महाराष्ट्रात आज निष्कलंक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सत्तेवर असतानाही शासन योग्य आणि चांगले निर्णय घेताना दिसत नाही. शालेय शिक्षण मंत्रालयातील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. हे मंत्रालय राष्ट्रवादीकडे नाही. तरीही भ्रष्टाचार कमी झालेला नाही. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे एक स्वीय साहाय्यक यापूर्वी लाच घेताना रंगेहाथ सापडले होते. आताही बदल्या- बढत्यांत लाचखोरी सुरूच आहे.
लातूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी त्यांना अधिकार नसताना ३०० पेक्षा अधिक तुकडय़ा अनुदानावर काही शाळांना वाटप केल्या. म्हणजे उघडपणे विक्री केल्या. विशेष म्हणजे या तुकडय़ांवर शिक्षण संस्थाचालकांनी १५ ते २० लाख रुपये प्रत्येकी घेऊन बेकायदेशीररीत्या भरती केलेले नवीन शिक्षकही मान्य केले. वैयक्तिक मान्यता देऊन या शिक्षकांना थकबाकीसह कोटय़वधी रुपयांचे वेतन सरकारी तिजोरीतून दिले. भ्रष्टाचारी शिक्षण अधिकाऱ्यास मंत्री राजेंद्र दर्डा यांनी बढती देऊन प्रामाणिक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना खिजविले आहे. जे. एस. सहारियासारख्या सचिवांच्या काळात हे घडले. नांदेडच्या १३७ शाळांच्या प्रकरणातही औरंगाबाद खंडपीठाने शासनाच्या दुटप्पी धोरणावर कठोर शब्दांत ताशेरे मारले आहेत.
शिक्षणाधिकारी एकनाथ मडाणी यांनी मान्यता रद्द केलेल्या निर्णयास ८८ शिक्षण संस्थाचालकांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. या प्रकरणात शपथपत्र दाखल करण्यासाठी शासनाला दोन महिने लागले. दोन महिन्यांनंतर शिक्षण सचिवांना, सहसचिवांना जाग आली. नांदेडच्या १२०० शिक्षकांच्या सेवा समाप्त करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सेवेतून बडतर्फ करावे, पटपडताळणीवरील कारवाईत पक्षपातीपणा करू नये, शिक्षकांच्या सेवा सुरक्षित करून रीतसर समायोजन करूनच राज्यातील बोगसगिरी बंद करावी.
राजा मुधोळकर, नांदेड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा