जो माणूस दुसऱ्या माणसाशी संबंधित नसताना बेलगाम विधान करतो तो आणि काँग्रेसी दिग्गीराजा यांच्यात काहीच फरक नाही. मोदींवर विधान करून यू. आर. अनंतमूर्ती यांचा सवंग प्रसिद्धी मिळवणे हा क्षुल्लक हेतू दिसतो. अनंतमूर्ती असे सांगतात की, नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत. ते जर निवडून आले तर जनतेला भीतीच्या छायेत राहावे लागेल. हे विधान बेलगाम आहे. सवंग लोकप्रियतेसाठी केलेले आहे. हा मोदीफोबिया आहे. मोदी हे भारतीय घटनेला अनुसरून लोकशाही प्रक्रियेतून तीन पंचवार्षकि निवडणुका जिंकून आले आहेत. त्यांच्याविषयी बोलून अनंतमूर्ती यांनी गुजरातच्या मतदारांचा अपमान केला आहे. मोदींच्या राजवटीत गुजरातचे मतदार भयभीत झालेले दिसले नाहीत. मोदींविरोधात अनेक सवंग प्रकार गुजरात काँग्रेसने केले. सीबीआयचा वापर अजून चालूच आहे. पण गुजरातची जनता खंबीरपणे मोदींच्या पाठीशी आहे. अनंतमूर्ती पुढे असे म्हणाले की, मोदी पंतप्रधान झाले तर मी या देशात राहणार नाही. हे विधान निर्बुद्धपणाचे लक्षण आहे. समजा, मोदी निवडून आले तर या साहित्यिकाच्या मनगटात, लेखणीत मोदींच्या चुकांवर लिखाण करून विरोध करण्याची ताकद नाही का? असे पळून जाणाऱ्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार कुणी दिला? किंबहुना ज्यांनी दिला त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी अनंतमूर्ती यांनी हा उपद्व्याप केला असावा.
गुजरातचा विकास झाला ही वस्तुस्थिती नाकारण्यात काय हशील आहे? सर्वागीण विकास हे चक्र आहे. ते संपूर्ण कधीच असू शकत नाही. आता २००२ ची गुजरात दंगल का घडली? कशी घडली? हा तपशील सर्वाना माहीत आहे. पोलीस व सरकार दंगल का रोखू शकले नाहीत, असे प्रश्न सतत सेक्युलर लोक मांडत असतात. आज मुजफ्फरनगरमध्येसुद्धा सरकार व पोलीसच निष्क्रिय होते असे हेच मांडतात. पण गुजरातेत २००२ नंतर एकही धार्मिक उन्माद दिसला नाही याचे श्रेय मात्र मोदींना नाही.
विश्राम दीक्षित, भिवंडी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा