कौशल्य आणि शरम या दोन गोष्टी सरकारी पातळीवरून तडीपार झाल्यात असे दिसते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सभागृहात जी हाणामारी झाली ही त्याचीच परिणती आहे. आज ज्या नागरिकांनी या तथाकथित नगरसेवकांना मतदान केले असेल त्यांना या आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटत असेल आणि ज्यांनी मतदानच केले नसेल त्यांना समाधान वाटत असेल या पापात आपण मतदान करून वाटेकरी नाही त्याचे! पण या लोकप्रतिनिधींना कोणतीही खंत किंवा पश्चाताप होत असेल असे वाटत नाही. नाहीतर आपापसात त्यांनी हे लाजिरवाणे कृत्य केले नसते. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अशी घृणास्पद कृत्य करताना ज्यांना काहीच वाटत नाही त्यांना लोकांच्या हिताची काय काळजी असणार? गळ्यात सोन्याच्या जाड माळा, हातात सोन्याची जड आणि जाड कडी, तो उग्र चेहरा हे कसले द्योतक आहे. कुठून येतो यांच्याकडे एवढा पसा?
लोकशाहीच्या पवित्र मंदिरांमध्ये अशी उग्र आणि सोन्याने मढलेली माणसे पाठवण्यापेक्षा सज्जन, विचारी आणि कौशल्यांनी अलंकृत माणसे लोकप्रतिनिधी म्हणून पाठवली तर या लोकशाहीच्या मंदिरांचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा अबाधित राहील.
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा