आपले लक्ष्य कोणते हे सर्वप्रथम निश्चित करावे लागते. त्यानंतरच नेम धरून गोळी चालवणे योग्य ठरते. हा नियम युद्ध असो की शिकार असो, कोठेही लागू आहे. त्यातही शिकार टप्प्यात आल्यावर गोळी झाडली तर शिकार साधली जाते अन्यथा शिकारीच सावज होण्याची भीती असते. निवडणुकीच्या रणभूमीवरही शत्रूवर हल्ला कधी आणि कसा करायचा याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे अन्यथा फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमक्या याच द्विधा मन:स्थितीत शिवसेनेचे नेतृत्व सध्या सापडलेले दिसते. त्यामुळेच सेनानेतृत्वाकडून बेछूट गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात कधी मित्रपक्षाचा ‘गडकरी’च जखमी होतो, तर कधी नरेंद्र मोदी यांनाच थेट लक्ष्य केले जाते.
राजकीय युद्धात शत्रू निश्चित करणे आणि अचूक वेळी हल्ला करणे याला फार महत्त्व असते. त्याच वेळी आपली शिबंदी भक्कम आहे ना, याचीही काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा पाठीत खंजीर खुपसले जाण्याची दाट शक्यता असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सर्वस्वी स्वबळावर निवडणूक लढविण्याची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लढाईची तयारी त्यांनी जय्यत केली. मात्र ऐन वेळी त्यांच्याच चार विद्यमान व एका माजी खासदाराने दगा केला. एकीकडे महाराष्ट्रातच गळती लागली असताना शिवसेनेच्या मुखपत्रात दिल्लीतील भाजपच्या वादांवर त्या पक्षाला सल्ले देण्याचे उद्योग सुरू असल्यानेही महाराष्ट्रातील भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यापूर्वी मित्रपक्ष असलेल्या भाजपने मतांचे विभाजन टाळण्याच्या नावाखाली मनसेशी अनावश्यक सलगी करून महायुतीतील वडीलबंधू असलेल्या शिवसेनेला घायाळ करण्याचे उद्योग चालवले. परिणामी अंतर्गत शत्रू आणि मित्रांशीच लढण्यात उद्धव ठाकरे यांचा बराच वेळ गेला. बराचसा दारूगोळा आपल्याच लोकांवर खर्ची करावा लागल्यामुळे शिवसेनेच्या सरदारांमध्येही बरीच अस्वस्थता निर्माण झाली. सध्या ही अस्वस्थता थेट कार्यकर्त्यांपर्यंत झिरपल्यामुळे महायुतीच्याच गोटात अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेले पाहावयास मिळते आहे. या साऱ्याच्या परिणामी सेनानेतृत्वाकडून ‘अंदाधुंद’ म्हणावा असा राजकीय गोळीबार होताना दिसत आहे. गडकरींच्या किल्ल्यावर तोफा डागून झाल्यानंतर भाजपला हादरविण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार व दिल्लीत शिवसेनेने उमेदवार उभे करून भाजपवरच गोळीबार सुरू केल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेते आणि कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झालेले दिसून येतात.
अर्थात शिवसेनेला ही भूमिका घेण्याची वेळ भाजपच्या चाणक्यांमुळे जशी आली तशीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या हुशार खेळ्यांमुळेही आली. आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’मुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला मोठा फटका बसला होता. मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यात अनेक जागी युतीचे उमेदवार पराभूत तर झाले. त्यानंतर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम प्रदेश भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत मनसेमुळे झालेल्या पराभवाचे विश्लेषण करून युतीत मनसेला घेतले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. तेव्हापासून भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने मनसेकडे ‘दार उघड बये दार उघड’चा धोशा सुरू होता. भाजप नेत्यांच्या आग्रहाला असेल अथवा उद्धवनीती म्हणून असेल, शिवसेनेच्या मुखपत्रातून राज यांना टाळीसाठी हात पुढे करण्यात आला. सेनेच्या टाळीला ‘टाटा’ करीत राज यांनी जाहीरपणे कोणी टाळी मागत नसते, असा टोला लगावल्यापासून शिवसेनेने युतीची तटबंदी भक्कम करण्यात सुरुवात केली. महायुतीत रिपाइंबरोबर स्वाभिमानी शेतकरी पक्ष तसेच राष्ट्रीय समाज पक्षाला सामावून घेत महायुतीची तटबंदी भक्कम करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेची बांधणी मजबूत करतानाच ‘शिवबंधन’च्या भावनिक धाग्यात शिवसैनिकांना बांधून टाकण्याची चलाख खेळीही उद्धव ठाकरे यांनी केली. ही तयारी झाल्यानंतर महायुतीची दारे आता बंद झाल्याची घोषणा करून मनसेची पुरती कोंडी करण्याची चालही शिवसेनेने खेळली.
परंतु वांद्रे येथे भाजपच्या ‘महागर्जना’ सभेत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्यामुळे तमाम शिवसैनिक अस्वस्थ झाले. याचा वचपा सोमय्या मैदानावरील ‘शिवबंधन’ सभेत नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेखही न करून उद्धव ठाकरे यांनी काढला. खरे तर येथे ‘सामना’ बरोबरीत सुटला होता. सोमय्या मैदानावरील उद्धव यांची सभा मोदींच्या सभेपेक्षा मोठी होती. त्यामुळे भाजपनेही शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज घेऊन उद्धव यांची कळ काढण्याचे उद्योग टाळणे अपेक्षित होते. परंतु भाजपला अंतर्गतचा गडकरी-मुंडे कलह नडला. मुंडेविरोधी महत्त्वाकांक्षेची ‘पूर्ती’ करण्याच्या नादात नितीन गडकरी यांनी थेट राज ठाकरे यांची ‘गुप्त’ भेट घेऊन लोकसभा निवडणूक न लढविण्याची विनंती केली आणि महायुतीलाच सुरुंग लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. मनसे हा विषय महायुतीच्या लेखी संपला असल्याचे सेनानेतृत्वाने तसेच भाजपच्या फडणवीसांनी स्पष्ट केलेले असताना गडकरी यांनी ‘संजीवनी’ दिल्यामुळे अस्वस्थ झालेल्या उद्धव यांनी गडकरी यांची थेट ‘व्यापारी’ म्हणून संभावना केली. राज ठाकरे यांनी मात्र गडकरी-भेटीचा अचूक उपयोग करीत मनसेच्या आठव्या वर्धापन दिनी ‘माझे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील’ अशी घोषणा करून ‘महायुती’ची गोची केली. यामुळे अस्वस्थ झालेल्या उद्धव यांनी ‘महाराष्ट्रात भाजपचा निर्णय कोण घेणार आणि मनसेने मोदींना पाठिंबा दिल्यास तो भाजप स्वीकारणार का’ असे दोन प्रश्न उपस्थित केले. उद्धव यांच्या प्रश्नांची उत्तरे अद्यापि भाजपने अधिकृतपणे दिलेली नाहीत, त्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार उभे करण्याची घोषणा करून महायुतीतील मित्रपक्षाला ‘दे धक्का’ असा अनुभव दिला. यामुळे महायुतीतील सावळ्या गोंधळात लढायचे कोणाशी, हा प्रश्न निर्माण झाला असतानाच शिवसेनेच्या चार खासदारांसह आठ प्रमुख लोकांनी ‘शिवबंधन’ झुगारत सेनेलाच ‘जय महाराष्ट्र’ केला. यातील राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने मावळमधून उमेदवारी दिली तर अभिजित पानसे यांना मनसेने ठाण्यातून ‘अभि..जीत’ असे सांगत लोकसभेची उमेदवारी देऊन सेनेला धक्का दिला. शिवसेनेसाठी मुंबई व ठाण्याचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे मोदींना पाठिंबा देताना मनसेने मुंबई व ठाण्यात फक्त शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात लोकसभेचे उमेदवार देऊन महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले. मनसेकडे मोजकीच शिबंदी असल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच नेमक्या जागा लढविण्याची ‘राज’नीती मनसेने आखली आहे. मोदीलाटेच्या पार्श्र्वभूमीवर याचा फायदा मनसेला किती होईल, हा प्रश्न असला तरी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊन राज यांनी केलेल्या खेळीमुळे उद्धव यांनी नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात थेट मनसेलाच अंगावर घेतले आहे. ‘मोदी के नाम पे दे दे बाबा’ म्हणत मनसे राष्ट्रवादीला मदत करीत असल्याचे सांगून उद्धव यांनी थेट राज यांच्यावरच टीकेचा गोळीबार केला. ही टीकाकरताना शिवसेनेच्या ठाण्यातील तिन्ही आमदारांनी ठाण्याच्या महापौरपदासाठी थेट कृष्णकुंजवर जाऊन राज पाठिंबा मागितला होता, तर आपणच राज यांच्याकडे टाळीसाठी हात पुढे केला हे सोयीस्करपणे विसरले गेले. या साऱ्या गोंधळात आपला शत्रू नेमका कोण, हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गडकरी, मोदी, मनसे, शिवबंधन तोडणारे नेते यांच्यावरच गोळीबार होताना दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादी या लक्ष्यापासून मात्र नेम दूर जाऊ लागला आहे.