महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कोण टिकोजीराव लागून गेले की ज्यांच्या सुरक्षेचा खर्च महाराष्ट्रातील नागरिकांनी सोसावा? ते कोणी महान कर्तृत्ववान, राष्ट्रासाठी प्राणांची बाजी लावणारे अथवा गेलाबाजार काही राजकीय प्रभावक्षेत्र असलेले असे कोणी आहेत की काय? असा काय यांचा वकूब की महाराष्ट्र सरकारने त्यांना अतिमहनीय व्यक्तींसाठी असलेली सुरक्षा व्यवस्था देऊ करावी? काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने मोठय़ा होतात, तर काहींना मिळालेल्या पदामुळे मोठेपण प्राप्त होते. परंतु दानवे यांच्याबाबत या दोन्ही शक्यता नाहीत. राज्य राजकारणातील जातीपातींच्या आणि प्रादेशिक वाटणीच्या समीकरणामुळे त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. ही समीकरणे नसती तर त्यांना तेही मिळते ना. या प्रदेशाध्यक्षपदाखेरीज त्यांची ओळख म्हणजे भाजपचे खासदार. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाचा शेंदूर फासला गेल्यामुळे अनेक हौशेगवशे लोकसभेपर्यंत जाऊ शकले. दानवे हे त्यांपकी एक. अशा या कचकडय़ाच्या नेत्यांना मोठेपणा मिरवण्यासाठी सरकारी सुरक्षारक्षकांच्या ताफ्यात राहणे आवश्यक वाटते. ही अलीकडची राजकीय संस्कृती. या संस्कृतीस नाके मुरडणारा, आम्ही वेगळे आहोत असे नाक वर करून मिरवणारा भाजपदेखील या संस्कृतीपासून वेगळा नाही याचे मुबलक दाखले आता मिळू लागले आहेत. दानवे यांनी त्यात आपली भर घातली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी मंत्रिपदाचा त्यांना त्याग करावा लागला. त्यामुळे मंत्रिपदावर येतो त्या डामडौलास ते मुकले. तेव्हा या त्यागाची नुकसानभरपाई मिळावी या हेतूने त्यांनी स्वत:साठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी तसे रीतसर पत्र पाठविल्याचा सविस्तर वृत्तांत आम्ही प्रसिद्ध केला होता. त्यानुसार या महनीय दानवे यांना आधी तर थेट राज्यमंत्रिपदाचाच दर्जा हवा होता. परंतु दानवे यांना नसेल पण निदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तरी मनाची असल्यामुळे त्यांनी ही मागणी नाकारली आणि अखेर या महनीय व्यक्तींची सुरक्षा देण्यावर तोडपाणी झाले. परंतु या मुद्दय़ावर देवेंद्र फडणवीस यांनाही जाब विचारणे आवश्यक आहे. कारण सत्तांतर झाल्यावर त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते त्या सरकारातील अनेक मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. आपणासाठीही रस्तेवाहतूक बंद केली जाणार नाही, अशा प्रकारच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यांचा हा साधेपणा जर प्रामाणिक असेल तर या दानवे यांच्यापुरता त्यांनी अपवाद का करावा? किंवा तो खोटा असेल तर जो मागेल त्याला अशी सुरक्षा त्यांनी पुरवावी. अन्य पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी उद्या अशा सुरक्षेची मागणी केली तर ती फडणवीस कोणत्या तोंडाने नाकारणार? खेरीज हा दुजाभाव कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे फडणवीस यांना वाटते काय? या दानवे यांची अशी काय पुण्याई की केवळ त्यांनाच ही सुरक्षा सरकारने पुरवावी? उद्या राष्ट्रवादी वा काँग्रेस वा समाजवादी काँग्रेस किंवा बसप, रिपब्लिकनांचे अनेक अ. भा. गट किंवा अ. भा. सेना तत्सम कोणत्याही पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्षाने विशेष सुरक्षेची मागणी केल्यास फडणवीस ती कोणत्या तोंडाने नाकारणार? तेव्हा प्रश्न सुरक्षा देण्याचा नाही, तर तो केवळ सत्ता आहे म्हणून सोकावलेल्या काळाचा आहे. आपला प्रदेशाध्यक्ष हा कोणी अमूल्य हिरा आहे असे भाजपला वाटत असेल तर त्या पक्षाने स्वखर्चाने या हिऱ्यास सुरक्षेचे कोंदण पुरवावे. त्याचा भार निर्लज्जपणे जनतेवर टाकू नये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा