दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी एका स्वीडिश विमान कंपनीसाठी भारतातील ‘संवादक’ म्हणून काम करीत होते, असा उल्लेख असलेले अमेरिकी दूतावासाचे पत्र विकिलीक्सने जाहीर केले. त्यावर या प्रकरणी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपने केली. काँग्रेसने हे सगळेच बकवास असल्याचे म्हटले. म्हणजे हे रीतीनुसारच झाले. या शिवाय विकिलीक्सने भारतासंबंधीच्या आणखीही काही केबल्स प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात जॉर्ज फर्नाडिस यांनी आणीबाणीच्या काळात सीआयएकडून पसे मागितले, असे म्हटलेले आहे. इंदिरा गांधी यांच्या निकटच्या लोकांमध्ये सीआयएची ‘सूत्रे’ होती, असे नमूद केलेले आहे. संजय गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्याबाबतचीही पत्रे त्यात आहेत. १९७३ ते १९७६ या काळातील अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या १७ लाख कागदपत्रांचा संचच विकिलीक्सने सोमवारी जाहीर केला आहे, म्हटल्यावर त्यातून आणखीही बऱ्याच जणांची नावे, बरीच प्रकरणे पुढे येतील. पण मुद्दा असा आहे की, अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाची ही कागदपत्रे हा अंतिम पुरावा म्हणून ग्राह्य़ धरता येतील काय? परवा राजीव गांधींवरील आरोपांचा इन्कार करताना काँग्रेसने विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांच्यावरच खोटी आणि निराधार माहिती पसरवीत असल्याचा आरोप केला. येथे लक्षात घेण्यासारखी एकच बाब आहे आणि ती म्हणजे असांज हे फक्त माहिती पसरवीत आहेत, फोडत आहेत. तिची सत्यता तपासून पाहणे हे इतिहासतज्ज्ञांचे काम आहे, पक्षप्रवक्त्यांचे नव्हे. विकिलीक्सने प्रसृत केलेल्या ताज्या ‘किसिंजर केबल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रांमध्ये अमेरिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत डॅनियल पॅट्रिक मोयनिहान यांनी १७ मार्च १९७३ रोजी पाठविलेल्या एका पत्राचा समावेश आहे. त्यात इंदिरा गांधींचे साहाय्यक टी. एन. कौल हे सोव्हिएत रशियाचे पक्षपाती आहेत, अमेरिकाविरोधी आहेत, काश्मिरी ब्राह्मण असल्याने जन्मत:च उद्धट आहेत, अशी निरीक्षणे नोंदविलेली आहेत. यातील मौज अशी की, कौल महोदयांना एकदाही न भेटता, केवळ ऐकीव माहितीवर मोयनिहान यांनी हे लिहिलेले आहे. त्यांनीच पुढे तसे नमूद केलेले आहे. याचा अर्थ एवढाच, की त्यांतील मजकुराकडे तारतम्याने पाहण्याची आवश्यकता आहे. अन्य स्रोतांकडून उपलब्ध झालेल्या कागदपत्रांशी ही पत्रे ताडून पाहिली पाहिजेत. अन्यथा जागतिक परिस्थितीबाबतचे अमेरिकी परराष्ट्र अधिकाऱ्यांचे त्या-त्या दिवसातले वाचन हाच खरा इतिहास म्हणून नोंदविला जाण्याची भीती आहे. आरोपांची धुळवड उडविण्यासाठी ते उपयोगी ठरले, तरी त्यातून जागतिक इतिहासाचे अमेरिकीकरण होण्याचीच अधिक शक्यता आहे.
केबल्सची कुजबुज
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी एका स्वीडिश विमान कंपनीसाठी भारतातील ‘संवादक’ म्हणून काम करीत होते, असा उल्लेख असलेले अमेरिकी दूतावासाचे पत्र विकिलीक्सने जाहीर केले. त्यावर या प्रकरणी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपने केली.
First published on: 10-04-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whisper of cables