प्रवृत्ती आणि निवृत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे क्रिकेट ही ज्याची प्रवृत्ती होती तो सचिन रमेश तेंडुलकर याला एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करावी लागली हे नैसर्गिकच म्हणावयास हवे. क्रिकेट ही सचिनची नैसर्गिक प्रवृत्ती होती आणि आपला जन्मच क्रिकेटसाठी आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती. इतकी की तो त्यामुळे अन्य काहीही करायच्या फंदात पडला नाही आणि त्याच्या आसपासच्यांनाही याची जाणीव असल्याने असे काही करण्याची वेळ सचिनवर कधी आली नाही. यामुळे क्रिकेट ही आपली नैसर्गिक वृत्ती तो सहज जोपासू शकला. ज्याप्रमाणे मुक्त गगनात विहार करणे ही पक्ष्याची प्रवृती असते, सुरेलता ही कोकिळेची प्रवृत्ती असते तितकीच नैसर्गिक प्रवृत्ती घेऊन सचिन क्रिकेटच्या मैदानावर उतरला होता. या कविकुलोत्पन्न क्रिकेटपटूचे वैशिष्टय़ हे की ज्याप्रमाणे एखाद्या कवितेला नैसर्गिक चाल असावी तसे सचिनचे क्रिकेट असायचे. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी वा साधे क्षेत्ररक्षण. सचिनने शंभर टक्के मन लावून ते केले नाही, असे कधी घडलेले नाही. त्याच्या या प्रवृत्तीमुळे तो जे काही करे त्यात त्यास यश यावे अशीच साऱ्या क्रिकेटप्रेमींची भावना असे. आपल्या यशात इतक्या सगळय़ांना गुंतवून घेता येण्यासाठी एक प्रकारचे कौशल्य लागते. ते सचिनकडे नैसर्गिक होते आणि त्याच नैसर्गिक ऋ जू स्वभावाने ते अधिक खुलून दिसत गेले. त्यामुळे सचिन शतकाच्या जवळ येऊन बाद झाला की घराघरात वेदनेचे सुस्कारे सुटत आणि त्याचे शतक झाले की जणू आपल्याच घरी काही आनंदसोहळा आहे असा आनंद समस्तांना होत असे. शतक वा अन्य विक्रमाच्या जवळ सचिन आल्यावर तो क्षण डोळय़ात भरून घेण्यासाठी सारा देश आपले कामधाम सोडून श्वास रोखून बसत असे आणि तो विक्रम साध्य झाला की आनंदोत्साहित होत असे. भारताने गेल्या वर्षी मुंबईत विश्वचषक जिंकला तो असा एक क्षण होता. मुंबईत सचिनच्या उपस्थितीत भारताने विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपले नाव कोरणे याला एक अर्थ होता. त्यानंतर सचिनने बांगलादेशाच्या विरोधात का असेना आपले शंभरावे शतक साजरे केले तेव्हाही याच क्षणाची पुनरावृत्ती झाली. शतकांची शंभरी गाठणे हा विक्रम केवळ अचाटच म्हणावयास हवा. तो गाठला गेल्यावर अनेक सचिनप्रेमींना वाटत होते या विश्वविक्रमादित्याच्या आयुष्यातला प्रवृत्तीत्याग करण्याचा क्षण हाच असेल. समस्त क्रिकेटप्रेमींनी सचिनच्या निवृत्तीची बातमी ऐकण्यासाठी त्या वेळी स्वत:च्या मनाची तयारीही केली होती. तसे झाले नाही. आणखी पुढे खेळत राहायचे सचिनने ठरवले. खरे तर बारमाही फुलणाऱ्या झाडालाही कधी ना कधी दुष्काळाचा आणि पानगळीचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या चक्राचा तो एक भाग असतो. त्यामुळे सचिनच्या आयुष्यातही हा कामगिरीचा दुष्काळ येणार अशी भीती अनेकांना होती. गेले काही दिवस ती खरी ठरताना पाहणे हे त्याच्या चाहत्यांना वेदनादायी होते. ती वेळ सचिनसारख्यावर येणे अधिकच वाईट. याचे कारण ज्या मिजाशीत हा २२ यार्डाचा बादशहा भल्याभल्या गोलंदाजांना सामोरे जायचा तोच सचिन इंग्लंडच्या दुय्यम म्हणता येईल अशा गोलंदाजांसमोर आपल्या यष्टींचे रक्षण करू शकत नाही, हे पाहणे क्रिकेटप्रेमींचे हृदय विदीर्ण करणारे होते. आयुष्यभर ज्या पदलालित्याने त्याच्या फलंदाजीस डौल प्राप्त करून दिला त्या पायांनी जणू त्याच्या विरोधात बंड पुकारले होते आणि ते जड पायांचे ओझे वाहत त्याचे बाद होणे हे विषण्ण करणारे होते. हे वारंवार होऊ लागल्यावर क्रिकेटच्या या स्वयंभू, देदीप्यमान दीपातील तेल संपत आल्याची जाणीव समस्तांना होत होती. परंतु सचिन आणि त्याच्या नावाने आपले दुकान चालवणाऱ्यांना हे जाणवत नव्हते. आपण आणखी काही काळ सहज खेळत राहू शकतो असे चाळिशीपासून वर्षभराच्या अंतरावर असणाऱ्या सचिनला वाटत होते आणि तो हे खरोखरच करेल याची खात्री त्याच्या काही भाटांनाही वाटत होती. त्याला वाटत होते तसे सचिन काही काळ खेळूही शकला असता. परंतु त्या खेळात पूर्वीचे तेज असले असते का हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर नकारार्थीच असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ सचिनवर आली असती आणि ते अधिक दु:खदायक झाले असते. तसे ते होणे थोडक्यात टळले. थोडक्यात अशासाठी म्हणावयाचे की पाकिस्तानची मालिका आता सुरू होणार आहे. त्या मालिकेतही सचिन इंग्लंडबरोबरच्या सामन्यांप्रमाणे अपयशी ठरला असता तर ते अधिक दुर्दैवी ठरले असते. इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानविरोधी सामन्यांना भावनांची धार असते. इंग्लंडविरोधात जी नामुष्की आपल्याला मायदेशात सहन करावी लागली तसेच काही पाकिस्तानविरोधातही घडले असते तर सचिनच्या निवृत्तीबाबत का या प्रश्नाऐवजी कधी हा प्रश्न अधिक मोठय़ा आवाजात विचारला गेला असता. तो आताही विचारला जात होताच. पण हलक्या आवाजात. त्याचमुळे भारतीय संघ निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनी सचिनला पाकिस्तान दौऱ्याबाबत विचारणा केली आणि त्याने आपले स्थान गृहीत धरू नये असे सौम्यपणे सुनावले. याचा अर्थ असा की सचिन इंग्लंडविरोधात ज्याप्रमाणे खेळला त्याचप्रमाणे खेळत राहिला तर त्याला संघातून वगळण्याची तयारी झाली होती. पाटील यांच्या या गर्भित इशाऱ्यानंतर सचिनने अधिक वेळ दवडला नाही आणि एकदिवसीय सामन्यांपुरती तरी आपली निवृत्ती जाहीर केली. एका अर्थाने त्याच्या या स्वेच्छानिवृत्तीमागे सक्ती होती, हे कटू पण वास्तव आहे.
वास्तविक संसाराचे तीन टप्पे ज्या भूमीत शिकवले गेले, जेथे वृद्धत्व छान पिकल्या फळासारखे अलगद झाडावरून सुटावे असे सांगितले गेले त्याच भूमीत अनेकांना आपले अवतारकार्य संपत आल्याची जाणीव होत नाही असे वारंवार आढळून येते. सचिन जवळपास २३ वर्षे क्रिकेटच्या मैदानावर पहाडासारखा उभा होता. परंतु या पहाडाची तटबंदी निखळू लागली होती आणि तो थकल्याच्या स्पष्ट खुणा आजूबाजूच्यांना दिसू लागल्या होत्या. तेव्हा त्या खुणा खुद्द त्या पहाडास जाणवू नयेत असे मानणे अवघड आहे. सचिनचा समकालीन म्हणता येईल अशा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली तेव्हाही सचिनच्या बाबत कधी हा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. क्रिकेट
हा भारताचा धर्म आहे आणि सचिन हा देव आहे अशा प्रकारच्या तद्दन चापलुसी भूमिका सचिनच्या अनेक भाटांनी मांडली. व्यक्तिपूजेचे स्तोम माजवले जाणाऱ्या या प्रदेशात हे साजेसेच म्हणावयास हवे. परंतु माणसाचा देव.. अर्थात तो होतो हे मानले तर.. झाला तरी त्याची परिणामकारकता कालपरत्वे कमी होते. तेव्हा तशी ती सचिनची झाली तर त्यात काही वेगळे झाले असे म्हणता येणार नाही.
हे आज ना उद्या होणारच होते. तसे ते प्रत्येकाच्याच बाबतीत होत असते. उगवतीचा सूर्य मध्यान्हीला कितीही तेज:पुंज वाटला
तरी तो मावळणारच असतो. असा मावळण्याचा क्षण ही जगण्याची अपरिहार्यता असते. अशा मावळण्याचा शोक करायचा नसतो आणि ते सहजपणे स्वीकारायचे असते. तेव्हा कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे, क्षण मावळतीचा येता, डोळय़ात कशाला पाणी?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा