अध्ययनाच्या सर्व निकषांवर मराठी भाषा उपयोजित आणि कसदार ठरते हे प्रतिपादन अधिक स्पष्ट करणारा लेख..
‘हे   शिक्षण आपलं आहे?’ हा लेख वाचल्यावर (लोकसत्ता, ४ ऑक्टो.) अनेकांनी अभिनंदन केलं. परिचितांनी दूरध्वनी करून, काहींनी समक्ष भेटून केलं. विस्तारभयास्तव सर्व विचार तेव्हा मांडता आले नव्हते. ‘शैक्षणिक पडझडीचं तुम्ही निदान केलंत, पण आता काय करायचं, याकरिता उपाययोजनाही सुचवा,’ असं काहींनी म्हटलं. विज्ञानविषयक ज्ञान केवळ इंग्रजीत आहे, असं इंग्रजी माध्यमाच्या काही समर्थकांचं म्हणणं. म्हणून इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही, असं म्हणतात. मराठी भाषा विज्ञानाकरिता अजून सक्षम नाही, असं काही जण सांगतात. मराठीत शब्दच नाहीत, असंही कुणी म्हणतात, तर इंग्रजीत बोलता येत नसल्यानं मराठी मुलं मुलाखतीत मागं पडतात, असं काही जण सांगतात.
काही शंका. मुलाखतीला येणारी मुलं अधिकारी झाल्यावर भारतातच काम करणार असतील तर परकीय भाषा बोलता न येणं कमीपणाचं का? इंग्रजीऐवजी स्वभाषांतून शिकून नोबेल मिळवणाऱ्या कोणत्याही राष्ट्राला वरील प्रश्न कसे पडले नाहीत? त्यांची विद्यापीठं पहिल्या २००त कशी आली? आपलं एकही का नाही? ज्या इंग्रजीचं भूत आपल्या मानगुटीवर पक्कं बसलंय, तिची अवस्था स्वदेशीच कशी दयनीय होती, ते पाहूया.
फ्रान्सच्या वायव्येकडील नर्ॉमडीचं सरदार घराणं, नॉर्मन्स. नॉर्मन सरदार विल्यमनं १४-१०-१०६६ला आक्रमण करून इंग्लंड जिंकलं. तेव्हापासून लॅटिनचा प्रभाव संपून फ्रेंचचा वाढला. कोर्ट, पार्लमेंट, जर्नल हे फ्रेंच शब्द आहेत. इतक्या स्वाभाविक कल्पनांकरितासुद्धा जगाच्या(?) भाषेत शब्द नव्हते! आजही इंग्रजीत ३० टक्के शब्द फ्रेंच आहेत. कायद्याचे महत्त्वाचे शब्द फ्रेंचच असावेत, असा त्यांचा १३६२चा कायदाच आहे! ‘वितंडवादाकरता इंग्रजी चालेल, पण वकिलीकरिता कधीही चालणार नाही,’ असंही इंग्रज म्हणत. इंग्रजीला रांगडी, भरड, जंगली, गावंढळ, कुचकामी असली विशेषणं लावीत! (पाहा – The Triumph of the English Language, Richard Foster Jonnes पान ७ किंवा इंग्रजी भाषेचा विजय – सलील कुलकर्णी, लोकसत्ता दि. ४.१०.२००९).
महान ऐतिहासिक कार्य: देशोदेशींच्या तत्त्वज्ञांनाही आकर्षति करणारं भारतीय तत्त्वज्ञान संस्कृतात बद्ध असल्यानं, जिथं ते स्फुरलं त्या देशातल्या सामान्यांकरिता जीवनात काडीचाही उपयोग नसलेली एक शोभेची वस्तू होती.
ज्ञानेश्वर अकराव्या अध्यायात म्हणतात, ‘तत्त्वज्ञानाचा प्रवाह जिच्यातून वाहत आहे तिचे काठ संस्कृत आहेत. कठिण (गहन) आहेत. निवृत्तिनाथांनी ते तोडले. मराठी पायऱ्या बांधल्या. आता इथं, कुणीही (भलतेणे) श्रद्धेनं नहावं आणि जन्ममरणाच्या (संसाराच्या) चक्रातून सुटावं.’
परिणाम? ज्ञानदेवांच्या, एकवीस वर्षांच्या, अल्पायुष्यातच कित्येक जातींत संत निर्माण झाले. गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई, चोखामेळा.. परंपरा तीनशे र्वष चालून तुकाराम महाराजांना भिडलीच, पण नंतर आधुनिक काळातही, बहिणाबाई, गाडगेमहाराज यांच्यापर्यंतही पोचली.
सर्व ज्ञान संस्कृतातच आहे, असं ज्ञानेश्वर म्हणाले का? प्रत्येकानं संस्कृत शिकलंच पाहिजे, असं म्हणाले? संस्कृतला पर्याय नाही, असं? तत्त्वज्ञानाकरिता मराठी अजून सक्षम नाही असं? मराठीत शब्दच नाहीत, असं? संस्कृत येत नसल्यानं मराठी समाज मागं पडतो, असं तरी?
उलट तेच ज्ञान त्यांनी सामान्यांच्या आवाक्यात येईल अशा मराठीत आणलं. शब्द कसे? तर अडाण्यालाही कळतील, इतके सोपे. इतका स्वच्छ, स्पष्ट आदर्श आपल्यापुढं असताना आपण वेडगळपणा कसा केला? इंग्रजी भाषा आणि माध्यम यांत भेद कसा केला नाही?
ज्ञानेश्वरांच्या कार्याची, विशाल हृदयाची जाण त्या संतांना होती. गोरा कुंभार, सावता माळी या प्रौढांनीसुद्धा मोठय़ा कृतज्ञतेनं विशीतल्या पोराला माऊली पदवीनं गौरवलं! संस्कृत न जाणणाऱ्या त्या मंडळींनी आपली पात्रता असल्याचं तर सिद्धच केलं. अडलं होतं कुठं? ते ज्ञान त्यांच्या मातृभाषेत नव्हतं. बस्स!
चच्रेत एकानं विचारलं, ‘मातृभाषेत अध्यापन सुरू झालं की, सगळीकडे नोबेल पारितोषिकं मिळवणारे दिसू लागतील, असं म्हणायचं का तुम्हाला?’ प्रश्न खवचट असला तरी शंका उचित आहे, पण ज्ञानेश्वरांनंतर सर्वत्र कुठं संत दिसायला लागले होते? ज्यांची पात्रता होती, त्यांना लाभ झालाच ना? पण ती संधी विज्ञानाच्या बाबतीत दिली गेली का?
आपल्या १९ संशोधन संस्थांच्या तुलनेत द. कोरियासारख्या पाच कोटींच्या आणि ७० टक्के भाग डोंगराळ असलेल्या देशातही ३७२३ संशोधन संस्था आहेत! (लोकसत्ता, ११.३.२०१०) समाजाच्या भाषेत विज्ञान उतरलं की समाज विज्ञाननिष्ठ होतोच.
पण सामान्य स्तरांतील मुलं आपल्या पुढं जातील, आपली संधी घटेल, अशी भीती उच्चवर्गाला असावी. हे काल्पनिक नाही. इंग्लंडातील डॉक्टर तसं म्हणतच. उपरोक्त ‘जोन्स’ पाहा. (पान ५०)
उच्चवर्गीयांना असं का वाटतं? ती मुलं आपल्या समाजाची नाहीत का? तुमच्याइतकाच त्यांचाही अधिकार नाही का? मी असं विचारतो, कारण २५ टक्के जागा वंचितांकरिता राखून ठेवायचा मुद्दा कायद्यात आल्याबरोबर, त्याविरुद्ध याचिकाही दाखल झाली. (सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली म्हणा.) ‘आता तुमची मुलं व्यसनी होतील, विडय़ा ओढू लागतील,’ असा प्रचारही कर्नाटकातल्या इंग्रजी शाळांनी पालकांत सुरू केला. कदाचित, उच्चवर्गीयांना विडय़ांपेक्षा रेव्ह पाटर्य़ाची व्यसनंच अधिक प्रतिष्ठित वाटत असतील!
मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणाचा बालकांना कसा लाभ होतो, यावर लिहिलं होतं आणि नोबेल पारितोषिकांचा उल्लेखही केला होता. ते एकमेव गमक आहे, असं मी म्हणत नाही; पण तोही एक जागतिक महत्त्वाचा मापदंड आहेच.
अगदी बालवयात किंवा तारुण्याच्या उंबरठय़ावरील पोरांनी नेत्रदीपक शोध लावल्याची किती तरी उदाहरणं गणिताच्या इतिहासात मिळतात. इतर विज्ञानशाखांतही असणारच.
युक्लिडेतर भूमितीचा शोध टप्प्याटप्प्यानं जर्मन, फ्रेंच, हंगेरियन, इटालियन, रशियन अशा तरुण गणित्यांनी मिळून लावला. (यात इंग्रज कुठंच नाहीत!). रशियाच्या लोबॅचेव्सकीनं पूर्ण काम प्रथम प्रसिद्ध केल्यानं, ती त्याच्या नावानं ओळखली जाते.  हे वाचता वाचता माझी अस्वस्थता वाढत गेली. ‘किमान २५०० वर्षांपूर्वी पायथागोरस सामोसपासून गंगेपर्यंत चालत गेला तो केवळ भूमिती शिकण्यासाठीच,’ असं फ्रांस्वा वोल्तेर या फ्रेंच लेखकानं म्हटलं आहे. तिथं आज पहिल्या २०० त एकही भारतीय विद्यापीठ का नाही? याचंही उत्तर इंग्रजी माध्यमाच्या पुरस्कर्त्यांनी द्यायला नको?
ते काय उत्तरं देणार म्हणा. मीच देतो.
(अ) इंग्रजी माध्यम चालू ठेवण्यानं भारतीय भाषांचा विकास खुंटेल, असं गांधीजींनी आणि कोठारी आयोगानं म्हटलंच होतं.
(आ) समाज आणि विद्वान यांच्यातली दरी बुजवण्याकरिता मातृभाषेतून शिक्षण हाच मार्ग असल्याचंही कोठारी आयोग म्हणतो.
(इ) भारतीय भाषांतून अध्यापनाची सोयच नसल्यानं मुलांना वाचायला पुस्तकंच नाहीत.
(ई) इंग्रजी शिकण्यात, ज्ञान इंग्रजीतून घेण्यात त्यांची शक्ती, बालवयातील तेजस्वी सहजप्रज्ञा वाया जातात.
(उ) गांधीजी किंवा कोठारी आयोग म्हणतात तशी स्वतंत्र विचार आणि संशोधन यांकरिता ती अपात्र बनतात.
काय चुकलं, ते शोधलं की, काय करायचं ते लोण्यासारखं आपोआप वर येईल. दोन प्रकारच्या उपचारपद्धतींची तुलना करायची असेल, सांख्यिक तज्ज्ञ काय करतात?  भिन्न गट निवडून एकेका गटावर एकेक उपचार करतात. परिणामांच्या नोंदी करतात. सांख्यिकीय पद्धतीनं विश्लेषण करून निष्कर्ष काढतात.
पण, कोठारी आयोग १९६६ मध्ये प्रकाशित झाल्यानंतरही मोठय़ा विद्वानांकडून, पूर्ण अवैज्ञानिक भूमिका घेण्याचा देशघातकी प्रमाद घडला. स्वकीय भाषामाध्यमाचं महत्त्व जगभर मान्य होतंच. तरीही इंग्रजी माध्यमाचा प्रयोग करायचा होता, तर एकाच वेळी दोन्ही माध्यमांतून शिक्षण देण्याची व्यवस्था करणंच विज्ञाननिष्ठ ठरलं असतं. त्यामुळं कोणती पद्धत श्रेष्ठ आहे, हे मिळणाऱ्या निष्कर्षांवरून लोण्यासारखं वर आलं असतं.
कैक र्वष विज्ञान शिकून-शिकवूनही, त्यांनाच वैज्ञानिक दृष्टी नाही! मग ते काय समाजाला वैज्ञानिक दृष्टी देणार? आडातच नाही..! परिणाम?
एक- परकीय भाषामाध्यमाची निरुपयोगिता पुन्हा सिद्ध झाली!  दोन- मातृभाषेच्या योग्यतेबद्दल ज्यांची खात्री होती, ज्यांना इंग्रजीतून आपल्या मुलांना शिकवण्याची इच्छा नव्हती, त्यांच्या मुलांवरही, लोकशाही तत्त्वाच्या विरुद्ध इंग्रजी माध्यम लादलं. तीन- दोनतीन पिढय़ांची अपरिमित हानी केली. चार- वेडगळ पालकही एकापाठोपाठ खड्डय़ात पडणाऱ्या मेंढरांसारखे वागले, तेही कुणी तरी सांगतंय म्हणून. स्वत: विचार नको करायला? पाच- त्यामुळं त्यांनी स्वत:च्याच मुलांमधील कोवळा वैज्ञानिक (कदाचित नोबेलविजेताही) खुडून टाकला, त्यांना घोक्ये बनवलं ते वेगळंच. सहा- देशाच्या अप्रतिष्ठेला तितकाच हातभर लावला. सात- शिक्षितांचं अंधानुकरण अशिक्षितांनीही आरंभलं. इंग्रजी माध्यमांच्या मागं लागल्यामुळं अवास्तव शुल्क भरू लागले. आपल्या मुलांना त्यातून पौष्टिक अन्नपेयं देऊ शकली असती, ती दिली नाहीत. सर्वात महत्त्वाचं आठ- समाज विज्ञाननिष्ठ होणं थांबलंच!
समाज शहाणा होऊ नये, असं स्वार्थसाधू राजकारण्यांना वाटणं मी समजू शकतो, पण वैज्ञानिकांनीही असली समाजघातकी भूमिका घ्यावी?
आपण वैज्ञानिकांप्रमाणं प्रमाद नको करायला. मात्र मातृभाषांतून शिक्षण पदव्युत्तर स्तरापर्यंत देण्याचा पर्याय तत्काळ २०१३ पासूनच उपलब्ध करावा. शिक्षक-प्राध्यापकांना मराठीत पुस्तकं लिहायला लावावीत.
मुलामुलींना इंग्रजीशिवाय चांगलं भवितव्य नाही, अशी पालकांची जी भीती आहे, तिच्याकरिता, मराठी माध्यमात शिकणाऱ्यांना प्राथम्य देण्याचं ठरवावं. अभियांत्रिकीचं शिक्षण तामिळमधून घेणाऱ्यांना नोकरीत आरक्षण आहे.  
काही जणांना मराठीबद्दल आस्था नसेलही, पण परदेशांत मराठी शिकवलं जातं, हे सांगितलं तर नवल वाटेल. मॉस्को विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख श्रीमती इरिना ग्लुश्कोवा एका पारितोषिक समारंभाच्या अध्यक्षा म्हणून पुण्यात येऊन गेल्या. पारितोषिक महाबँक आणि मराठी अभ्यास परिषदेच्या वतीनं, उत्कृष्ट मराठी ग्रंथाला. लेखक कोण? डॉ. तुळपुळे आणि अमेरिकी महिला अ‍ॅन फेल्डहाऊस.
विभागप्रमुख आहेत म्हणजे मराठीचे आणखी प्राध्यापक असणारच. म्हणजे पदव्युत्तर वर्गात मराठी शिकणारे विद्यार्थीही असणार. म्हणजे पदवी वर्गातही मराठी शिकवलं जात असणार!
आणखी? आधी निर्णय करा तर. प्रत्यक्षात उतरवण्याकरिता आणखीही पुष्कळ काही ठरवावं लागेल. आपल्या वेडगळ कल्पनांमुळं आपण इतकी र्वष मागं पडलो आहोत, किमान दोन-अडीच पिढय़ांची आणि अप्रत्यक्षपणं पुढच्या आणखी कित्येक पिढय़ांची हानी केली आहे.

Story img Loader