना प्रसिद्ध करायचा आग्रह धरावा, जर त्यांना तो मुद्दाम लपवून ठेवला असे वाटत असेल. बँकेच्या व्यवहारात जर नियामक मंडळाची बठक न बोलावता खोटे ठराव व बठका घेऊन पत्रे पाठवून बँकांमधील स्वाक्षऱ्या बदलल्या हे जर खरे असेल तर त्यांनी त्या वेळीच फौजदारी खटला दाखल करणे गरजेचे होते. मोहन जोशी आणि विनय आपटे यांनी जुनी खरकटी न उकरता खिलाडूवृत्तीने निवडणूक लढवावी.. उत्स्फूर्त अथवा नटराज पॅनेल यापकी जे कोणी निवडणूक जिंकतील त्यांनी नाटय़ परिषद कशी सशक्त होईल हे पाहावे हीच नाटय़रसिकांतर्फे विनंती.
सुरेश भागवत
हा बदल स्वागतार्ह!
‘कला व कलावंत, खेळ व खेळाडू कुठल्याही सीमारेषांनी बांधले जाऊ शकत नाहीत, त्यातही गायन व संगीत हे असे कला क्षेत्र आहे की त्याला देश, प्रांताची बंधने असू नयेत’ हे एरवी खरे असते, परंतु ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी केवळ एका चित्रवाणी वाहिनीच्या एका कार्यक्रमासाठी ही भूमिका घेतली होती. आशाताईंचा मान राखून त्यांच्या कृतीला त्या वेळी राज ठाकरे यांनी विरोधही केला होता. अखेर पाकिस्तानने भारतीय हद्दीत केलेल्या घृणास्पद भ्याड चकमकीनंतर आशाताईंनी पाकिस्तानचा निषेध केला आणि पाकिस्तानी कलावंतांना निमंत्रणे न देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दाखवला. उशिरा का होईना, आशाताईंना झालेला हा साक्षात्कार स्वागतार्ह आहे.
अनिल पाठक, विरार (पश्चिम)
मुलगी झाली हो ‘सीए’
‘केजी टु कॉलेज’ पानावर (लोकसत्ता, २३ जाने.) धनश्री तोडकर या कोल्हापुरातील गरीब मुलीची शिक्षणाची श्रीमंती वाचली आणि सध्याच्या नराश्यजनक वातावरणावर मात करणारी ही बातमी आहे असंच वाटलं. धनश्रीचं यश पाहून अनेकांना सीएसारख्या अवघड पदव्या मिळवण्याचं ध्येय मिळेल. मुंबईच्या प्रेमा जयकुमारनं तर त्या परीक्षेत प्रथम येऊन कमालच केली आहे. कष्ट उपसून शिक्षण देऊ पाहणाऱ्या आपल्या आई-वडिलांची मान तर या दोघींनी उंचावली आहेच, पण स्त्री-भ्रूण हत्या करणाऱ्या सगळ्यांना एक प्रकारे संदेश दिला आहे की बघा, मुलगी खंबीरपणे पुढे जात कुटुंबाचा मार्गदर्शक दिवा ठरू शकते.
श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे.
यश पाहायचे की नियत?
‘गांधी आडवा येतो’ या अग्रलेखातून (२१ जाने.) राहुल गांधी यांच्यावर सूचकपणे व्यक्तिगत टीकाही केली आहे. सतत आठ वर्षे संघटनेचे काम करूनही अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही हे वास्तव राहुलबाबांनी नाकारलेले नाही. यश-अपयश हे अनेक परिमाणांवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. महत्त्वाचे असते ते प्रयत्नांतील सातत्य आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याची नियत. गांधी किंवा ठाकरे ही आडनावे कुणाला आवडोत, न आवडोत. ‘गूंगी गुडिया’ला मिळालेल्या संधीचे तिने सोने कसे केले हा इतिहास ताजाच आहे. तिथे घराणेशाही आडवी आली नाही.
– जयंत गुप्ते, खार.