‘शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद!’ या बातमीत (लोकसत्ता, ५ मे) शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली गेल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असं म्हटलं आहे. वास्तविक सर्व अशैक्षणिक कामं सरकारी आदेशाप्रमाणेच दिली जातात. असं असताना मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. शक्यता अशी आहे की कुठल्याही लेखी आदेशाशिवाय मुख्याध्यापकांना त्यांच्या शिक्षकांना अशैक्षणिक कामावर पाठवण्यास तोंडी सांगितलं जाईल, एखाद वेळेस त्यांच्याकडूनच प्रस्तावही तोंडी मागवला जाईल आणि प्रकरण अंगाशी आलं तर सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांवर ढकलून प्रशासकीय अधिकारी नामानिराळे राहतील.
शरद कोर्डे, ठाणे.
नाना रोखठोक आहे म्हणूनच..
‘नानांकडून(च) अपेक्षा..’ या पत्रात (लोकमानस, ६ मे) डॉ. शंतनू रेठरेकर यांनी अजित पवारांना दूषणे देतानाच नाना पाटेकर यांना दोष देण्याचा प्रयत्न केलाय. नानाने अजित पवारांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायला नको होता असं त्याचं म्हणणं आहे. एकीकडे नानाला रोखठोक भूमिका घेणारा म्हणायचं आणि त्याच वेळी त्याने अजित पवारांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर टीकाही करायची, असा प्रकार पत्रात आहे. खरं म्हणजे अजित पवारांच्या ‘त्या’ उद्गारांविषयी नानाने तेव्हाच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. बोलण्याच्या ओघात भान सुटू न देणं, हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी याचं भान कायम बाळगलं पाहिजे, अशा आशयाची प्रतिक्रिया तेव्हा नानाने व्यक्त केली होती. त्यानंतर काही उथळ महाभागांप्रमाणे हा विषय अधिक ताणून अजित पवारांना अस्पृश्य ठरवण्याची भूमिका नानाने घेतली असती तर ते उलट त्याच्या स्वभावाशी विसंगत ठरले असते. नाना परखड आणि रोखठोक आहे म्हणूनच त्याने अजित पवारांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून कोणत्या विषयाला किती ताणायचं आणि किती महत्त्व द्यायचं हे कृतीतून दाखवून दिलं!
-रवींद्र पोखरकर, कळवा-ठाणे
हा भावनिक दहशतवाद आत्मघातकीच ठरेल
‘महाराष्ट्राचा कॅम्पा कोला’ या अग्रलेखात (६ मे) म्हटल्याप्रमाणे, अनधिकृत बांधकामं उभारणारे अन् त्यांना व्यक्तिगत स्वार्थासाठी अभय देणारे दोषी आहेतच. पण याला खतपाणी घालून वर्षांनुवष्रे बेकायदेशीर बांधकामं उपभोगणारे सधन, सुशिक्षित रहिवासी शेखचिल्लीसारखे आपण बसलेल्या फांदीवरच कुऱ्हाड मारून घ्यायला लागेल, या सत्याबाबत कसे अनभिज्ञ राहिले असतील हाही प्रश्न सतावणारा आहे. असं ऐकलं की गेली २५ वष्रे ठाणे परिसरातल्या ‘कॅम्पा कोला’ इमारतींना टँकरनं पाणीपुरवठा होत आहे. आता तिथले अनेक जण वयस्कर, आजारी म्हणून सहानुभूतीला पात्र होतीलही. पण काळ सोकावेल त्याचं काय? या सर्व गलथानपणाचं कारण आपल्यातच आहे आणि ते म्हणजे कुठल्याही कर्तव्याला भावनातिरेकाची आडकाठी. हा भावनांचा दहशतवाद आपल्याला फार मोठय़ा अराजकाकडे घेऊन जात आहे. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे अनेक सामाजिक प्रश्न यांमुळे निर्माण होणार आहेत. ते सोडवण्याचं नियोजन करण्यासाठी कर्तव्यकठोर शासनाधिकारी पुढे येण्यासाठी तयारही असतील. पण गलिच्छ हितसंबंधांच्या दोरखंडांनी त्यांचे हात एक तर बांधले जातात किंवा कलम केले जातात, बदली करून वा पदावरून हकालपट्टी करून. साऱ्या समाजालाच शेखचिल्ली होण्यापासून वाचवण्यासाठी सर्व पक्षांच्या धुरंधरांनी कंबर कसण्याची वेळ आली आहे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे</p>
महसूलबुडव्या व्यापाऱ्यांना एलबीटी नको!
‘लोकल बॉडी टॅक्स’ अर्थात ‘एलबीटी’प्रणालीला व्यापारी वर्गाने बंद आणि मोच्रे काढून विरोध दर्शवला आहे. यामुळे जनसामान्यांना किती त्रास होत आहे याबद्दल या वर्गाला जराही विचार करावासा वाटत नाही.
सध्या महानगरपालिकांच्या प्रवेशद्वारी असलेल्या जकात वसुली नाक्यांची कार्यशैली येता-जाता कुणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे. खोटी बिले, मालाचे खोटे वर्णन अशा लबाडीच्या युक्त्या योजून जकात चुकवला जातो आणि भ्रष्टाचाराद्वारे कोटय़वधीचा महसूल बुडवला जातो. या प्रकारास जकात अधिकारी जबाबदार असले तरी माल मागवणारे व्यापारी तितकेच जबाबदार असतात हे लक्षात घेतले पाहिजे. जकात चुकवलेला माल विक्रीस ठेवल्यावर व्यापारी त्यावर जकात आकारून ग्राहकांना लुबाडतात आणि कर म्हणून आकारलेले पसे खिशात घालतात. सध्या आंदोलन करीत असलेले व्यापारी आणि त्याच्या संघटना याबद्दल मात्र काहीच बोलत नाहीत.
उलट एलबीटी प्रणालीमुळे महसूल बुडेल, अशी भीती ते शासनाला दाखवत आहेत. हीच मंडळी परदेशात कायदे कसे कडक आणि तेथील नागरिक ते कसे पाळतात यावर सेमिनारमधून भाषणे देत असतात! खरं म्हणजे महापालिकेच्या हद्दीत आणलेल्या मालावर व्यापाऱ्यांनी लागू असलेल्या कराचा स्वत: हिशेब करून तो कर जमा करायचा आहे, हा एलबीटी प्रणालीचा साधा संकेत आहे. मात्र त्यासाठी व्यापाऱ्यांना सर्व व्यवहार पारदर्शक ठेवावे लागणार असून ते पडताळणीसाठी तयार ठेवावे लागणार आहेत. आंदोलन करणाऱ्यांना नेमके हेच नको असून सध्या चालू असलेली जकात चुकवेगिरीच हवी, असे दिसते.
मुरली पाठक, विले पाल्रे (पूर्व)
हिरव्या पट्टय़ातही इमले!
नगरसेवक ते मंत्री यापकी कुणी ‘महाराष्ट्राचा कॅम्पा कोला’ हा अग्रलेख वाचून धडा घेतील, असे नाही. अनधिकृत बांधकामाविरुद्ध २००७ साली वसई येथील हरित वसई ही संघटना मुंबई उच्च न्यायालयात गेली. त्यानंतर गेली सहा वष्रे आदेश येतात, मात्र कारवाई होत नाही. शहरांच्या नियमपूर्ण विकासाकडे आपल्या एकाही मुख्यमंत्र्याने लक्ष दिले नाही. ज्यांना विकास हा शब्द लिहिता येणार नाही, असे नगरविकासमंत्री आले. केवळ मुंबई-ठाणे-डोंबिवली या भागाची वाट लावली एवढेच नव्हे तर वसई -विरार हा हिरवा भागही नाशाच्या मार्गावर आहे. या भागात आता केवळ झोपडय़ाच नव्हे तर बहुमजली इमारती आहेत. कोणी कितीही मजले बांधावे. आता महापालिका येथे २२ मजली इमारतींना परवानगी देण्यासाठी नियमावलीतच बदल करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला सर्वपक्षीय पाठिंबा आहे.
अर्नाळा ते वसई कोळीवाडा या समुद्रकिनाऱ्यावर मात्र शेकडो एकर जमीन एकदम सपाट दिसते.. चौकशी केल्यास समजते की या जमिनी धनदांडग्यांनी विकत घेतल्या आहेत. आता तीच मंडळी या हिरव्या पट्टय़ाला सध्या लागू असलेला ०.३३ एफएसआय वाढवून मिळावा म्हणून प्रयत्न करताहेत!
मार्कुस डाबरे, पापडी, वसई
लोकसुद्धा बालबुद्धीचेच
‘महाराष्ट्राचा कॅम्पा कोला’ या अग्रलेखात केवळ नगरसेवक आणि बिल्डरांवर, तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर टीका केली आहे ,ते जरा खटकले. आम्ही सांगलीच्या एस.टी.कॉलनी भागात राहत आहोत. हा भाग ‘सुशिक्षितांचा’ (?) आहे पण बहुतेक सारेच ‘श्रद्धाळू’! येथे २०० मीटर अंतरात तीन देवळे आहेत.. त्यापैकी रामाच्या देवळाची उत्पत्ती मला माहीत आहे. आमच्या येथे एक तथाकथित समाजसेवक आहेत? होते. त्यांनी लोकांची मने जिंकण्यासाठी काय काय केले? तर महानगरपालिकेच्या राखीव जागेत रामाचे देऊळ उभे केले, नवरात्राचे कंठाळी उत्सव सुरू केले, पतसंस्था काढली (अल्पावधीत ती बुडालीदेखील). या माणसाशी कोणीही शहाणी व्यक्ती चार शब्द बोलली की त्याची काय लायकी आहे ते त्या व्यक्तीस समजू शकते. पण त्याच्यावरील उल्लेख केलेल्या ‘समाजसेवे’बद्दल त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणले गेले. मला सांगायचे असे आहे की कोणाला निवडून द्यायचे हे लोक अतिशय बालबुद्धीने ठरवतात.
स्मिता पटवर्धन, सांगली.
कोणीही यावे.. ?
सरबजितसिंगचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून पाकिस्तानच्या भारतद्वेषाच्या धोरणाचा संदेश आहे. आपण जर एका सनिकाचे धडावेगळे शिर बघून शांत न बसता त्याच वेळी योग्य उत्तर दिले असते, तर हा प्रकार कदाचित घडला नसता. पण केवळ कठोर शब्दात निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण काहीच केले नाही. या वर्तनाने आपले दुहेरी नुकसान झाले. पहिले नुकसान झाले ते आपल्या सनिकांचे मानसिक खच्चीकरण आणि दुसरे नुकसान म्हणजे शत्रुराष्ट्राचे मनोबल वाढले.
एका संस्कृत सुभाषितात म्हटल्याप्रमाणे ‘यज्ञांत बळी सिंह, घोडा यांचा न देता बोकडाचा दिला जात होता; कारण तो सर्वार्थाने दुर्बल होता’. मथितार्थ असा की आपण जर असेच सनिकांचे धडावेगळे मस्तक, सरबजितसिंगचा मृत्यू, चीनची घुसखोरी पचवत राहिलो तर आपल्याविरुद्ध कुरापती काढण्यास कुणीही धजावेल.
प्रसाद शि.जोशी