‘पवारांचा वार’ ही बातमी वाचली. पवार पहिल्यांदाच स्पष्ट बोलले आणि ते कातावलेलेही दिसले. दुर्दैवाचा भाग असा की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांना ‘लकवा’ सारख्या असभ्य शब्दाचा वापर करावा लागला. स्पष्ट आहे की या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीचे संबंध कसे राहतील याचा नमुना त्यांनी पेश केला आहे .
प्रशासन हे गतिमान पाहिजे, फायलींचा निपटारा वेगात व्हायला पाहिजे हे मान्य आहे. राष्ट्रवादीचे मंत्री त्यात वाक्बगारही आहेत. फक्त मुद्दा एवढाच की या फायलींवर भराभर सह्य़ा करून या मंडळीनी भरपूर माया जमवली. तटकरे ,भुजबळ यांच्याबद्दल न्यायालयात लोकांनी दाद मागितली आहे. ज्या कॉँग्रेस नेत्यांचे हात थरथरले नाहीत त्यांना घरी बसावे लागले.
सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख यांना हात न थरथरल्यामुळे बदनामी झेलावी लागली. हातात लकवा आहे असे कोणी म्हटले तरी चालेल, पण बेदरकार हात चालवून सगळ्या राजकीय कारकिर्दीलाच व्हेण्टिलेटरवर ठेवणे आता कोणालाच परवडणार नाही.
-सागर पाटील, कोल्हापूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा