एखाद्या अभ्यासक्रमाला मागणी वाढू लागली, की जो तो त्याच अभ्यासक्रमाच्या संस्था सुरू करण्यासाठी धडपडू लागतो. महाराष्ट्रात बाहेरगावाहून आणि परदेशातून शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असल्याने या सगळ्या शिक्षण संस्थाचालकांना मागणी तसा पुरवठा करण्याची भारी हौस असते. मग या संस्थांचे जाळे इतके मोठे होत जाते, की विद्यार्थ्यांची संख्या कमी आणि जागा अधिक अशी अवस्था येते. एमबीए या व्यवस्थापनशास्त्रातील पदवी अभ्यासक्रमांबाबत नेमका हाच घोळ झाला आहे. संस्थांची संख्या इतकी, की तेथे येण्यासाठी पुरेसे विद्यार्थी नाहीत, अशी अवस्था निर्माण झाल्याने मागेल त्याला प्रवेश, असे धोरण आखून आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न आता सुरू झाला आहे. एमबीएच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी याच वर्षांपासून सीमॅट, कॅट आणि मॅट या प्रवेशपरीक्षा सुरू करण्यात आल्या. चारशे गुणांच्या या परीक्षेत एक गुण मिळालेल्यांनाही प्रवेश देण्याची वेळ संस्थांवर आली, कारण प्रवेशांची एकूण संख्या आहे चाळीस हजार आणि इच्छुकांची संख्या आहे वीस हजार. संस्था चालवायच्या तर विद्यार्थी हवेत आणि त्यासाठी वाटेल ती तडजोड करण्यास संस्थाचालकांची तयारी हवी. विद्यार्थी कमी असल्याने आता अनेक संस्थाचालकांनी हे अभ्यासक्रम बंद करण्यासाठी परवानगी मागायला सुरुवात केली आहे. देशातील ९४ संस्थांनी अशी परवानगी मागितली आहे, यावरून या अभ्यासक्रमांना नोकरीच्या बाजारात असलेली मागणी कमी होत असल्याचे स्पष्ट होते. त्याचे दुसरेही एक कारण आहे. व्यवस्थापनशास्त्रातील विविध विषयांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू करून कमी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्याचे बेकायदा प्रयत्न गेली काही वर्षे सुरू आहेत. मास्टर्स इन मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, पर्सनल मॅनेजमेंट यांसारखे अनेक अभ्यासक्रम एआयसीटी या केंद्रीय मंडळाची मान्यता न घेताच सुरू करण्यात आले आहेत. कमी शुल्कात पदवी मिळत असल्याने एमबीएऐवजी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांना रस वाटू लागला आहे. आता मास्टर्स इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या विषयातील रसही कमी होऊ लागल्याने संस्थांनी हे अभ्यासक्रमही बंद करण्याची परवानगी मागितली आहे. नोकरीच्या बाजारात कशाची गरज आहे आणि नजीकच्या भविष्यात कशाला मागणी येण्याची शक्यता आहे, याचा अंदाज न घेता संस्थाचालक अभ्यासक्रम सुरू करतात, आणि काहीच काळात या अभ्यासक्रमांची गरज कमी होऊ लागते. अशा वेळी केलेली गुंतवणूक परत कशी मिळवायची, असा प्रश्न संस्थाचालकांना पडतो. शिक्षणाचे क्षेत्र हे कसे धंदेवाईक बनू लागले आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. एआयसीटी हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता देणारे मंडळही सरसकट मागेल त्याला परवानगी देते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी प्रचंड खर्च करून प्रयोगशाळा आणि रुग्णालये तरी उभी करावी लागतात. व्यवस्थापनशास्त्रासाठी तर केवळ वर्गखोल्या बांधण्यापलीकडे फारसे काही करावे लागत नाही. ज्याच्याकडे जागा आणि पैसे आहेत, असा कुणीही धनिक शिक्षणाच्या धंद्यात अल्प काळात स्थिरावू शकतो. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या फुकट प्रतिष्ठेच्या मोहाने अनेकांनी त्यात उडी घेतली. आता विद्यार्थ्यांनीच त्याकडे पाठ फिरवल्याने प्रवेश परीक्षा गुंडाळून हवा त्याला प्रवेश देण्याच्या या धोरणाने या एमबीएंचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Story img Loader