उद्योगसमूह, कंपनी, सरकारी उपक्रम वा सरकार यांतील अंतस्थानेच या यंत्रणा/व्यवस्थांचे दोषपूर्ण वर्तन जगापुढे आणणारी माहिती उघड करणे, हे ‘नैतिक’ कसे? हा प्रश्न उपयोजित तत्त्वज्ञानात येतो. त्याची ही चर्चा..
गेल्या दोन दशकांत उद्योगसमूहांतील अनेक नतिक समस्या सोडविण्यासाठी अनेक उपाय शोधण्यात आले. त्यातून Whistle Blowing (व्हिसल ब्लोइंग) या परिणामकारक संकल्पनेचा उदय झाला. त्याचा अर्थ शिट्टी मारणे. यथार्थ भाषांतर दवंडी पिटणे, शंखध्वनी करणे. Whistle Blower या इंग्रजी शब्दाला रूढ मराठी प्रतिशब्द ‘जागल्या.’
व्यवसाय, धंदा व उद्योगसमूह या तीन सेवाक्षेत्रांचे विभाजन खासगी, निमसरकारी, सरकारी अशा तीन प्रकारांत करता येते. या तिन्ही क्षेत्रांत मालक-नोकर यांच्या परस्परसंबंधात गुंतलेली, पण सार्वजनिक हित हेच उद्दिष्ट ठेवणारी जागलेगिरी (व्हिसल ब्लोइंग) ही कळीची नतिक संघर्षांची संकल्पना आहे.
कोणत्याही सेवाक्षेत्रातील ‘मालक’ या संकल्पनेत खुद्द मालक नसलेला पण मालकाने नेमलेला वरिष्ठ अधिकारीसुद्धा समाविष्ट करता येईल. कारण मालकाने अधिकाऱ्याला जवळपास स्वत:चे अधिकार दिलेले असतात. छोटय़ा खासगी ठिकाणी मालक ही निश्चित व्यक्ती असते. मोठय़ा धंद्यात, उद्योगसमूहात आणि निमसरकारी, सरकारी क्षेत्रांतील नोकरशाहीत वरिष्ठ अधिकारी हाच मालक असतो. खुद्द नोकर किंवा सेवक हाच मालक होण्याची घटना मात्र केवळ राजकीय क्षेत्रात घडते.
खेळताना एखाद्या खेळाडूने चुकीची, नियमबाह्य खेळी केली की पंचाने ती चूक संबंधित खेळाडूला आणि प्रेक्षकांना लक्षात आणून देण्यासाठी शिट्टी वाजविणे या कृतीपासून ‘व्हिसल ब्लोइंग’ हा शब्द आला. त्याचेही मूळ पोलिसाने एखाद्याचे बेकायदा वर्तन लक्षात आणून देण्यासाठी शिट्टी वाजविणे या कृतीत असावे. १९६३ला इंग्लिशमध्ये ‘व्हिसल ब्लोइंग’ सर्रास लोकबोलीत रुळला. प्रोफेसर राल्फ नादेर (१९२७) या अमेरिकन लेखकाने १९७०च्या दरम्यान आजचा अ‍ॅकेडेमिक अर्थ प्रचलित केला.
एखाद्या संस्थेतील मालकाचे अथवा सहकाऱ्यांचे बेकायदा व अनतिक वर्तन त्या संस्थेतील कर्मचाऱ्याने लोकांपुढे-चव्हाटय़ावर आणणे म्हणजे जागलेगिरी करणे. याचे दोन अर्थ आहेत. पहिला, मर्यादित अर्थ कामाच्या ठिकाणी जागलेगिरी करणे आणि दुसरा, व्यापक अर्थ समाजहित, लोकहितासाठी जागलेगिरी करणे. ज्या संस्थेत आपण काम करतो त्यातील अनतिकता संस्थाप्रमुखाकडे उघडकीस आणणे ही अंतर्गत जागलेगिरी, तर समाजाला मारक असणारी कोणाचीही कृती- मग ती आपली असो वा इतरांची असो, ती सरकार, एखादी नियंत्रक संस्था किंवा पत्रकार-माध्यमे यांच्याकडे नेणे, ही बाह्य जागलेगिरी.
अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातील ‘तत्त्वज्ञान आणि व्यवस्थापकीय ध्येयधोरणे’ या विषयाचे प्रोफेसर नॉर्मन बोवी यांनी ‘जागल्या’ संकल्पनेची दिलेली व्याख्या अशी : खासगी किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या नफा अथवा ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या कोणत्याही संस्थेतील एखाद्या कर्मचारी किंवा अधिकारी कंपनीकडून अथवा मालकाकडून त्याच्यावर अनतिक अथवा बेकायदा कृती करण्याची जबरदस्ती होत असल्याची माहिती जनतेला जाहीरपणे देतो, तेव्हा तो ‘जागल्या’ असतो.
बोवीच्या मते, एखादी कृती व्हिसल ब्लोइंग या पात्रतेची होण्यासाठी तिला तीन तत्त्वांचा आधार असला पाहिजे. (१) संस्थेच्या कर्मचाऱ्यावर जबरदस्तीने होणारी कृती इतरांना अनावश्यकरीत्या त्रासदायक आहे. (२) ती मानवी हक्कांचा भंग करणारी आहे. (३) ती अनतिक अथवा बेकायदा कृती खुद्द संस्थेच्या हिताची नाही. संस्थेच्या आचारसंहितेच्या विरुद्ध आहे. म्हणून ती संस्थेने किंवा हितसंबंधित व्यक्तीने दडवून ठेवली आहे.
जागलेगिरी ही मालकाच्यावा कंपनीच्या, संस्थेच्या विरोधात जाऊ शकेल अशी कृती आहे, असे प्रथमदर्शनी वाटल्यामुळे ती अनतिक वाटते. मग अशी कृती नतिक कशी ठरू शकते? तर बोवीच्या मते, त्याचे निकष असे : (१) संबंधित कर्मचाऱ्याच्या या कृतीमागे कसलाही स्वार्थ नसावा. (२) ती तक्रार त्याने आधी मालक, संचालक अथवा तक्रारनिवारण समितीकडे नेलेली असावी आणि त्यांनी त्याची दखलच घेतलेली नाही, असे असावे. (३) जबरदस्ती झाल्याचा पुरेसा पुरावा असावा. व्हिसल ब्लोइंग करण्यात स्वत:ला धोका कसा आहे, याचे विश्लेषण कर्मचाऱ्याने करावे. त्याचबरोबर संबंधित बेकायदा वर्तनात नीतिनियम कसे पायदळी तुडविले जात आहेत, तसेच संस्था, कंपनी व सार्वजनिक हिताला संबंधित बेकायदा वर्तन कसे धोकादायक आहे, ते स्पष्ट करावे. (४) कर्मचाऱ्यास किमान यशाची खात्री असावी.
थोडक्यात, मालक वा कंपनी करीत असलेल्या अनतिक व बेकायदा समाजविरोधी कृत्याबद्दल कंपनीतील कर्मचाऱ्याने जनतेकडे जाहीरपणे माहिती नेणे म्हणजे व्हिसल ब्लोइंग. हा शंखध्वनी करण्यात त्याचा हेतू कंपनीला, मालकाला आणि पर्यायाने समाजाला अनतिकतेपासून व कायदेबाह्यपणापासून वाचविणे, निव्वळ लोकहित हेच उद्दिष्ट साधणे हाच असावा, कोणताही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वार्थ नसावा. तरच ही कृती नतिक ठरते अन्यथा नाही. जागल्या मालकात, व्यवस्थेत सुधारणा घडवितो, त्यांची नतिक पातळी उंचावीत असतो. तो नीतीचा रक्षक असतो. त्यासाठी जिवाची बाजी लावतो.
जागल्याची भूमिका लक्षात घेतली तर जागल्या म्हणजे जो कर्तव्याच्या पलीकडे जातो, स्वत:ची नोकरी आणि कामधंदा म्हणजे रोजीरोटी गमावण्याचा धोका पत्करतो तसेच प्रसंगी स्वत:च्या कुटुंबीयांचे जीव पणाला लावतो अशी कोणतीही व्यक्ती. जागलेगिरीला पाश्चात्त्य राष्ट्रांत अठराव्या शतकापासून परंपरा आहे. पहिला जागल्या म्हणून सम्युएल शॉ (१७७७) या अमेरिकन नौदल अधिकाऱ्याचे नाव घेतले जाते. अनेक जगल्यांनी जगाचा इतिहास बदलला. त्यात अनेक स्त्रियाही आहेत. आजचा जागतिक जागल्या म्हणजे एडवर्ड स्नोडेन.
भारतात ही संकल्पना लोकांमध्ये फारशी रुळलेली नाही. पण लोकशाही जीवनरीतीत ती एका अर्थाने अंतर्भूत असते. लोकपाल, जनलोकपाल, माहिती अधिकार आणि ‘जागले संरक्षण विधेयक’ (व्हिसलब्लोअर्स प्रोटेक्शन बिल- २०११) व्यापक जागलेगिरीकडे प्रवास करीत आहेत. पण जागलेगिरी ही लोकचळवळ होणे, व्यक्ती आणि समाज यांची ती मूलभूत नतिक प्रेरणा बनविणे हे महत्त्वाचे आहे. केवळ सत्येंद्र दुबे, षण्मुगम मंजुनाथ अथवा मेधा पाटकर, अण्णा हजारे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, सतीश शेट्टी अथवा के. सी. अब्राहम, दिनेश ठाकूर यांच्यापुरती मर्यादित होणे अपुरे आहे.
पत्रकारिता, माध्यमे, सामाजिक माध्यमे ही जागलेगिरी करतात. ते त्यांचे कामच आहे. त्याशिवाय विचारवंत, तत्त्ववेत्ते, लेखक हे आधुनिक माध्यम संकल्पनेनुसार पाचवे-सहावे स्तंभ आहेत, ते नवजागले असतात. या साऱ्यांची जागलेगिरी ‘या निशा भूतानाम् तस्यां जागíत संयमी’ या आध्यात्मिक हेतूनुसार चालू असते.
तथापि जागलेगिरी राजकीय क्षेत्रात खूपच वेदनादायी बनते. लोकप्रतिनिधी हे लोकशाहीतील एक आदर्श म्हणून लोकसेवक असतात, पण वास्तवात ते जनतेचे मालक बनतात! अशा वेळी ‘आपले कर्तव्य करताना मालकाचे हित सांभाळावे की लोकहिताला प्राधान्य द्यावे?’ यावरून सरकारी नोकरांचा आणि राज्यकर्त्यांच्या खासगी नोकरवर्गाचा नतिक गोंधळ होत असतो. सेवकपणा व मालकी, या द्वैतात अडकलेली राजकारण्यांची नतिकता तर खूपच बिकट व करुण असते.
मालक, मालकवर्ग कोणीही वा कोणताही असो, नोकरांच्या बाजूने जागलेगिरी आणि चमचेगिरी असा नतिक एक नवाच संघर्ष जन्माला येतो, हे वास्तव समजावून घेणे आवश्यक आहे. चमचेगिरीचा उदय दोन रीतींनी होतो. (१)- नोकरांच्या बाजूने पाहता, बहुधा स्वत:चे काम येत नसल्याच्या अपराध भावनेतून चमचेगिरी येते. त्याची नुकसानभरपाई म्हणून नोकर माणूस मालकाची स्वयंघोषित चमचेगिरी स्वीकारतो. (२) व्यवस्था या अर्थाने पाहता, चमचेगिरीचा उदय पारदर्शकता, लोकशाही नसते तेथे होतो. भारतात आज कुटुंब ते राजकीय पक्ष, संघटना या प्रत्येक पातळीवर केवळ पुरुषप्रधानता आणि हुकूमशाही आहे. चमचे आणि कार्यकत्रे, मित्र, सल्लागार, मार्गदर्शक यांत नेमका फरक करता येणे आवश्यक आहे. कारण चमचेगिरी नेहमीच मालकाला धोक्यात आणते. ती मालकाची नतिक पातळी नेहमी खाली आणते.

district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Ashwini Vaishnaw news in marathi
नवा विदा संरक्षण कायदा नागरिकांना सक्षम करेल…
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
Savitribai Phule Pune University rule challenged in High Court
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान
Ujani dam, desilt Ujani dam, Radhakrishna Vikhe Patil,
उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानंतर, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण
Story img Loader